Home > मॅक्स रिपोर्ट > मेळघाटातील गावांमध्ये पाण्याचे भीषण वास्तव : सागर तायडे

मेळघाटातील गावांमध्ये पाण्याचे भीषण वास्तव : सागर तायडे

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याचे भीषण वास्तव आहे. वीज, पाणी, रस्ते यापासून अनेक गावं वंचित आहेत सागर तायडेंनी या समस्यांचा घेतलेला आढावा वाचा या रिपोर्टताजमधे....

मेळघाटातील  गावांमध्ये पाण्याचे भीषण वास्तव : सागर तायडे
X

धारणी आणि चिखलदरा अशी दोन तालुके मिळून मेळघाट उदयास आले. दोन तालुके मिळून जवळपास 324 गावे आहेत. सातपुडा पर्वत रांगेने वेढलेला मेळघाट आदिवासी बहुल भाग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून 1974 मध्ये नावारूपास आला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या 9 व्याघ्र प्रकल्पा पैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचा समजला जातो. तर चिखलदरा थंड हवेचे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

मेळघाटातील प्राणी संरक्षणासाठी आणि कुपोषण थांबवण्यासाठी अनेक विभागांचा कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र दोघांनाही वाचवण्यात सदर विभाग अपयशी ठरत आहेत. मेळघाटला कुपोषण, माता मृत्यू बालमृत्यू, बेरोजगारीचा लागलेला कलंक गेल्या 75 वर्षातही पुसला गेला नाही. यातीलच एक खडीमल गाव. या गावामध्ये बस जात नाही. कारण गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. गावातील दगडांच्या रस्त्यांवर कडेला बस स्टॉप दिसून येतात. मात्र या रस्त्यांवर आजपर्यंत कधीच लालपरी धावलेली नाही असे स्थानिक सांगतात.






खडीमल गाव अजूनही इतरही मुलभूत व पर्यायी सोयी-सुविधा पासून वंचित आहे. गावाची लोकसंख्या 1500 च्या जवळपास आहे. पण उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची दैना होते. गावात दोन विहिरी आहेत. एक गावशेजारी तर एक किलोमिटर अंतरावर दुसरी विहीर आहे. तरीही उन्हाळ्यात गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याने भरलेला टँकर विहिरीत सोडण्यात येतो. त्यानंतर याठिकाणी नागरिकांची झुंबड उडते. सोशल माध्यमांवर शेयर झालेले व्हिडिओ धडकी भरवणारे होते. त्या व्हिडिओची दखल घेत प्रशासना मार्फत 36 लाखांची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र गावात अद्यापही पाणी पोहचू शकलेल नाही.


कोट्यावधीच्या योजना मात्र त्याही अपयशी

गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं यासाठी दोन हापशी, चार विहिरी, एक तलाव आणि पाण्याची पाइपलाइन अशा योजना आखण्यात आल्या होत्या. सोबतच पाण्याची टाकी उभारण्यात आली. इतक्या योजना आणि कोट्यवधींचा खर्च गावकऱ्यांना पाणी देण्यास फोल ठरताणा दिसून येतात. गावातील महिला वृद्धांना आणि शाळेचे विद्यार्थी डोक्यावर दोन हंडे घेऊन किलोमिटर अंतरावरून पाणी आणावं लागत. दिवसातून अनेक फेऱ्या मारून आणलेलं पाणी अपुर पडत. 70 वर्षाची गंगा चन्नू भुसूम ही महिला म्हणते "आम्ही म्हातारे झालो पण आम्हाला मुबलक पाणी मिळालेलं नाही. शुद्ध पाणी मिळत नाहीच पण जे मिळतं ते सुद्धा पुरेस नाही. गावात पोहचण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात आजारी पडलेल्या व्यक्तीला दवाखान्यात देता येत नाही" त्या म्हणाल्या.





