'माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये'
Max Maharashtra | 3 April 2019 10:20 AM IST
X
X
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. कारण वर्धा येथील सभेत मोदींनी कॉंग्रेसपेक्षा शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे मोदींनी यावेळी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली. ''पवारांच्या कुटुंबात कलह सुरू असून, अजित पवार पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,''. त्यावर पवारांनी मोदींना खणखणीत उत्तर दिलं आहे.
'माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये,'' असं पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात झालेल्या प्रचार सभेत बोलत होते. काय म्हणाले पवार?
'दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मोदी आमच्या कुटुंबावर बोलले. माझी आई कोल्हापुरातील होती. त्यामुळे आमच्यावर पंचगंगेच्या पाण्याचे संस्कार आहेत. घर सांभाळण्यात कोल्हापूरच्या कन्येचा कोणीच हात धरू शकत नाही. मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये. राष्ट्रवादी हा लक्षावधी लोकांनी उभा केलेला पक्ष आहे. पक्षातील पुढील पिढीवरही असेच संस्कार आहेत.'
दाल मे कुछ काला है…
‘आजवर या देशातील एकाही पंतप्रधानाने द्वेषभावनेतून कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. मोदी जिथे जातील तिथे विरोधी नेत्यांवर टीका करतात. संस्थांची प्रतिष्ठा राखण्याची खबरदारी त्यांनी घेतली नाही. गांधी घराण्यावर ते नेहमीच टीका करतात. मात्र, गांधी घराण्याने देशासाठी वैयक्तिक बलिदान दिले. मोदींच्या द्वेषबुद्धीमुळे दुसरी अपेक्षा कशी करणार? 'ना खाउंगा ना खाने दुंगा,' हे वचन मोदींनी पाळले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राफेल विमान खरेदी घोटाळा आहे. या विमानाची किंमत ३५० कोटी रुपयांवरून १६६० कोटी रुपयांवर गेली. सरकारने संसदेत याची माहिती दिली नाही. फाइल चोरीस गेल्याचे त्यांनी सुप्रिम कोर्टात सांगितले. आजवर याबाबत पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही? नक्कीच दाल में कुछ काला है.'
Updated : 3 April 2019 10:20 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire