रुग्ण सांगत होता, मला ऑक्सिजन सिलेंडर द्या, मी मरुन जाईल! शेवटी तो मरुन गेला…

ही घटना कोणत्या आफ्रिकेतील मागास देशात घडली नाही. तर भारतात अत्यंत प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात घडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील एक रुग्ण व्हिडीओ प्रसारीत करुन सांगत आहे की, मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. तरीही त्याला ऑक्सिजन मिळत नाही. आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो.

हॅलो मी रमजान पटेल मासेगावचा रहिवासी आहे… कुठंही न जाता मला कोरोनाची लागण झाली आहे… आणि उस्मानाबाद मध्ये कोव्हीड 19 चा उपचार घेत आहे. तरी माझ्या हाता पायाचा गळाटा होऊन… दम भरतो आहे. आणि जास्त त्रास जाणवतोय. इथं डॉक्टर लोक इलाज करतात. परंतू जरा उशीर लागतो. इथं इलाज चांगल्या पद्धतीने होतो आहे. फक्त उशीर लागल्यामुळं त्रास जाणवतो आहे. ऑक्सिजन बंद केल्यामुळं त्रास जाणवतो आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओ मध्ये हा रुग्ण मला धापच लागते फक्त… रात्रीचे ऑक्सिजन बंद करतात… बाहेरचे… आणि डॉक्टर पण नसतात इथं…. धाप लै भरती माझी… धापीवरचा आणि हातापायाचा इलाज झाला म्हणजे झालं… कलेक्टर साहेबांना सांगा…

आणि एका व्हिडीओमध्ये रमजान पटेल म्हणतात… रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत ऑक्सिजन बंद करतात मॅडम… कलेक्टर मॅडमला माझी कळकळीची विनंती आहे. ऑक्सिजन कदापीही बंद करु नये. नाही तर मी मरुन जाईल. तीच विनंती आहे. नाही तर मी मरुन जाईल. रमजान पटेल कोव्हीड19 चा…

हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मृत रमजान हा परंडा तालुक्यातील मासेगावचा गावचा होता.  30 मे ला रोजी त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या व्यक्तीचा 5 जून रोजी मृत्यू झाला आहे.

रुग्णावर योग्य उपचार होत होता, आम्ही त्याला नेहमी ऑक्सिजन लावून उपचार केल्याचं, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं. तसेच सदर रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच देखील म्हणणे आहे की, रुग्णावर योग्य ते उपचार सुरू होते. रुग्ण जास्त गंभीर असल्याने त्यांना कितीही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला तरी त्याची कमतरता त्यांना भासत होती.

सदर व्यक्तीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ यांनी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील कोव्हिड सेंटर ला भेट दिली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कारण या रुग्णाने कलेक्टर मॅडमला मला ऑक्सिजन मिळाला नाही तर मी मरुन जाईल असं म्हटलं होतं.

आज रमजान गेल्यानंतर कलेक्टर मॅडम तिथं पोहोचल्या. आता तिथं रमजान नाही. मात्र, इतर पेशन्ट ला सुविधा चांगल्या मिळत आहेत. असं सांगणारे व्हिडीओ शूट देखील झाले. मात्र, रमजान ला ऑक्सिजन दिला गेला नाही. याला जबाबदार कोण? बाकी लोकांना चांगल्या सुविधा मिळतात. याचा अर्थ रमजान ला ऑक्सिजन दिला गेला असा होत नाही. रमजान चे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ सांगतात. त्याला ऑक्सिजन ची गरज आहे. तेव्हा त्याच्या तोंडाला ऑक्सिजन नाही.

रात्री ऑक्सिजन बंद केला जात होता. ते कोण करत होतं? कलेक्टर दीपा मुंडे मुधोळ कोणाला वाचावायचा प्रयत्न करत आहेत का? बैल गेला आणि झोपाळा केला. अशा पद्धतीने रमजान गेल्यानंतर रुग्णालयाला भेट देऊन कलेक्टर मॅडमला विनंती करणारा रमजान परत येणार आहे का?

रमजान च्या मृत्यूला जबाबदार कोण? त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here