आरोग्याचाही प्रश्न गंभीर

गावामध्ये रोजगार पासून तर अनेक मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात शहरापासून गावाचा संपर्क तुटतो. सेमाडोह पासून खडीमल गावच अंतर जवळपास 30 किलोमिटर इतकं आहे, आणि सिमाडोह पासून अमरावती शहर 100 किलोमिटर अंतरावर आहे. पावसाळ्या सुरु झाला की गावात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. त्यामुळं गावातच अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात अशी मागणी गावकऱ्यांची आहे. पण पाण्याचे संकट हे सर्वाधिक जीव घेणे आहे अस गावकरी सरकारी अनास्थेवर चिडून सांगतात. "दोन टँकरने आमचं भागात नाही. त्यात कपडे धुवायचे, सारवण करायचं, अंघोळ करायची, की पिण्यासाठी वापरायचं हा मोठा प्रश्न आहे. खडीमल रहिवासी महिला ठुगेय मुन्सी धिकार त्या सांगतात.

चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावाच्या अलिकडल्या गाव म्हणजेच नवलगाव मध्ये सौर ऊर्जेच्या साह्याने टँकर भरला जातो. त्याला खूप वेळ जातो. त्यामुळं गावातील नागरिक हंडी घेऊन टँकरची वाट बघत असतात. टँकर आला की विहिरीवर नागरिकांची झुंबळ उडते. अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. टँकर मधील पाणी फार काळ टिकत नाही. मग नागरिकांची खरी कसरत सुरू होते. गावापासून दूर पाच किलोमिटर पर्वत रांगांच अंतर कापून छोटासा पाण्याचा झरा आहे. त्यातून नागरिक एकावर एक तीन हंडे घेऊन पाणी आणतात. हा रस्ता अत्यंत खडतर आणि जंगलाचा आहे. मिळेल तशी पायवाट शोधत नागरिक मार्गक्रमण करत असतात. पण दैना काही संपत नाही. "निवडणुका आल्या की घोषणांचा पुर येतो. नेते मंडळी गावात येतात. समस्या जाणून घेतात. त्या सोडवण्याचा आश्वासन देऊन जातात. एकदा निवडणुका संपल्या की गावातल्या समस्या जैसे थे असतात. अस मंगली सरपसिंग धुर्वे म्हणाल्या.

गावामध्ये पाण्याविना अनेक योजनांना खीळ बसली आहे. घरोघरी शौचालयाचे उदिष्ट पूर्ण झाली खरी, पण पाण्याविना त्याचा उपयोग नाही. नागरिकांना गावाच्या वेशीवर शौचालयाला जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातून अनेक आजार पसरतात अस ठुगे दहिकार सांगतात. "लांबून पाणी आणताना त्यात दूषित पाण्याने अनेक आजार होतात. उलटी, हगवण, ताप येतो असे अनेक विकार जडतात. आम्हाला मोठ धरण आवश्यक आहे. गावामध्ये वीज नसल्याने रात्र अंधारात काढावी लागते" ठूगे म्हणाल्या.





बालमृत्यू आणि कुपोषित बालक जन्माला येण्यामागे अशुद्ध पाणी आणि गर्भवती महिलांमधील अशक्तपणा हे सुद्धा ऐक मोठ कारण असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले सांगतात. "खडीमल गावामध्ये पाण्यामुळे काही आजार डोकं वर काढतात. अशुद्ध पाणी प्यायल्याने टायफाइड, कावीळ अशाप्रकारचे आजार खडीमल गावामध्ये आणि मेळघाटात बघायला मिळतात. ब्लिचिंग केल्याशिवाय पाणी पिण्यासाठी योग्य

नसते. पण खडिमल गावात, टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडल्या जाते. आधीच विहिरीत गाळ असल्यामुळे ते आणखी अशुद्ध होत. ब्लिचिंग केल्यानंतरच पाणी पिण्याला परवानगी द्यायला पाहिजे. पण तस होत नाही. त्यामुळं कमी वजनाचे बालक, बालमृत्यू, मातामृत्यू आणि कुपोषणाच प्रमाण वाढत" अस डॉ.रणमले म्हणाले.

