Home > मॅक्स रिपोर्ट > असा दवाखाना कधी पाहिलाय का? गोठ्यात, मंडपात, झाडाखाली केले जातायेत रुग्णांवर उपचार...

असा दवाखाना कधी पाहिलाय का? गोठ्यात, मंडपात, झाडाखाली केले जातायेत रुग्णांवर उपचार...

असा दवाखाना कधी पाहिलाय का? गोठ्यात, मंडपात, झाडाखाली केले जातायेत रुग्णांवर उपचार... काय आहे सर्व प्रकार पाहा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा स्पेशल रिपोर्ट

असा दवाखाना कधी पाहिलाय का? गोठ्यात, मंडपात, झाडाखाली केले जातायेत रुग्णांवर उपचार...
X

कोणत्याही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात न जाता टायफाईड तसेच इतर साथीच्या आजारांवर महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील गावातच झाडाला सलाईन लाऊन कधी खाटेवर, तर कुठे कोपऱ्यात बसून दररोज होताहेत शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेले नंदुरबार जिल्ह्यातील शिवपूर गावात हे उपचार केले जात आहेत. या गावात कोणतंही रुग्णालय नाही. मात्र, या गावात गेल्या काही दिवसांपासून शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.

शिवपूर गावातील गोठ्यात ठिकठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कुणी झाडाच्या सावलीत, कुणी गोठ्यात, कुणी ट्रँक्टरच्या कडेला. कुणी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या छताखाली तर अनेकजण तात्पुरत्या उभ्या केलेल्या मंडपात उपचार घेत आहेत. मंडपात अंधारलेल्या ताडपत्रीवर रुग्णांना झोपवलं जात असून झाडाच्या फांद्यांना दोरांनी सलाईन्स बांधून रुग्णांना दिलं जात आहे.

कोरोनाची चाचणी शिवाय इतर ठिकाणी उपचार होत नसल्याने इतर आजारांच्या रुग्णांची गर्दी-

शिवपूर गावात पोहोचल्यावर रिक्षा, मोटारसायकल, जीप, व्हँन या वाहनांनी भरलेले दिसते. गावात प्रवेश करताच महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील 15 ते 20 गावातील रुग्णांवर इथे उपचार चालू असल्याचं दृश्य दिसतं. हे कोरोनाचे रुग्ण नाहीत, तर टायफाईडचे रुग्ण आहेत. टायफाईडचे तपासणी गावच्या जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे केली जाते.

आठशे लोकवस्तीच्या या गावातील निम्मे गाव साथीच्या आजाराने हैराण झाला. गावातील डॉ निलेश वळवी यांना गावकऱ्यांनी बोलावून आणि तंबू ठोकून इथेच तात्पुरते रुग्णालय सुरू केले. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने सर्दी, खोकला, डायरिया, टायफाईड बरा होत असल्याची चर्चा होत असल्याने आता या गावातीलच नाही तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील 15 ते 20 गावांमधील 900 हून अधिक टाईफाईडच्या रुग्णांना गेल्या गेल्या पंधरा दिवसात या ठिकाणी उपचार केल्याचे ते सांगतात.

यासाठी त्यांची टायफाईडची चाचणी केली जाते, कोविडची चाचणी मात्र केली जात नाही. इतर दवाखान्यात कोविडच्या चाचणीशिवाय प्रवेश नाही, त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून गुजरातमधील निझर तालुक्यातील सायला, मोग्रणी, टाकली, वडीली, भिलभवाली, नासेरपूर, मोगलीपाडा तसेच महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिपलोद, भवाली, शिवपूर, लोय,धानोरा धुळे जिल्ह्यातील मालपूर तसेच इतर गावातील शेकडो रुग्ण या ठिकाणी येथे उपचार घेत आहेत.

गावकऱ्यांनी उभारलेल्या मंडपासह प्रत्येकाच्या घरापुढील मंडपात रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र दिसते. अनेकजण झाडाला सलाईन अडकवून झाडाखाली बसून असलेले दिसले. एकाच कुटुंबातील अनेक जणांवर एकत्र उपचार करण्यात येत आहेत.

खाट घेऊन या आणि सलाईन लावून जा -

एकेका कुटुंबातील तीन-चार सदस्यही येथे उपचार घेत आहेत. येणाऱ्याने आपली खाट घेऊन यायची हीच अट. त्यामुळे एकच रुग्ण असलेले आणि चारचाकी नसलेले दुचाकीवर आपापली खाट घेऊन येथे येत आहेत. सकाळी ११ ते रात्री ११ असा बारा तास हा दवाखाना चालतो. दिवसाचे एका रुग्णाकडून उपचाराचे 800 रुपये घेतले जातात. त्यात त्यांना इंजेक्शन, तीन सलाईन लावले जातात. गेल्या १५ दिवसात एकही रूग्ण दगावला नसल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय.

