Home > मॅक्स रिपोर्ट > शब्दरुपी शिल्पातून पंढरपुरात साकारला `विठ्ठल`

शब्दरुपी शिल्पातून पंढरपुरात साकारला `विठ्ठल`

परकीय भाषेतून आलेल्या अनेक शब्दांची माहिती घेऊन पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावच्या जवळ पालखी महामार्गावर पुण्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी त्यांच्या आत्मभान ट्रस्ट च्या माध्यमातून लोकवर्गणीतून शब्द रुपी शिल्पातुन विठ्ठल साकारला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा शब्दरुपी ग्राऊंड रिपोर्ट

शब्दरुपी शिल्पातून पंढरपुरात साकारला `विठ्ठल`
X

शब्दांनीच पेटतात घरे,दारे,देश आणि माणसे सुद्धा म्हणूनच म्हटले जाते,की बोलण्यापूर्वी विचार करूनच शब्द वापरावेत. शब्द जणू धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे सुसाट सुटतात. एकदा तोंडातून गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक करावी असे म्हटले जाते. याच शब्दांनी अनेकांना घायाळ केले आहे. अनेक कवींनी आपल्या मार्मिक शब्दात चालू परिस्थितीवर हल्ला चढवला आहे. हेच शब्द काळजात बाण घुसावा,त्याप्रमाणे ह्रदयात घर करून राहतात व लोक सामाजिक क्रांतीसाठी सज्ज होतात. पण शब्द आले कोठून याचा विचार लोक करत नाहीत. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेतील शब्दांनी योगदान दिले आहे. 'मृदुंग' हा शब्द उर्दू भाषेतील असला तरी ही तो मराठी भाषिकांना जवळचा वाटतो. 'कुस्ती' हा शब्द अरेबिक असला तरी ही तो मराठीच शब्द आहे,असे अनेकांना वाटते.

या सारख्या अनेक शब्दांनी मराठी भाषा समृध्द करण्याचे काम केले आहे. मराठी साधू संतांनी ही शब्दांची किमया आपल्या लिखाणातून आणि वाणीतून सांगितली आहे. त्यामुळे असे अनेक शब्द मराठी भाषेत दुसऱ्या भाषेतून आले आहेत. परकीय भाषेतून आलेल्या अनेक शब्दांची माहिती घेऊन पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावच्या जवळ पालखी महामार्गावर पुण्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी त्यांच्या आत्मभान ट्रस्ट च्या माध्यमातून लोकवर्गणीतून शब्द रुपी शिल्पातुन विठ्ठल साकारला आहे. चिंचणी गाव पंढरपूर-अकलूज रोडवर असून येथूनच पंढरपूरला पालख्या येतात. येथे पालख्यांचा टप्पा असून येथेच पुण्यातून येणाऱ्या दोन पालख्याची भेट होते. त्याला बंधू भेट असे म्हणतात. चिंचणी गावच्या हद्दीत असणारे हे शब्द शिल्प वारकऱ्यांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरले आहे.

वीस फुटाचे उभारले शब्द शिल्प

संदेश भंडारे यांनी हे शब्द शिल्प लोकवर्गणीतून उभारले असून यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आहे. या शब्द शिल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे वीस फूट उंचीचे असून बनवण्यासाठी पत्र्याचा उपयोग करण्यात आला आहे. या पत्र्यावर विविध भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द कोरण्यात आले आहेत. या शब्दांची लेदर कटिंग करण्यात आली असून हे शब्द उन्हाच्या स्थितीनुसार रंग बदलतात असे या शब्द शिल्पाचे शिल्पकार संदेश भंडारे यांनी सांगितले. विविध भाषेतून आलेल्या शब्दातून त्यांनी वीस फुटी शब्द शिल्पातून विठ्ठल साकारला आहे. हे शिल्प मुख्य महामार्गावर असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्यतः हे शब्द शिल्प वारकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

