Home > मॅक्स रिपोर्ट > परमबीर सिंह का फसले?

परमबीर सिंह का फसले?

परमबीर सिंह का फसले?
X

मुंबई आणि ठाण्यातील ज्या पोलीस स्टेशनचे बॉस म्हणून काम केले त्याच पोलीस स्टेशनमध्ये आता आरोपी म्हणून जाण्याची वेळ परमबीर सिंह यांच्यावर आली आहे. दरम्यान ठाणे कोर्टाने परमबीर सिंह यांचा अटक वॉरंट रद्द केले, पण त्यासाठी ठाणे न्यायालयाने सिंह यांना 2 अटी घातल्या आहेत. जेव्हा तपास अधिकारी बोलावतील तेव्हा तपाससाठी उपस्थित राहावे लागेल आणि 15 हजारांचा पर्सनल बॉण्ड भरावा लागेल, या अटींवर त्यांच्याविरुद्ध जारी केलेले अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले. त्यामुळे परमवीर यांना सध्या तरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रकृती बरी नसल्याने कोर्टात उपस्थित राहू शकलो नाही, पण यापुढे चौकशीला जेव्हा जेव्हा बोलावतील तेव्हा उपास्थित राहू, असे परमबीर सिंह यांनी कोर्टाला सांगितले. एवढेच नाही तर आता चांदीवाल आयोगासमोर देखील हजर राहणार असल्याचे सिंह यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टान ६ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्याने परमबीर सिंह आता राज्यात परतले आहेत. गेले काही महिने ते गायब झाले होते. परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन सरकारने हटवले आणि त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करुन परमबीर सिंह यांनी खळबळ उडवून दिली. पण परमबीर सिंह यांचेही एकेक कारनामे समोर आले आणि परमबीर सिंह अडचणीत येऊ लागले. २९ फेब्रुवारी २०२० रोजी परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली.

त्यानंतर अँटालिया प्रकरणानंतर १८ मार्च २०२१ रोजी राज्य सरकारने सिंह यांना पोलीस आयुक्तपदावरून हटवले आणि त्यांची गृहरक्षक दलात बदली करण्यात आली. त्यानंतर लगेचच २० मार्च रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

एकीकडे हे प्रकरण गाजत असताना २८ एप्रिल रोजी परमबीर सिंह यांच्याविरोधात अकोल्यातील पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सिंह हे प्रकृतीचे कारण देत ५ मेपासून रजेवर गेले. त्यानंतर दोन महिन्यात म्हणजेच २१ जुलै रोजी परमबीर सिंह यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरत २० कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार भाईंदर येथील विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला. २३ जुलै रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यातही सिंह आणि इतर चौघांविरुद्ध अपहरण, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ३० जुलै रोजी व्यापारी केतन तन्ना यांच्या तक्रारीकरुन ठाणे नगर पोलीस ठाण्यात सिंह यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या आरोपांनंतर सचिन वाझे आणि इतर तिघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला.

या दरम्यान परमबीर सिंह हे गायब झाले होते. अखेर कोर्टाने १७ नोव्हेंबर रोजी परमबीर सिंह यांना 'फरारी आरोपी' म्हणून घोषित केले. पण २२ नोव्हेंबर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस महासंचालक आणि सीबीआयला नोटीस जारी करत परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले. त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून परमबीर सिंह यांच्या पोलीस स्टेशन वाऱ्या सुरू झाल्या. आता ६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय परमबीर सिंह यांना अटकेपासून पुन्हा संरक्षण देते की नाही, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Updated : 26 Nov 2021 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top