Home > Election 2020 > मावळमध्ये अटीतटीची लढाई

मावळमध्ये अटीतटीची लढाई

मावळमध्ये अटीतटीची लढाई
X

मावळ लोकसभा मतदारसंघ यापुर्वी कधी फारसा चर्चेत नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीमुळं मावळ लोकसभा मतदारसंघातलं वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळं महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदारसंघात मावळचाही समावेश झालाय.

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, ही निवडणूक २०१४ पेक्षा थोडी वेगळी आहे. त्यातही पुर्वीसारखी मोदी लाट नाही. अशा परिस्थितीत ही निवडणूक लढवली जात आहे. पार्थ हे नवखे असले तरी त्यांच्यामागे पवार नावाची ताकद आहे. त्यामुळं ही लढत चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेली गटबाजी आहे. तळेगाव नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. मात्र, या भागावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व बऱ्यापैकी आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेतेही या भागात आहेत. पण हे चेहऱ्यांचं मतांमध्ये रूपांतर होईल, याविषयी साशंकता आहे. याच मोठ्या चेहऱ्यांनी आधीही निवडणुका लढवल्या मात्र, मतांमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आलंय, ही वस्तुस्थिती आहे. तळेगावमधील राष्ट्रवादीचे नेते हे फक्त एमआयडीसी किंवा इतर ठिकाणीच दिसतात, मात्र हेच चेहरे पार्थ पवार यांच्यासाठी किती मतदान वळवू शकतात, याविषयी स्थानिक पत्रकारांना शंका आहे.

तळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकताच निर्धार मेळावा घेतला. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचा तो परिपाक असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ताकद लावली तरी पार्थ यांना आघाडी मिळणार नसली तरी मतांच्या आघाडीची तफावत बरीच कमी होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.

काळोखे, भेगडे, दाभाडे, आवारे, काकडे आणि खांडगेंवर मदार

तळेगाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते काळोखे, भेगडे, दाभाडे, आवारे, काकडे आणि खांडगे यांनी पूर्णपणे पार्थ यांच्या पाठिशी ताकद लावली तर त्यांना चांगलं मतदान होऊ शकतं, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, अजूनही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वादविवाद मिटतांना दिसत नाही, ही पार्थ यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अजूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा दिसत नाहीये.

देहूरोड, लोणावळ्यात युतीच्या वर्चस्वाला नाराजी भोवणार ?

देहूरोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद युतीच्या तुलनेत कमीच आहे. या विधानसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे. नुकत्याचं झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्येही भाजपलचा यश मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे या भागातील मोठे चेहरे मनापासून प्रचारात उतरल्यास पार्थ यांना मतदान होऊ शकतं. मात्र, इथंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचारात मनापासून उतरल्याचं चित्र नाही.

लोणावळा नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीचा एकही मोठा चेहरा इथं नाही. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी मनापासून एकत्र आले तर पार्थ पवार यांना मतदान होऊ शकतं. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले शब्दात चौधरी, सुनील इंगुळकर या दोन मोठ्या चेहऱ्यांनी युतीच्या उमेदवारासाटी काम केलं तर राष्ट्रवादीसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.

लोणावळ्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये नाराजांचा एक मोठा गट आहे. या गटामध्ये नगराध्यक्ष, खासदार आणि आमदारांविरोधात मोठ्याप्रमाणावर नाराजी आहे. हाच नाराजांचा गट तटस्थ राहिल्यास त्याचा मोठा फटका युतीला बसून पार्थ पवार यांना फायदा होण्याचा कयास लावला जातोय. याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या नाराज गटांशी सलोख्याचे संबंध आहेत. जर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नाराज गटांशी संधान साधलं तर पार्थ यांचं पारडं काहीप्रमाणात जड होऊ शकतं, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोणावळा आणि परिसरात मनसेचा एक चांगला गट सक्रिय आहे. तो ही गट उघडपणे पार्थ यांच्यासाठी फिरल्यास त्याचाही फायदा पार्थ यांना होण्याची शक्यता आहे. मात्र, युतीच्या नाराज गटांची नाराजी दूर करतांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-नेते दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

भेगडे, दाभाडे आणि नेवाळेंचा प्रभाव कुणाच्या बाजूनं ?

वडगाव, मावळ, तळेगाव, लोणावळा या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस गटातटात विखुरलेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा प्रभाव दिसत नाही. लोणावळा, कार्ला हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण निवडणुकांमध्ये इथं राष्ट्रवादीच्या बाजूनं मतदान होतांना दिसत नाही. कामशेतमध्ये भाजप-शिवसेना युतीचा प्रभाव बऱ्यापैकी दिसून येतो.

बाळासाहेब नेवाळे, माऊली दाभाडे यांचं लोणावळा ते कामशेत या परिसरात नेटवर्क चांगलं आहे. त्यांनी सक्रियपणे काम केल्यास त्याचा फायदा पार्थ पवार यांना होण्याची शक्यता आहे. अंदरमावळमध्ये राष्ट्रवादीला नेवाळे-दाभाडे एकत्र आले तर आघाडी मिळू शकते. मात्र, हे दोघंही विभक्त असल्यानं राष्ट्रवादीसाठी ती डोकेदुखी वाढवू शकते.