कोरोना टेस्ट करायला रुग्ण घाबरतात, टायफाईड आणि साथरोगावरच उपचार डॉक्टरांची प्रतिक्रिया-

गावातील लोकांची परिस्थिती गंभीर असल्याने गावातच उपचार केले जात आहे. गावातील रुग्णांवर सेवा म्हणून उपचार करत आहे. रूग्ण कोरोना टेस्ट करायला घाबरतात. कोरोना टेस्ट केल्याशिवाय इतर ठिकाणी उपचार करत नाही. आवश्यक ते उपचार करून गावातील 300 रुग्ण बरे झाले आहेत. नंदुरबार येथूनही काही डॉक्टर ही उपचारासाठी येतात. एका दिवसाचे 800 रुपये फी घेतले जातात. यात सलाईन सहआवश्यक ती औषध दिली जातात. आता इतर ठिकाणाहूनही रुग्ण येत आहेत त्यांच्यावर ही उपचार केले जात आहेत.

काय आहे रुग्णांची प्रतिक्रिया?

रुग्ण सांगतात की, सरकारी तसेच खाजगी दवाखान्यात कोरोनाची भीती वाटते येथे उपचार घेतल्यावर बरा होतो. गुजरात मधील निझर तसंच उच्छल तालुक्यातील रुग्णांनी सांगितलं की, गुजरात पेक्षा महाराष्ट्रात उपचार मिळत आहेत. खाटेवर, मंडपात तसेच झाडावर सलाईन लावून उपचार होत असतांना ही रुग्णांना मात्र, समाधान व्यक्त केलं हे विशेष.

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांची प्रतिक्रिया-

नंदुरबार मध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. सर्व दवाखाने फुल आहेत. त्यातच शहरात टेस्ट करण्यासाठी लोकांना भीती वाटत आहे. साथ रोग असल्याने स्थानिक डॉक्टर निलेश वळवी यांनी टेंट टाकून उपचार केलेत. मात्र, आपण आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या आहेत की, आवश्यक ती टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे.

नंदुरबार मध्ये आरोग्य सुविधेबाबत अजूनही प्राथमिक सुविधा नाही. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण वाढलाय. त्यातच आरोग्य यंत्रणेच्या 35 टक्के जागा रिक्त आहेत. कोणत्याही मेडिकल सुविधा नाहीत. अजून पर्यंत कोणताही ऑक्सिजन प्लांट नाही. मात्र, ह्या सर्व परिस्थिती लोकांच्या आरोग्याची गाव पातळीवर काळजी घेतली जाईल. असं नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी सांगितलं.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी समाजाचे अधिकारी पदाधिकारी असूनही तसेच केंद्र आणि राज्य सरकार कोटयवधी रुपयांचा निधी आरोग्य विभागासाठी खर्च करतो.

मात्र, नंदुरबारची आरोग्य सुविधा अजुनही सलाईनवरच आहे. कोरोना महामारीत तर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे सरकार आता तरी या लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन गावाला आरोग्य सुविधा पुरवायला हव्यात. एकूणच कोरोनाचे संकट येऊन आता जवळपास १५ महिने झाले आहेत, पण शासकीय पातळीवर कोरोनासह इतर आजारांवरील उपचारांची संगती लावता आलेली नाही. पहिल्या लाटेतही इतर आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळत नव्हते, तर आता दुसऱ्या लाटेतही डॉक्टर उपलब्ध होत नाहीयेत. कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करण्याकरीता पहिल्या वर्षी लॉकडाऊन केले गेले. पण यातून नियोजनाअभावी खूप काही साध्य झालेले नाही, हे सध्याच्या चित्रावरुन स्पष्ट होते आहे. कोरोना चाचणीशिवाय इतर आजारांवर उपचार होत नाहीत, पण चाचणी करुन रिपोर्ट यायला किमान ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागतोय. त्यामुळे लोकांना कोरोना चाचणीशिवाय इतर आजारांवर उपचारांची सोय शासकीय पातळीवर झाली नसली तरी आदिवासी भागातील एका डॉक्टरने ते धैर्य दाखवल्याने अनेकांची सोय झाली आहे.

Updated : 28 April 2021 5:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top