Home > मॅक्स रिपोर्ट > Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गासाठी नागरिकांनी मांडले रस्त्यावर ठाण

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गासाठी नागरिकांनी मांडले रस्त्यावर ठाण

विधानसभेचं अधिवेशन असो की गणेशोत्सव प्रत्येक वेळी मुंबई-गोवा महामार्गावर चर्चा होते. नेमकी ही चर्चा का होते? नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर का मांडले ठाण? काय आहेत नागरिकांच्या मागण्या? याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशिल सावंत यांचा रिपोर्ट वाचायलाच हवा.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गासाठी नागरिकांनी मांडले रस्त्यावर ठाण
X


विधानसभेचे अधिवेशन असो की वेगवेगळ्या निवडणूका. प्रत्येक ठिकाणी महत्वाचा ठरतो तो प्रश्न म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था. हा महामार्ग दुरुस्त करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. आंदोलनं केली जात आहेत. पण तरीही हा महामार्ग पुर्ण झाला नाही. त्यापार्श्वभुमीवर माझे पेण या संघटनेने थेट महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे हा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत ४७१ किलोमीटरचा समावेश आहे. त्यापैकी पळस्पे ते इंदापूर हा पहिल्या टप्प्यातील ८४ किलोमीटरचे अंतर आहे. मात्र गेल्या सहा ते सात वर्षांपासून पहिल्या टप्प्याचेच काम पुर्ण झाले नाही. इंदापूर ते कशेडी हा ७७ किलोमीटर लांबीचा चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्याचेही काम मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. हे दोन्ही टप्पे रायगडमधून जातात. मात्र मृत्यूचा सापळा म्हणून ओळखले जाणारा महामार्ग केव्हा सुधारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेरी वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग नादुरुस्त आहे. या काळात अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची यादी मोठी आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम पुर्ण करण्यासाठी सामाजिक संघटना, पत्रकार आणि राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. मात्र आता पुन्हा एकदा माझं पेण या संस्थेने राष्ट्रीय महामार्गाच्या नतुनीकरणासाठी पशू संवर्धन कार्यालयाजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महामार्ग आंदोलनात वेशभुषा करून आलेला यमदूत सर्वांचे आकर्षण ठरत होता.

या आंदोलनात सामाजिक संघटनांबरोबर राजकीय पक्षांच्या नेते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच या महामार्गाची दुर्दशा पाहून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास म्हणजे नौका नयनाचा अनुभव घ्यावा, असं असल्याच्या प्रतिक्रीया आंदोलकांनी दिल्या.

काय आहेत मागण्या ?

  • पळस्पे ते इंदापूर संपूर्ण रस्ता, वडखळ गाव आणि वडखळ बायपास तसेच धरमतर पर्यंतचा रस्ता तात्काळ नूतनीकरण करण्यात यावा.
  • महामार्ग पुर्णपणे पेवर ब्लॉक मुक्त असावा.
  • नियोजन शून्य आरेखनाबाबत प्लॅनिंग एजन्सी फिल फिशरमन प्रभू (जे.यु) यांना टर्मिनेट करावे.
  • अत्यंत निकृष्ट काम करून प्रशासन व महामार्ग प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर फसवणूकीच्या आरोपखाली कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात योग्य एजन्सीच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी.
  • महामार्गाच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघड करावा.
  • पेण शहराचे दोन भाग करणारा भरावाचा उड्डाणपूल काढून तेथे आरसीसी कॉलमचा उड्डाणपूल टाकण्यात यावा.
  • पेण शहराकडून अलिबागकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिजला जोडणारा रस्ता नियोजन शून्य आहे. त्यावर एसटी व इतर अवजड वाहने चढविताना अक्षरशः कसरत करावी लागते. त्याची दिशा पूर्णपणे बदलून पेण शहराच्या कमानी कडून तो ओव्हर ब्रिजला जोडावा अथवा योग्य ते बदल करण्यात यावा.
  • वाशी व गडब नाका येथे उड्डाण पूल उभारावा.
  • बारा वर्षात महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
  • पळस्पा फाटा, खारपाडा टोल नाका, पेण शहर व इंदापूर येथे रस्त्यालगत 6 फुट x 6 फुट चे बोर्ड लावून त्यावर कंत्राटदार कंपनीचे नाव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण इंजिनियरचे नाव त्यांचे फोन नंबर तसेच कार्यालयाची ईमेल आयडी व रस्त्याच्या गॅरंटीची मुदत मोठ्या व स्पष्ट अक्षरात लिहिलेले असावे.

मुंबई-गोवा महामार्ग एन एच ६६ या पनवेल ते इंदापूर या महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरु असले तरी ते पुर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अनेकजण अपंग झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलन केले होते. मुंबई-गोवा महामार्ग तब्बल दोन तासाहून अधिक वेळ अडवला होता. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यशवंत घोटे यांनी तातडीने खारपाडा ते कासू या दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.


Updated : 17 Oct 2022 1:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top