मेळघाट समस्येचं माहेरघर आहे. जिल्हा प्रशासन खेड्यापाड्यात दौरे करत नाही, तर त्यांचा अडचणी समजणार कशा अस खोज संस्थेचे अध्यक्ष बंड्या साने यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात "पाणी मिळते की नाही, ते शुद्ध आहे का? यासाठी जिल्हाधिकारी यांनी कितीदा खडीमल गावाचा दौरा केला. या लोकांच्या समस्या काय आहेत हे विचारायला कुणीतरी लागेल ना, की फक्त मतदानापुरता वापर करायचा आणि पाच वर्ष वाऱ्यावर सोडायचं हे कधी बदलणार आहे. शहरात दोन दिवस पाणी मिळालं नाही तर प्रशासन हादरत, मेळघाट स्वतंत्र मिळाल्यापासून तहानलेले असूनही प्रशासन का खडबडून जाग होत नाही" असा प्रश्न साने यांनी केला.

मेळघाटातील खडीमल सह 27 गावामध्ये उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यात खडीमल गावामध्ये सर्वाधिक म्हणजेच दिवसाला टँकरच्या तीन फेऱ्या होतात. 5000 लिटर क्षमता असलेल्या टँकरच्या तीन फेऱ्या होतात अस शासानिक आकडेवरून स्पष्ट होत. तीन फेऱ्या मिळून 15000 लिटर पाणी या गावाला पुरेस नाही. मानवी मूलभूत हक्कानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला 40 लिटर पाणी अपेक्षित आहे. पण त्यानुसार गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. पाण्याअभावी गावपातळीवरील विकासात्मक कामाना खिळ बसली आहे. स्थानिक नागरिकांचा आयुष्य पाण्याच्या अवती भवती फिरत असत. सध्या पावासाच पाणी विहिरीत साचलेले आहे. येत्या महिन्याभरात तेही संपण्याच्या मार्गावर आहे. पाण्याचे इतर स्त्रोत उपयोगाचे नाहीत.





कायम स्वरुपी पाणी प्रश्न दूर करण्याचे प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंतच्या सगळ्या योजना फोल ठरल्या असल्या तरी गादरखेदा या प्रकल्पातून खडीमल गावाचा कायम पाणी प्रश्न निकाली निघणार आहे. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबवली जाणार आहे. यातून खडीमल आणि चुरणी सह 12 गावांचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांनी सांगितले. ते म्हणाले "या संदर्भातील प्रस्ताव हा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच वर्क ऑर्डर काढून पुढील कामाला सुरवात होईल. गादरखेडा प्रकल्पातून हा पाणीू पुरवठा करण्यात येईल या कामाच्या सुरवात होण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागु शकेल" सोळंके यांनी माहिती दिली.

योजनेला अद्याप सुरवात झालेली नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक योजना हवेतच विरल्या तर अनेक योजना कागदावरच राहिल्या. त्यात एकट्या खडीमल गावावर अनेक योजनांमध्ये कोट्यवधींचा खर्च केला गेला. मात्र गावाची तहान अद्यापही पूर्ण झाली नाही.





पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यात दूषित पाण्याने त्यांचं आरोग्यही धोक्यात येत. गावामध्ये स्वच्छ पाणी मिळत नाही. त्यामुळं दरवर्षी साथीचे आजार या भागात पसरतात. काही दिवसांपूर्वीच चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी या गावात दूषित पाणी पिण्याने गंगाराम धिकार, सविता अखंडे, सुखलाल जामुनकर आणि मनिया उईके या चार जणांच्या दूषित पाणी मृत्यू झाला. पाचडोंगरी व कोयलारी या दोन्ही गावामध्ये साथीच्या आजाराचे जवळपास 400 रुग्ण आढळून आले होते. अशीच परिस्थिती इतर गावांचीही असते. स्थानिक गावकऱ्यांनी विहिरीतल दूषित पाणी प्यायल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचं सांगितलं. गावकऱ्यांच्या माहिती नुसार अशी परिस्थिती दर वर्षी येते. पण यंदा दाहकता जास्त होती असंही गावकरी म्हणाले.

Updated : 15 Jan 2023 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top