Home > मॅक्स रिपोर्ट > 'तासासाठी पंकजाताईंना मुख्यमंत्रीपद'…

'तासासाठी पंकजाताईंना मुख्यमंत्रीपद'…

तासासाठी पंकजाताईंना मुख्यमंत्रीपद…
X

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथे केलेल्या विधानाचा आधार घेत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असं म्हणत आजच्या सामनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

'माझ्या टेबलावर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. पण हे प्रकरण कोर्टात असल्याने विलंब होत आहे. ती फाईल ना माझ्या टेबलवर आहे, ना मुख्यमंत्र्यांच्या, हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे विलंब होत आहे.’

काय म्हटलंय आजच्या सामनातून…

‘मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगत असतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील! म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी फाईल कोठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा व मराठा समाजाची मागणी पुढे न्यावी!

‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर सौ. पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्या जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. मग पंकजाताईंप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत जाऊन, पंतप्रधानांना भेटून मराठा आरक्षणाचा तिढा का सोडवीत नाहीत?

असे सवाल करत आज सामनातून मुख्यमंत्र्यावर शरसंधान साधले आहे.

Updated : 28 July 2018 5:03 AM GMT
Next Story
Share it
Top