सामाजिक भेदभावावर महापुरुष आणि संतांनी शब्दांनी चढवला होता हल्ला

महाराष्ट्राला समृद्ध अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. संत तुकारामांनी समाजातील दांभिकतेवर हल्ला चढवून समाज जागृतीचे काम केले. त्यांची सामाजिक जागृतीची चळवळ पुढे संत गाडगेबाबा यांनी चालू ठेऊन समाजातील वाईट चालीरीती यांच्यावर हल्ला करून कीर्तने,भारुडे यांच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचे काम केले. राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी शब्दांच्याच माध्यमातून समाजातील जातिभेदावर हल्ला चढवला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक लिहले तर 'गुलामगिरी' या पुस्तकातून सामाजिक भेदभावावर शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्यामुळेच सामाजिक भेदभाव नष्ट करण्याची चळवळ अधिक गतिमान झाली. महात्मा फुले यांच्यानंतर सामाजिक सुधारणेची चळवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक गतिमान करून तिला मूर्त स्वरूप दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृतीसाठी मूकनायक,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वृत्तपत्रे काढली. 'अस्पृश्य पूर्वी कोण होते','थोट्स ऑन पाकिस्तान' सारखी पुस्तके लिहिली. भारतीय समाजातील काही वर्ग स्वतःला सवर्ण समजत होता आणि बऱ्याच भारतीय समाजाला अस्पृश्य समजत होता. या अस्पृश्य समजाला सार्वजनिक पाणवठ्यावरील पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यांना तो मिळावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केला. अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केला. अस्पृश्य समाज हजारो वर्षे अज्ञानाच्या खाईत लोटलेला होता. त्यांच्यात क्रांतीची ज्वाला फुकण्याचे काम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे मुक्याचे जीवन जगत असलेल्या अस्पृश्य समजाला जागृत करण्यासाठी 'मूकनायक नावाचे' वृत्तपत्र काढून त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्यास सुरुवात केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शाब्दिक माऱ्याने अस्पृश्य समाजात जीव आणण्याचे काम केले. शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहून अस्पृश्याना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंडाच्या माध्यमातून वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द अनेकांना जगण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा देतात. 'शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा' शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आजही अनेकांना जगण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

सामाजिक परिस्थितीची कवितेतून जाणीव

आंबेडकरी कवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या काव्यातून समाज जागृतीचे काम केले. त्यांनी वाड्या-वस्त्या गावागावात जाऊन लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगितली. अलीकडे जलसाकार संभाजी भगत आपल्या जलशाच्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर शाब्दिक प्रहार करतात. समाजात अनेक कवी आपल्या कवितेतून सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक परिस्थितीवर मांडणी करून समाजाला जागृत करण्याचे काम करतात.

त्यांच्या शब्दा-शब्दात सामाजिक जाणिव असते. त्यांची झालेले पिळवणूक त्यात असते. त्यातून अनेक जण प्रेरणा घेऊन समाजात घडत असलेल्या वाईट गोष्टीचा विरोध करत असतात. कविता हे माध्यम सामाजिक सुधारणेचे माध्यम तर आहेच त्याचबरोबर नैसर्गिक सोंदर्य याचीही महती सांगते. शेतकऱ्यांचे दुःख ही कवितेतून सांगितले जाते. आई-वडीलांच्या मायेची महती ही याच कवितेतून अगदी सहजपणे सांगितली जाते. एखाद्याचे वर्णनही यातून सांगितले जाते. कविता ह्या निव्वळ कविता ना होता त्या सामाजिक सुधारणेच्या कविता असाव्यात असे अनेकांना वाटते. आता अलीकडे यात चारोळ्याचा प्रकारही आला आहे.

साने गुरुजींनी केलेल्या मंदिर मुक्तीच्या सत्या ग्रहानिमित्त झालेल्या कार्यक्रमा दिवशी शब्द शिल्प उभारण्याचे ठरले

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना या शब्द शिल्पाचे जनक संदेश भंडारे यांनी सांगितले,की साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर बहुजनांना दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी केलेल्या आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झालेल्या कार्यक्रमाला पंढरपुरात आल्यानंतर चर्चेदरम्यान हे शब्द शिल्प उभारण्याचे ठरले. साने गुरुजींनी जगाला प्रेम अर्पावे हा दिलेला संदेश मराठी मनावर खोलवर रुजलेला आहे. तीच परंपरा वारीमध्ये असून उभारलेले शिल्प विठ्ठल रुपी आहे. शब्द अभंगातून आले असून ते माणसांना ज्ञान देण्याचे काम करतात. जगण्याचा मार्ग दाखवत असून सामाजिक सलोखा निर्माण करतात. समाजामधील तेढ कमी करून प्रेम भावना व द्वेषापासून दूर रहायला सांगतात. तमाशा शब्द आणि कुस्ती शब्द अरबी भाषेतून आलेला असून तामिनाडू पासून ते काश्मीर पर्यंत अनेक शब्द मराठी भाषेशी जोडले गेलेले आहेत. संतांनी या मराठी भाषेला समृध्द करण्याचे काम केले आहे.

Updated : 5 July 2022 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top