Home > मॅक्स रिपोर्ट > आम्हीही माणसे आहोत, जनावरं नाही, गढूळ पाण्याने नारंगी ग्रामस्त रोगराईच्या विळख्यात

आम्हीही माणसे आहोत, जनावरं नाही, गढूळ पाण्याने नारंगी ग्रामस्त रोगराईच्या विळख्यात

देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात औद्योगीकीकरण झपाट्याने वाढत असले तरी जिल्ह्यातील अनेक गावे, आदिवासी वाड्या वस्त्या आजही पाण्यासाठी वणवण भटकंती करतायेत.अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा यामुळे खालापूर तालुक्यातील दहागाव छत्तीशी विभागातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडी, बौद्ध वस्ती,देवकुंडाची आदिवासी वाडीतील रहिवाशी, नवीन वसाहतीमधील ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. आम्ही देखील माणसं आहोत, जनावरं नाहीत, आम्हाला शुद्ध पाणी हवी अशी आर्त हाक गावकऱ्यांनी दिलीय... आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

आम्हीही माणसे आहोत, जनावरं नाही, गढूळ पाण्याने नारंगी ग्रामस्त रोगराईच्या विळख्यात
X

मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात औद्योगीकीकरण झपाट्याने वाढत आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक गावे, आदिवासी वाड्या वस्त्या आजही पाण्यासाठी वणवण भटकंती करतायेत.अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा यामुळे खालापूर तालुक्यातील दहागाव छत्तीशी विभागातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडी, बौद्ध वस्ती,देवकुंडाची आदिवासी वाडीतील रहिवाशी, नवीन वसाहतीमधील ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. आम्ही देखील माणसे आहोत, जनावरे नाहीत, आम्हाला शुद्ध पाणी हवे अशी मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व आदिवासी बांधवांना पाणी विकत घेणे परवडत नसल्याने नागरिक संतप्त झालेत.

कायम अनियमित व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने लहान मुले,महिला,वृद्ध ग्रामस्त यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठलेत, खरूज सारखे त्वचा रोग निर्माण झालेत. अशुद्ध पाणीपुरवठा तसेच खराब रस्ते, अपूर्ण पथदिवे आणि इतर समस्यांबाबत ग्रुपग्रामपंचायत नारंगी चे लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रायगडच्या उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना देण्यात आलेय, गढूळ पाणी शरीराला हानिकारक असल्याने नारंगी मधील संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून देण्यात आले.

गेल्या १४ ते १५ वर्षांपासून आम्हाला वापरासाठी आणि पिण्यासाठी नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास नारंगी ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरले असून या दूषित पाण्यामुळे गावातील काही लहान मुले, महिला, पुरुषांना चर्मरोगाच्या व्याधी झाले असल्याचे आढळून आले आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामसभा, आमसभा आणि व्यक्तिशः सरपंच, उपसरपंच यांना तोंडी विनंत्या करून देखील आमच्या तकरीची दखल घेण्यात आली नाही उलट सरपंच, उपसरपंच यांच्याकडून उडवाउडवीची बेजबाबदार उत्तरे ऐकायला मिळत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तसेच वारंवार विनंती करूनही गेल्या १४ ते १५ वर्षांपासून देवाची कुंड आदिवासी वडी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी रोज दीड ते दोन किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. त्याच प्रमाणे दलित वस्ती, आदिवासी वाडी आणि नवीन वसाहत यांना पाणी पुरवठा होत असलेल्या नदीचे पाणी ज्या कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे प्रदूषित होते अशा कंपन्यांवर नारंगी ग्रुपग्रामपंचायतीकडून का करण्यात आली नाही याबाबत सदर कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे दूषित झालेल्या नदीच्या पाण्याचे नमुने हे प्रयोगशाळेत गुणवत्ता मोजण्यासाठी पाठवण्यात येऊन चाचणी अहवालात दोष सापडले तर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. यावेळी निनाद गायकवाड, रमेश गायकवाड, वैशाली देशमुख, शुभांगी देशमुख, गुलाब वाघुले, सुप्रिया वाघुले, मंगल वाघमारे, सुवर्णा गायकवाड, प्राजक्ता गायकवाड, उज्ज्वला गायकवाड आणि नारंगी गावचे ग्रामस्थ यांनी सरकारने आम्हाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळवून द्यावे, व आम्हाला रोगराई पासून मुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