बारणेंविरोधातही नाराजीचा सूर

मतदारसंघातील युतीच्या कार्यकर्त्यांशी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्यानं संपर्क ठेवला नसल्यानं कार्यकर्त्यांमध्येच त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. कान्हेफाटा इथल्या पूलाचा वाद अजूनही कमी झालेला नाही. भाजपच्या आमदार आणि शिवसेनेचे खासदार बारणे यांनी कान्हेफाटा इथल्या पूलाचं दोघांनीही उद्घाटन केलं होतं. त्यामुळं युतीमध्येच अशा कारणांमुळं अंतर्गत बेबनावही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इथंही गटबाजी आहे.

वडगामध्ये भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद समानच आहे. मात्र, भाजपला मानणारा एक मोठा वर्ग इथं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून इथं मसल पॉवरचा वापर होतो, असा समज आहे. बाळासाहेब निवळे आणि माऊली दाभाडे हे इथले राष्र्ावादीचे मोठे चेहरे आहेत. त्यामुळं या दोन नेत्यांची सक्रियता इथं पार्थ पवार यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पवना मावळ गोळीबार हत्याकांड प्रकरणानंतर इथल्या लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळं बाळासाहेब नेवाळे, बापुसाहेब भेगडे, दाभाडे यांनी एकत्र फिरून जर पार्थ यांचा प्रचार केला तरच इथं पार्थ यांना आघाडी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. तर दुसरीकडे शिवसेनेचं मावळमध्ये फारसं अस्तित्व नाही. बारणेंवर निष्क्रियतेचा ठपका असला तरी शिवसेनेकडून मावळ गोळीबार घटना सातत्यानं समोर आणली जातेय. शिवसेनेला एकत्र मतदान हीच मावळ गोळीबारातील मृतांना श्रद्धांजली ठरेल, असं शिवसेनेकडून सातत्यानं समोर आणलं जातंय. याशिवाय अनधिकृत बांधकामं हाही मुद्दा या मतदारसंघात गाजण्याची शक्यता आहे.

पवार आणि मावळचं गणित

पवार कुटुंबियांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक भागाचा विकास केल्यावर पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांचं एकमत होतांना दिसतंय. अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची नाराजी दूर करणं ही शिवसेनेसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. जगताप यांची नाराजी दूर कऱण्यासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केलेले प्रयत्नही अयशस्वी ठरतांना दिसत आहेत. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली होती. मात्र, शिवसेनेनं ती फेटाळल्यानं आमदार जगताप हे नाराजच आहेत. त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो.

भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्यांची संख्या जास्त आहे. त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आता दिसणारे असंख्य चेहरे सध्या वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे राजकीय गुरू हे शरद पवारच आहेत. या मतदारसंघातली सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात तत्त्वांपेक्षा पैशाचं राजकारण मोठ्याप्रमाणावर होईल, असं स्थानिक पत्रकारांना वाटतंय.

मावळमध्ये राष्ट्रवादीला कोण छुपी मदत करतयं ?

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे. त्यामुळं अजित पवारांना कुणीतरी छुपा पाठिंबा दिला असल्यानंच त्यांनी पार्थ यांना निवडणुकीच्य रिंगणात उतरवलं असण्याची शक्यता आहे.

आरएसएसचे २ हजार स्वयंसेवक प्रचारात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे २ हजार स्वयंसेवक मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार करू लागलेले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते जरी स्वतःच्या उमेदवारावर नाराज असले तरी संघाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार न पाहता मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा कंबर कसल्याचं दिसतंय. काहीही करून या मतदारसंघातून पवारांना बाहेर घालवायचंच असा चंग स्वयंसेवकांनी बांधल्याची चर्चाही सुरू आहे.

बारणेंचे कच्चे दुवे

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी काही गोष्टी चिंतेच्या आहेत. त्यात बारणेंचं थेट फटकून बोलणं, परिणामांची चिंता न करता बोलणं, मतदारसंघात दाखवता येतील अशा स्वरुपाची दृश्य स्वरूपातली कामचं नाहीत, असंही स्थानिक पत्रकार सांगतात.

अख्खं पवार कुटुंब रात्रंदिवस मावळ मतदारसंघात

पार्थ पवार यांना उमेदवारी घोषित झाली त्यानंतर जवळपास अख्खं पवार कुटुंबंच मावळ मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अजित पवार हे स्वतः सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मतदारसंघात फिरत असल्याचं पत्रकारांचं म्हणणं आहे. मात्र, त्या तुलनेत बारणेंची शक्ती कमी पडत असल्याचंही पत्रकारांना वाटतं. पवार कुटुंबियांनी खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा विकास केला, त्यातही मोदी लाट ओसरली आहे, त्यामुळं मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघातील लढती या लक्षवेधी ठरतील, असं पत्रकारांना वाटतं. शिवाय शिवसेनेकडून वैयक्तिक पातळीवर केली जाणारी टीका आणि तिचा स्तर घसरतांना दिसतोय. त्यातच सोशल मीडियावर प्रचाराच्य काळात पसरवल्या जाणाऱ्या खऱ्या-खोट्या बातम्यांची शहानिशा करणं पत्रकारांसाठी जिकरीचं ठरतंय. निःपक्ष पत्रकारिता कमी होत असल्याचं पत्रकारांचं म्हणणं आहे.

Updated : 2 April 2019 11:53 AM GMT
Next Story
Share it
Top