MaxMaharashtra Impact: अखेर त्या कोव्हीड योद्धे डॉक्टरांशी सरकारने साधला संपर्क

केरळमध्ये योग्य नियोजन आणि आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश मिळाले . त्यांच्या याच अनुभवाचा उपयोग मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी व्हावा याकरीता राज्य सरकारने केरळमधून 40 तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे डॉक्टर कोरोनाच्या या रुग्णांवर उपचार करत आहेत. पण या काळात या डॉक्टरांना त्यांचे वेतन मिळाले नसल्याचं आणि योग्य तो आहार देखील उपलब्ध होत नसल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्राने प्रसारित केले. त्यानंतर सरकारला या डॉक्टरांच्या तक्रारींची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकार तर्फे या डॉक्टरांना संपर्क साधण्यात आला असून बुधवारपर्यंत त्यांचे पगार करण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलेले आहे.

या डॉक्टरांच्या राहण्याची सोय अंधेरीमधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे. पण त्यांच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थच दिले जात नसल्याची तक्रार त्यांनी वारंवार हॉटेल व्यवस्थापन आणि सरकारकडे केली होती. पण त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना

प्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी जेवणात अंडी आणि मांसाहारी पदार्थ असावेत, अशी मागणी या डॉक्टरांनी केली होती. पण त्यांच्या या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले होते . त्याचबरोबर त्यांना महापालिकेतर्फे वेळेत पगारही देण्यात आलेला नाही. ज्यावेळी त्यांनी महापालिकेकडे पगाराबाबत विचारणा केली तेव्हा पालिका आयुक्तांची सही झाली नसल्याने त्यांचे पगार रखडल्याचे त्यांना सांगण्यात आले. एवढेच नाही तर धक्कादायक बाब म्हणजे आणखी पंधरा ते वीस दिवस पगारासाठी लागू शकतात, असं उत्तर त्यांना देण्यात आलं होतं. पण मॅक्स महाराष्ट्रने डॉक्टरांचा हा संघर्ष मांडला आणि त्यानंतर सरकारने तातडीने याची दखल घेत डॉक्टरांना बुधवारपर्यंत त्यांचे वेतन देण्याचे आश्वासन दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here