Top
Home > मॅक्स रिपोर्ट > नांदेड- देगलूर विधानसभा निवडणूक: शिवसेना कॉंग्रेस आमने सामने

नांदेड- देगलूर विधानसभा निवडणूक: शिवसेना कॉंग्रेस आमने सामने

महाविकास आघाडीतील घटक पक्ष पोटनिवडणुकीत आमने सामने, कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनाने होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे आणि कॉंग्रेस आमने सामने, शिवसेनेचे नेतृत्व काय भूमिका घेणार? काय आहे मतदारसंघाची गणित? वाचा

नांदेड- देगलूर विधानसभा निवडणूक: शिवसेना कॉंग्रेस आमने सामने
X

नांदेड- देगलूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या देगलूर-बिलोली मतदार संघात पोट निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे . काँग्रेसकडून दिवंगत आमदार अंतापुरकर यांचा मुलगा जितेश यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपाकडून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळेल यात चुरस निर्माण झाली आहे.

इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी...

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस, भाजपा या प्रमुख पक्षांसह वंचित आणि डाव्या पक्षानेदेखील कंबर कसली आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनानंतर विधानसभेची जागा रिकामी झाली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. गावोगाव लोकांच्या भेटी-गाठीवर भर देत आहेत.

देगलूर-बिलोली मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघावर अनेक वर्षे काँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघात येत्या काळात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अनेक इच्छूकांची गर्दी पहायला मिळतेय. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत आमदार अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश यांना युवक काँग्रेसच्या सरचिटणीस नियुक्त करून जितेश यांना आगामी निवडणुकीसाठी लाँच केल्याची चर्चा आहे. तर भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंडखोरीच्या वृत्ताने माजी आमदार सुभाष साबणे बॅकफूटवर...

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत, रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा पराभव करत देगलूर-बिलोलीची जागा कॉग्रेसकडे खेचून आणली होती. सध्या विधानसभेची जागा काँग्रेसकडे असल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांची मोठी कोंडी झाली आहे. तर माजी आमदार साबणे यांनी ही जागा सेनेला मिळाली नाहीतर पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असं वक्तव्य केलं होतं. तर काही माध्यमांनी विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तर साबणे भाजपात प्रवेश करतील असे वृत्त प्रसारित केले होते. यामुळे माजी आमदार सुभाष साबणे सध्यातरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रा. उत्तमकुमार कांबळे यांची भाजपाकडे उमेदवारीची मागणी

देगलूर-बिलोली मतदारसंघात जातीचे समीकरण महत्त्वाचे आहे. मागासवर्गीय मतांच्या जोरावर उमेदवार विजय मिळवू शकतो, असे असले तरीही पक्षीय जुळवाजुळव आणि जनसंपर्काचाही मोठा फायदा इथे मिळण्याची शक्यता आहे. देगलूर येथे अनेक वर्ष अध्यापन करत सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या प्रा.उत्तमकुमार कांबळे यांनी जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांना माजी विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे निवडणूक रिंगणात

यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे यांच्याकडे ग्रामीण भागातील जनसंपर्क आहे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे मार्गदर्शन असल्याचीही चर्चा आहे. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या निवृत्ती कांबळे यांना निवडणूक लढविण्याचा दांडगा अनुभव आहे.

नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष धोंडिबा कांबळे देखील इच्छुक

तर देगलूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष धोंडिबा कांबळे यांनीही भाजपाकडे तिकीट मगितल्याचे त्यांनी सांगितले, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षे देगलूर शहरातील समस्या सोडण्यात आपल्याला यश मिळाले यापुढे विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्यावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले.

मारोती वाडेकर यांच्या ग्रामीण भागात भेटी गाठी

भाजपाचे पदाधिकारी मारोती वाडेकर यांनी यापूर्वी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, मतदार संघातल्या विविध प्रश्नांची जाण आणि मोठ्या जनसंपर्काच्या आधारावर जोरावर आपण विजयी होऊ असे सांगत मारोती वाडेकर यांनी सांगितले. भाजपा वरीष्ठांकडे उमेदवारी मगितली आहे. मी भाजपा पक्षाशी बांधील आहे. निश्चितपणे पक्ष माझ्या कार्याची दखल घेईल. निवडणुका येतील जातील. मात्र. मी पक्षासोबत राहील असं देखील त्यांनी सांगितलं.

वंचित आघाडीच्या मतदारसंघात बैठका

वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी देखील केली जात आहे. त्यासाठी मतदारांचे मत जाणून घेतलं जातं आहे.

देगलूर बिलोली मतदार संघाचे जातीय समीकरण-

लिंगायत- 45 हजार

बौद्ध - 44 हजार

धनगर- 35 हजार

मुस्लिम- 40 हजार

मातंग- 31 हजार

मराठा- 32 हजार

गोलेवार- 15 हजार

हटकर- 15 हजार

इतर- 58 हजार

एकूण 3 लाख 15 हजार इतके मतदान आहे.


लिंगायत- 43 हजार

बौद्ध - 42 हजार

धनगर- 31 हजार

मुस्लिम- 38 हजार

मातंग- 29 हजार

मराठा- 31 हजार

गोलेवार- 11 हजार

हटकर- 10 हजार

इतर- 54 हजार

एकूण 2 लाख 96 हजार 549 इतके मतदान आहे.

काय आहेत देगलूर- बिलोली मतदारसंघातील समस्या-

देगलूर बिलोली मतदारसंघात मागच्या तीन दशकापासून सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. देगलूर येथील लेंडी प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला आहे, या प्रकल्पांतर्गत दोन्हीही तालुक्यातील शेती आणि अनेक गावांना पाणी मिळणार आहे.

करडखेड तलावाचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. या मतदारसंघात दोन्ही तालुक्यात एमआयडीसी विकसित झालेली नाही त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही. यासोबतच हा भाग तेलंगाणा आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे रोजगारासाठी इथले नागरिक तेलंगाणा आणि बिदर (कर्नाटक) येथे ये-जा करीत असतात.

एकंदरीतच देगलूर मतदारसंघात लिंगायत समाजासह मागासवर्गीय मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे. प्रामुख्याने या मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीच्या जनसंपर्कावरून मतदारांचा कल मिळतो असे चित्र आहे. तेलंगाण व कर्नाटक सीमेवरचा हा भाग असल्यामुळे इथे दोन्हीही राज्याशी दळणवळण, रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर आहे. मतदार संघात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे येथील तरुण कामासाठी शेजारच्या तेलंगाणात जातात. रस्ते, औद्योगिकरणाच्या बाबतीत हा मतदारसंघ अजून मागे आहे .


Updated : 2021-05-30T23:43:03+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top