Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : ऐतिहासिक भूपतगड अडकला लालफितीच्या कारभारात...

Ground Report : ऐतिहासिक भूपतगड अडकला लालफितीच्या कारभारात...

राज्याचा इतिहास जिवंत ठेवणारे गडकिल्ले ही एक महत्त्वाची संपदा आहे...पण अनेक किल्ल्यांबाबत सरकारी धोरण आणि नियमांमुळेच फटका बसल्याची उदाहरणं आहेत. असाच एक प्रकार पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक भूपतगड किल्ल्याबाबत समोर आला आहे. आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट..

Ground Report : ऐतिहासिक भूपतगड अडकला लालफितीच्या कारभारात...
X

पालघर : जिल्ह्याची निर्मिती होऊन ऑगस्ट महिन्यात आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत जव्हारच्या ग्रामीण पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून जव्हार तालुक्यातील भोपतगड किल्ला परिसरातील विकासासाठी किमान दीड कोटी रुपये खर्च झाला आहे. तरीही झाप ते भुपतगड दरम्यानचा अधिकतर रस्ता अजूनही खडी-मातीचा कच्चाच राहिला असून उर्वरित रस्ता डोंगर कपारीतून पाय वाटेने तुडवावा लागत आहे. आदिवासी ग्रामीण भागातील पर्यटन विकासासाठी इतका मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना पूर्ण झालेल्या कामांच्या दर्ज्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटन विकासाचा हेतू साध्य होत नसल्याचे दिसून आले आहे.



जव्हार शहरापासून सुमारे 16 किलोमीटरवर असणाऱ्या झाप या गावापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये भोपतगड वसलेले आहे. या किल्ल्यापर्यंतचा रस्ता तयार करणे, सुशोभिकरण करणे, रस्त्याचे मजबुतीकरण करणे, डांबरीकरण करणे व रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी खर्च झाले आहेत. पण त्याचा उपयोग होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

भोपतगडाच्या मार्गावर झाप ते चिंचपाडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून गेल्या दहा ते बारा वर्षात हा रस्ता झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चिंचपाडात जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात निकृष्ट पद्धतीने डांबरीकरण झाल्याचे दिसून येत असून उर्वरित दीड किलो मीटर भाग डोंगराळ भागात असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. पर्यटन विकासाच्या नावाने रस्ते संरक्षक भिंत बांधणे सुशोभिकरण करणे अशा कारणास्तव खर्च झालेल्या खर्चाचा अपव्यय झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



दुर्गम भागातील पर्यटन केंद्र विकसित करताना जव्हार पासून भोपतगड पर्यंतच्या रस्त्यावर दिशादर्शक किंवा पर्यटन स्थळाची माहिती देणारा एकही फलक अस्तित्वात नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यापासून पर्यटन स्थळापर्यंत पोहोचण्याचे धाडस सर्वसामान्य नागरिक करतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून येत आहे. भोपतगड किल्ला परिसरातील जागा वनविभागाच्या अखत्यारीत असून त्या परिसरात आमूलाग्र बदल करण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे. परंतु परवानगीच्या नावाखाली वनविभाग अडकाठी करत असल्याचा आरोप झाप येथील ग्रामस्थ व बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना केला.

जि.प.चे म्हणणे काय?

यासंदर्भात आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बोरसे यांना विचारले असता "आम्ही दहा लाखांचा खर्च केला आहे. पण वन विभागाच्या आडकाठीमुळे हा रस्ता पूर्ण झाला नाही" असे त्यांनी सांगितले आहे

यासंदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीपाद शिंदे यांना विचारले असता, भूपतगड पर्यटनस्थळ विकास योजने अंतर्गत येथे एक कोटींच्या आसपास रस्ते संरक्षण भिंतीसह विवीध कामे करण्यात आली असल्याचे सांगितले. पण वनविभागाने ठेकेदारावर गुन्हे दाखल केल्याने उर्वरित कामे झाली नाहीत अशीही माहिती त्यांनी दिली.

