Home > मॅक्स रिपोर्ट > स्मशानभूमी अभावी राष्ट्रीय महामार्गावर अंत्यविधीची वेळ

स्मशानभूमी अभावी राष्ट्रीय महामार्गावर अंत्यविधीची वेळ

प्रजासत्ताक दिनाच्या 73 या वर्षात प्रवेश करताना नागरिकांना आजही मूलभूत सेवा आणि अधिकारांसाठी झगडावे लागत आहे.स्मशानभूमी नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील घोडेश्वर येथे मातंग समाजाला नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..

स्मशानभूमी अभावी राष्ट्रीय महामार्गावर अंत्यविधीची वेळ
X

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून या समाजाला देण्यात आलेल्या 20 गुंठा जागेपैकी 10 गुंठे जमीन नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे.तर राहिलेल्या 10 गुंठा जागेवर अतिक्रमण झाल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत 4 ते 5 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.अशी माहिती येथील रहिवाशी महादेव कसबे यांनी दिली.ग्रामपंचायतीकडे वारंवार जागेसंदर्भात निवेदने देऊन देखील ग्रामपंचायतीने दखल घेतली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती घोडेश्वर/बेगमपूर येथील मातंग वस्तीतील रहिवाशांनी दिली.

स्मशानभूमीची सात बारा उताऱ्यावर नोंद पण जागेचा फेरफार उतारा मिळेना

सन 1975 - 1976 सलापासून मातंग समाज,रामोशी समाज,मुस्लिम समाज गट नंबर 1/1 मधील जमीन अंत्यविधीसाठी वापरत आहेत.यातील 50 गुंठे जमीन मुस्लिम समाजाला देण्यात आली.तर मातंग व रामोशी समाजाला 20 गुंठे जमीन देण्यात आल्याची नोंद आहे.परंतु या समाजाला देण्यात आलेल्या जागेचा फेरफार उतारा मिळेना गेला आहे.स्मशानभूमीसाठी 2010-2015 साली मातंग व रामोशी समाजाला पत्रा शेड मंजूर झाले होते.पत्रा शेडसाठी पाया खोदण्याच्या कामाला सुरुवात ही करण्यात आली होती.परंतु अचानक पाया खोदण्याचे काम थांबण्यात आले.काम प्रलंबित राहिल्याने स्मशानभूमीसाठी आलेला निधी माघारी गेला व त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.अशी माहिती महादेव कसबे यांनी दिली.





ग्रामपंचायतीकडून गटविकास अधिकाऱ्याच्या पत्राला केराची टोपली का ?

घोडेश्वर/बेगमपूर येथील रहिवासी असलेले महादेव कसबे यांनी 15 फेब्रुवारी 2021 रोजी स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याची मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.त्या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी 25 मार्च 2021 रोजी घोडेश्वर ग्रामपंचायतीला पत्र पाठवून संबंधित जागेवरील अतिक्रमण काढून उचित कार्यवाहीकरून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास पाठवावा असे म्हटले होते.परंतु संबंधित ग्रामपंचायतीने गटविकास अधिकार्याच्या पत्राला केराची टोपली दाखवली असून 10 गुंठा जागेवरील अतिक्रमण जैसे थे आहे.असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रात काय म्हटले होते

मौजे घोडेश्वर येथील गावठाण हद्दीमध्ये गट नंबर 1/1 मध्ये मातंग व रामोशी समाजाची 0.20 आर इतकी स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित आहे.सदर गट नंबरचा 7/12 पाहिला असता सदर स्मशानभूमीची नोंद आहे.सदरच्या स्मशानभूमीतून पूर्व-पश्चिम चालीचे 10 गुंठे क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 करिता संपादित झालेले आहे.त्यामुळे सदरची स्मशानभूमी दोन हिश्श्यामध्ये विभागलेली असून उत्तरेकडील बाजूचे क्षेत्र 15 गुंठे शिल्लक राहिलेले आहे.सदर शिल्लक राहिलेल्या क्षेत्रामध्ये स्थानिक व बाहेरील व्यक्तींनी सिमेंट पोल व पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण काढण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये तक्रारी अर्ज सादर आलेला आहे. सबब महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 53 अन्वये ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी ग्रामपंचतीची असल्याने सदर बाबत योग्य ती उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे गटविकास अधिकारी यांनी पत्रात म्हटले होते.