यासंदर्भात आम्ही नारंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच उद्धव देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की बौद्धवाडी व आदिवासी वाडी यांना पुरवठा करण्यात येणारे बालगंगा नदीचे दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, जुनी पाणीपुरवठा योजना पूर्ववत करणार आहोत, याठिकाणी असलेले व गावाला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत प्रदूषित झाले आहे, जवळपासच्या कारखान्यातील रसायन व केमिकलयुक्त दूषित पाणी यामध्ये मिसळत असल्याने रोगराई पसरत आहे, आम्ही महाराष्ट्र्र राज्य प्रदूषण महामंडळाकडे सदर जलप्रदूषणाबाबत तक्रार दिली आहे, त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केलीय.

गावाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे, जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. या गावातील तरुण निनाद गायकवाड याने सांगितले की पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागतोय, या गावाला मागील 15 वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई चा सामना करावा लागतोय. तर आता तीन वर्षांपासून कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी मूळ स्रोत असलेल्या पाणीसाठ्यात मिसळत असल्याने आम्हाला गढूळ व दूषित पाणी येतेय, जे पाणी आम्ही पिऊ शकत नाही, यासंदर्भात आम्ही ग्रामसभा , आमसभा यामध्ये लेखी तक्रारी दिल्या, मात्र त्याला केराची टोपली दाखवली. गावचे सरपंच व उपसरपंच यांना देखील आमची व्यथा सांगितली मात्र काही एक प्रतिसाद आला नाही.आम्हाला शुद्ध आणि मुबलक आरोग्यदायी पाणी मिळावे यासाठी आम्ही जनांदोलनाच्या पावित्र्यात आहोत.

गढूळ व दूषित पाण्याने अंगावर पुरळ व डाग उठलेल्या एका तरुणाने देखील दूषित पाण्याचे गाऱ्हाणे मांडले. दूषित व गढूळ पाण्याने शरीरावर डाग पुरळ आलेत, केवळ माझ्या एकट्याच्या अंगावर नाही तर गावातील लहान मुले, वृद्ध व महिला पुरुष यांना देखील या समस्येने ग्रासले आहे, ही समस्यां घेऊन आम्ही सरपंच व उपसरपंच यांच्याकडे जातो, मात्र सरपंच यावर चकार शब्द काढत नाहीत तर त्यांचे उपसरपंच असलेले पती आमच्याशी आरेरावीची भाषा करतात, हे थांबले पाहिजे, गावातील नागरिकांना पायाभूत व मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतिने पुढाकार घेतला पाहिजे.

येथील एका महिलेने आपली व्यथा मांडताना अक्षरश रडत रडत पाण्यासाठी आमची काय दशा होते याचे वास्तव मांडले, मानवी वस्तीत मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे, मात्र येथे आम्हाला मिळणारे पाणी माणसे सोडा, गुरे जनावरे देखील पिऊ शकत नाहीत अशी परिस्तिती आहे, दूषित पाण्यामुळे लहान मुले, माणसे आजारी पडतात, शरीरावर डाग , जखमा होतात, दवाखान्यातील खर्च या महागाईत परवडत नाही असे येथील महिला ग्रामस्थाने सांगितले.

नारंगी गावातील एका वृद्ध ग्रामस्थाने मॅक्समहाराष्ट्र जवळ बोलताना सांगितले की पाण्याच्या योजना व कोणतीही स्कीम या गावापर्यंत पोहचत नाही, योजना नावाला येतात त्या फक्त कागदावर असतात, प्रत्येक्षात लोकांना याचा लाभ होत नाही, ही सगळी राजकीय लोकांची खेळी असते असे त्यांनी सांगितले.

यावेळी या प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितले की मागील अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे, वारंवार तक्रारी करूनही मुबलक व स्वच्छ पाणी देण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, पाणीप्रश्न सोडवण्यास प्रशासनाने योग्य तो पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.

यासंदर्भात आम्ही खालापूरचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांना दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात पावले उचलली जात आहेत, ग्रामस्तांना मुबलक व पूर्ववत पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. असे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी स्पष्ट केले. करीत आहे. असे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी स्पष्ट केले.

Updated : 24 Nov 2021 9:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top