मोदीजी मीवा डिजिटल देशमते भामरागड वांता या?

1250

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भारताला डिजिटल (Digital India) बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. भारतातील शहरांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरे स्मार्ट (Smart City) केली जात आहेत. गावा गावांना जोडण्यासाठी फोर जी, फाईव्ह जी ची नेटवर्क येत आहेत. इंटरनेट चे स्पीड आणखी कसे वाढवता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या नवीन लाईन बनवल्या जात आहेत. विमानाची संख्या वाढवण्याचा सरकार विचार करत आहे.

ही आधुनिक डिजिटल क्रांती होत असताना आदिवासी भागामध्ये एकाच आठवड्यात दोन घटना घडल्या. गडचिरोली येथील भामरागड तालुक्यातील तूर्रेमरका या गावातील रोशनी संतोष पोद्दारी या महिलेला बाळंतपणासाठी तेवीस किलोमीटर पायी जावे लागले.

इंडियात १०८ नंबर दाबला की वेगात सायरन वाजवत आजूबाजूची वाहने मागे टाकत रुग्णवाहिका (Ambulance) दाखल होते. रुग्णाला स्ट्रेचरवरून आत टाकून तितक्याच गतीने ती हॉस्पिटल मध्ये पोहोचते. या कमी काळात देखील रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात रुग्ण या कमी वेळेत जगेल का? त्याला वेळेत उपचार मिळेल का? अशी धाक धूक असते.

या आदिवासी भारतात मात्र असे नाही. रोशनी २३ किलोमीटर गुंडेनुर नदीतील पाण्यातून वाट काढून आशा वर्कर सोबत लाहेरी उपकेंद्रात पोहचली. तिला तेथून हेमलकसा येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिचे तेथे बाळंतपण झाले. डिस्चार्ज मिळाला आणि जन्मजात बाळाला घेऊन पुन्हा पाण्यातून वाट काढत आपल्या घरी पोहोचली. ही केवळ एक घटना नाही.

याच भागात याच आठवड्यात चार महिन्यांची गरोदर असलेल्या जयस्वी पोद्दारी यांच्या पोटात दुखू लागले. घरच्यांनी त्यांना खाटेवर टाकले. खांद्यावर खाट उचलून कमरेभर पाण्यातून तिला लाहेरी आणि पुन्हा भामरागड येथे पोहोचवले. डॉक्टर जयस्विला वाचवू शकले नाहीत. तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे तिचे चार वर्षाचे मुलं आहे. तिच्या प्रेताचा परतीचा प्रवास देखील खाटे वरूनच झाला.

या दोन घटना केवळ नमुन्यादाखल आहेत. असे कितीतरी मृत्यू डोळ्यादेखत पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नातेवाईकांकडे नसतो. रुग्णवाहिका नदीच्या टोकापर्यंत येऊ शकते. इतर भागात रुग्णांचा मरणाशी संघर्ष हॉस्पिटल मध्ये सुरू होतो. इथे घरातून हॉस्पिटल पोहोचणे हाच मोठा संघर्ष आहे. यातून बचावून तो हॉस्पिटल ला पोहचला तर तेथील सुविधा आणि पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात रेफर या दरम्यान रुग्ण वाचवण्याची शक्यता राम भरोसे.

भामरागड तालुक्यातील भामरागड आणि आबुजमाड दरम्यान जवळपास ४० गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्या गामध्ये कुणी आजारी असेल तर गावातच गावठी उपचार केले जातात.

ही गावे वर्षानुवर्षे पावसाळ्यात लॉक डाउन असतात. या भागात रस्त्यांचे जाळे नाही. ही व्यवस्था सुधारेल इथला विकास होईल. या आशेवर न राहता लोकांनी जगण्याचे विविध मार्ग अवलंबले आहेत. पावसाळ्यात दुकानाचे साहित्य मिळत नाही. म्हणून लोकांच्या आहारात जंगलातील भाज्या उत्पादित तांदूळ मासे खेकडे हे आढळते. बहुतांश भागात तेल आणि मीठ फक्त विकत आणले जाते.

भामरागड हा तालुका अतिदुर्गम नक्षलग्रस्त आहे. नक्षलवाद हा इथल्या विकासात बऱ्याच अंशी अडसर आहे. हे कारण खरे असले तरी या लोकांच्या जगण्याच्या हक्काचे काय? त्यांच्या आरोग्याच्या सुविधांचे काय? हे प्रश्न उरतातच.

नेता येणार म्हणून एका रात्रीत पूल उभा करणाऱ्या सरकारला येथील नद्यांवर पूल बांधणे शक्य नाही. यावर जनतेनी विश्वास कसा ठेवायचा? मोठमोठे टॉवर उभा करणारे मुंबईतील रस्त्यावरून वेळ वाचावा म्हणून आक्राळ विक्राळ समुद्रात सी लिंक बांधणाऱ्या मोठमोठाले पुतळे उभे करणाऱ्या आपल्या सरकारला भामरागड येथील नद्यांवर पूल आणि रस्ते बनवता येत नाही? असे प्रश्न पडून भामरागड येथील नागरीक सरकारला प्रश्न विचारत आहेत. मोदीजी डिजिटल देशमते भामरागड वांता या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here