वनविभागाचे म्हणणे काय?

यासंदर्भात आम्ही जव्हारमधील वनरक्षक कैलास कांदळकर यांना विचारले असता संबंधित रस्त्याचे काम सुरु करण्या अगोदर वनविभागाची परवानगी घेतली नव्हती, यामुळे ठेकेदारावर केस दाखल करण्यात आली असून व्हायलेशन रिपोर्ट दिल्लीला पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले. पण हा रस्ता पर्यटनस्थळाकडे जाणारा असल्याने कलम 3/2 च्या अंतर्गत परवानगी देता येत नाही तसेच FCI कायद्यांअंतर्गत परवानगी कदाचित मिळू शकते असे त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

भूपतगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम वनविभागाच्या नियमांमुळे रखडले आहे. याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञ मिलिंद थत्ते यांना विचारले असता, "सदरचा रस्ता हा वन विभागाच्या अंतर्गत असला तरी त्याचे काम करता येऊ शकते. कलम 3/2 मध्ये तशी तरदूत आहेय या कलमानुसार वाडी वस्तीकडे जाणारा रस्ताच करता येऊ शकतो किंवा त्याला परवानगी दिली जाऊ शकते असे कुठेही म्हटलेलं नाही. कायद्यात फक्त रस्ता हाच उल्लेख त्यामुळे रस्ता फक्त वाडी वस्ती जाणारा नसला तरी दावा दाखल केल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वनसमितीला दावा मंजूर करणे बंधनकारक आहे" असे मत त्यांनी व्यक्त केले.


भूपतगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व

भूपती म्हणजे राजा यावरून भूपतगड हे नाव रूढ झाले. शिलाहाराच्या काळातील भूपतगड हा किल्ला महत्वाचा मानला जातो. डहाणू सोपारा या बंदरामध्ये उतरवलेला माल भूपतगड मार्गे गोंदाघाट थळघाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. प्राचीन काळातील व्यापार उदिमाचे हे महत्वाचे ठिकाण होते. हा किल्ला सुरतेच्या मलिक नावाच्या लढवय्या सुभेदाराच्या ताब्यात होता. भूपतगडचा सुभेदार सुंभाटे हा आदिवासी वारली समाजाचा होता. त्याचा जयबाने पराभव करून किल्ला जिंकला. कालांतराने सुभेदार सुंभाटे जयबा राजाना मिळाला त्यांना डहाणू तालुक्यातील गंभीरगडाची सुभेदारी देण्यात आली.

जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार/सामंत होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी ३१ लहान किल्ले जिंकले. त्याच सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला. नंतर भूपतगडला जव्हार संस्थानची राजधानी करण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. तेव्हाच जव्हार साम्राज्यची उभारणी झाली. जव्हारच्या इतिहास मध्ये सर्वात पराक्रमी राजा म्हूणन धुळाबारावची ओळख आहे. मुबारक खिलजीने दिल्लीकडे जाताना जव्हारवर स्वारी करण्यास फौज पाठवली, त्यांचा धुळाबारावने पराभव केला. पुढे मोहम्मद तुघलक जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा त्याने जव्हारवर स्वारी केली. तुघलकच्या प्रचंड सैन्यासमोर धुळाबाराव यांचा टिकाव लागला नाही.

भूपतगड किल्ला हा जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याने खूप काळ राजवैभव पाहिले आहे. जव्हार संस्थान हे ठाणे जिल्ह्यात असून तेथे पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग आहे. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोद गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे. जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो.

भूपतगडाची उंची 1600 फूट असून वरचा पठारी भाग हा 6 ते 7 एकर मध्ये आहे. भूपतगडाच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे. भूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकी समूहातील एकाच टाकीचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास किल्याचा बरासा भाग नामनेष झाला असून या वैभव शाली किल्याच्या इतिहास जिवंत ठेवण्यासाठी उर्वरीत शिल्लक असलेले अवशेष जतन करण्याची नितांत गरज आहे

Updated : 6 Sep 2022 11:56 AM GMT
Next Story
Share it
Top