Home > मॅक्स किसान > पीएम किसान योजना सर्व शेतकऱ्यांना लागू

पीएम किसान योजना सर्व शेतकऱ्यांना लागू

पीएम किसान योजना सर्व शेतकऱ्यांना लागू
X

पीएम किसान योजनेची व्याप्ती वाढवून सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं पहिल्याच बैठकीत घेतलाय, याचा फायदा १४ कोटी ५ लाख शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलीय. तसेच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या ५ जुलै रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीय. शुक्रवारी (३१ मे) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीनंतर ही माहिती देण्यात आलीय. त्यामुळं आता शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रूपये मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.

मोदी सरकारच्या काळातील संसदेचं पहिलं अधिवेशन १७ जून ते २६ जुलै या दरम्यान होणार आहे. तर १९ जून ला लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांना २० जूनला एकत्रितपणे संबोधित करतील. तर आर्थिक पाहणी अहवाल हा ४ जुलै रोजी प्रसिद्ध केला जाईल.

व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना

व्यापाऱ्यांसाठीच्या पेन्शन योजनेलाही कॅबिनेटच्या बैठकीत मंजूरी देण्यात आलीय. तीन कोटी किरकोळ व्यापारी आणि दुकानदारांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.

शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं राष्ट्रीय सुरक्षा निधीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पीएम स्कॉलरशिपमध्ये वाढ कऱण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा विस्तार करून त्यात दहशतवाद आणि नक्षलवादाशी लढतांना शहीद झालेल्या पोलिसांच्या पाल्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पुर्वी मुलांना दरमहा दोन हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात होती त्यात पाचशे रूपयांची वाढ करण्यात आली असून मुलींसाठी पुर्वी अडीच हजार रूपये शिष्यवृत्ती होती त्यात पाचशे रूपयांची वाढ करून ती दरमहा ३ हजार रूपये करण्यात आली आहे.

Updated : 31 May 2019 3:41 PM GMT
Next Story
Share it
Top