पाच व्यक्तींच्या मृतदेहावर राष्ट्रीय महामार्गावर अंत्यसंस्कार

यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना घोडेश्वर येथील रहिवासी महादेव कसबे यांनी सांगितले की,गेल्या 13 जानेवारीला भाऊसाहेब तुकाराम अष्ठूळ यांचे निधन झाले होते.त्यांचे प्रेत रस्त्यावरच जाळण्यात आले.आमची स्मशानभूमीची जागा 20 गुंठे आहे.10 गुंठे जागा राष्ट्रीय महामार्गात गेली आहे.तर राहिलेल्या 10 गुंठा जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार ग्रामपंचायतीला पत्र देऊन समक्ष भेटून पाठपुरावा केला.परंतु ग्रामपंचायतीने काहीच हालचाल केली नाही.प्रांताधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना भेटलो.त्यांच्याबरोबर वारंवार पत्रव्यवहार केला.तरीसुद्धा आमची दखल घेतली गेली नाही.त्यामुळे आम्ही 5 व्यक्तीच्या मृतदेहाचे राष्ट्रीय महामार्गावर अंत्यसंस्कार केले.तरीही ग्रामपंचायतीने आमचा काहीच विचार केला नाही.त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिले.त्यांनी तात्काळ पावले उचलून कामती पोलीस स्टेशनला पाऊले उचलण्यास सांगून त्याप्रमाणे कामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने यांनी थोड्याफार प्रमाणात स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यास मदत केली.





ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ

गटविकास अधिकारी यांना सुद्धा आम्ही पत्र दिले.त्यांनी ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला.तरीही ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ केली आहे. तहसीलदार यांनी ही ग्रामपंचायतीला पत्र देऊन स्मशानभूमीचा प्रश्न मिटवा असे सांगितले होते.त्याहीवेळेस ग्रामपंचायतीने काहीही कार्यवाही केलेली नाही.जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर 2 दिवसात सीईओना पाठवून देतो.असे आश्वासन देण्यात आले होते.परंतु आजही त्यांची आम्ही वाट पहात आहोत.ग्रामपंचायतीने 2 ते 3 गुंठा जागेवरची झाडे काढली आहेत. परंतु आमची 10 गुंठा जागा शिल्लक असून त्या जागेवरचे पूर्ण अतिक्रमण काढणे आवश्यक आहे.असे महादेव कसबे यांनी बोलताना सांगितले.

ग्रामपंचायतीने आमची दखल घेतली नाही

आम्ही 4 मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर जाळले आहेत. आमची कोणीच दखल घेतली नाही.ग्रामपंचायतीमध्ये आम्ही महिला,लहान मुले गेलो होतो.तेथील ग्रामसेवक यांनी स्मशानभूमीचा प्रश्न 5 ते 7 दिवसात मार्गी लावतो असे म्हटले होते.आतापर्यंत त्यांनी काहीही करून दिले नाही.आम्ही सर्व ठिकाणी फिरलो पण आमची कोणी दखल घेतली नाही.त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटलो असे घोडेश्वर येथील रहिवासी पांडुरंग जाधव यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीमधून आम्हाला माघारी लावले जाते

सिंधू पांडुरंग खंडागळे या महिलेने बोलताना सांगितले की,बेगमपूर ग्रामपंचायत आमचा भाग घेत नाही.त्यामुळे तीन वेळा आम्ही ग्रामपंचायतीला जातो.पण आम्हाला माघारी लावले जाते.आम्ही मृतदेह रस्त्यावर जाळत असल्याचे पाहून मोहोळच्या लोकांनी आमचा विचार केला.

गावात असलेल्या इतर स्मशानभूमीचा मातंग समाजाने अंत्यविधीसाठी उपयोग करावा तहसिलदार

गावात असलेल्या इतर स्मशानभूमीचा वापर मातंग समाजाने मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी करावा.येत्या 27 जानेवारी रोजी यासंदर्भात मिटींग बोलावण्यात आली आहे.यावर निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल.असे मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसें-पाटील यांनी सांगितले.

दोन ते तीन गुंठा जागेवरची काढली झाडे

ग्रामसेवक हरी पवार यांनी सांगितले की,दोन ते तीन गुंठा जागेवरची झाडे काढली असून 20 गुंठा जागेची सात बारावर नोंद आहे परंतु फेरफार उतारा आढळून येत नाही.


Updated : 30 Jan 2022 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top