Home > मॅक्स रिपोर्ट > बोगस कलाकारावर मंत्र्याची मेहेरबानी, ना.गो गाणार यांनी केली चौकशीची मागणी

बोगस कलाकारावर मंत्र्याची मेहेरबानी, ना.गो गाणार यांनी केली चौकशीची मागणी

गेल्या आठवड्यापासून मॅक्स महाराष्ट्रवर जे जे तील बोगस कलाकाराच्या बोगसगिरीचे खुलासे करण्यात येत आहेत. मात्र झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारचं याकडे दुर्लक्षच सुरू आहे. त्यामुळे बोगस कलाकारावर मंत्र्यांचीच मेहेरबानी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्याचाच वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा Exclusive रिपोर्ट....

बोगस कलाकारावर मंत्र्याची मेहेरबानी, ना.गो गाणार यांनी केली चौकशीची मागणी
X

गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने बोगस कलाकाराच्या बोगसगिरीचा खुलासा मॅक्स महाराष्ट्रवर करण्यात येत आहे. मात्र सरकारने अजूनही दखल घेतली नाही. त्यामुळे बोगस कलाकाराला आशीर्वाद कुणाचा याचा शोध मॅक्स महाराष्ट्रने घेतला आणि त्यात आम्हाला बोगस कलाकारावर प्रशासकीय अधिकारी आणि मंत्रीच मेहेरबान असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

आधी जे जे तील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाचं प्रभारी संचालक पद बोगस पद्धतीने निवडल्या गेलेल्या राजीव मिश्रा यांना देण्यात आलं. पण त्यानंतर राजीव मिश्रा यांना हटवण्यात आलं आणि सरकार बदलताच मंत्र्यांच्या मेहेरबानीमुळे राजीव मिश्रा यांना पुन्हा प्रभारी कला संचालक पद देण्यात आल्याची माहिती मॅक्स महाराष्ट्रच्या हाती लागलीय.

विनोद तावडे हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना आधीच बोगस पद्धतीने प्राचार्य पद देण्यात आलेल्या राजीव मिश्रा यांना कला संचालनालयाचं प्रभारी संचालक पद देण्यात आलं. त्यानंतर प्रोफेसर बक्षी यांचा रिपोर्ट, सुनिल खैरनार यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र 2020 मध्ये कला संघटना आक्रमक झाल्यानंतर उदय सामंत यांनी राजीव मिश्रा यांच्याकडील प्रभारी कला संचालक पद काढून घेतले आणि विश्वनाथ साबळे यांच्याकडे कला संचालनालयाचा पदभार देण्यात आला.





राजीव मिश्रा यांच्याकडील पदभार काढून घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच राज्यातील सरकार बदललं आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच बोगस कलाकार असलेल्या राजीव मिश्रा यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची मेहेरबानी झाली आणि राजीव मिश्रा यांच्याकडे पुन्हा प्रभारी कलासंचालक पद देण्यात आलं.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने विधानपरिषदेचे माजी आमदार नागोराव गाणार यांची प्रतिक्रीया जाणून घेतली. यावेळी त्यांनी कला संचालनालयात चुकीच्या पद्धतीने पदोन्नती आणि निवड झाल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी नागोराव गाणार यांनी केला.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने चंद्रकांत पाटील यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पीएने चंद्रकांत पाटील हे बैठकीत असल्याचे सांगत प्रतिक्रीया दिली नाही.




आधी विनोद तावडे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही राजीव मिश्रा हे पात्र नसतानाही त्यांची निवड केली. मात्र उदय सामंत यांनी राजीव मिश्रा यांना पदच्यूत केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राजीव मिश्रा यांना पुन्हा पद देण्यामागे नेमकं कारण काय? चंद्रकांत पाटील यांचे राजीव मिश्रा यांच्यासोबत नेमकं काय आहे कनेक्शन? कला संचालनालयात पदभरती, पदोन्नती आणि निवड पद्धतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागोराव गाणार यांनी केला आहे. त्यामुळे राजीव मिश्रा नावाच्या बोगस कलाकाराची उच्च स्तरीय चौकशी करून दुध का दुध करण्याची मागणी नागो गाणार यांनी केली आहे.

Updated : 23 Sep 2023 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top