Home > मॅक्स किसान > मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वळवला मोर्चा

मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वळवला मोर्चा

मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वळवला मोर्चा
X

ऊस आणि दुष्काळाचा संबंध हा थेट पाण्याशी निगडीत आहे. अनेक तज्ज्ञांनी लातूरच्या दुष्काळासाठी मोठ्याप्रमाणावर केल्या जाणाऱ्या ऊस शेतीलाही जबाबदार धरलंय. ऊसाच्या शेतीसाठी मोठ्याप्रमाणावर पाणी लागतं, त्यातून पाणी पातळी कमी होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं हळूहळू लातूर जिल्ह्यातले शेतकरी ऊसापेक्षा कमी पाणी लागणारी पीकं घेऊ लागले आहेत.

दुष्काळानं बदलत चाललीय पीक पद्धती

निसर्गाचा लहरीपणा आणि वेळेवर साखर कारखान्याला ऊसच जात नसल्यानं होणारं नुकसान अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या एकूर्गा इथल्या गजेंद्र घुटे यांनी डाळिंबाची शेती करायला सुरूवात केलीय. साधारणतः वर्षभरापुर्वी घुटे हे ऊसाचं पीक घ्यायचे. मात्र, ऊसाला भरपूर पाणी लागतं आणि सततच्या दुष्काळामुळं ते देणं शक्य नाही, अशा परिस्थितीत कमी पाण्यावरच्या पीकाच्या शोधात असतांना त्यांनी डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि माळरानावरील शेतात डाळिंबाची लागवड केली. ऊसाच्या तुलनेत डाळिंबाला कमी पाणी लागतं. पण अपेक्षित पाणीही न मिळाल्यास खासगी टँकरद्वारे डाळिंबाला पाणी द्यावं लागतं, असं घुटे यांनी सांगितलं. थोड्याफार पाण्यावरही डाळिंबाची शेती करता येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दुष्काळाला ऊस शेतीचा हातभार

दुष्काळ ओढवण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये ऊसाची मोठ्याप्रमाणावर केली जाणारी लागवड हे एक महत्त्वाचं कारण आहे. गेल्या १५ वर्षांपासून ऊसाची लागवड कमी होत आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे ऊस लागवडीचं प्रमाण कमी झालेलं नाही. ऊसाची शेती करण्यासाठी पाण्याचे स्त्रोत म्हणून बोअर किंवा विहीरचं लागते. या दोन स्त्रोताव्यतिरिक्तच्या पाण्यावर ऊसाची शेती करणं अवघड असल्याचं घुटे यांना वाटतं. गेल्या १५ वर्षांपासून इथला शेतकरी हळूहळू सोयाबीन, डाळिंब यासारख्या कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळू लागलाय.

पिकांच्या नोंदी घ्यायला प्रशासन उदासीन

शेतकरी गजेंद्र घुटे यांनी डाळिंबाच्या पिकाची नोंद घेण्यासाठी वारंवार तलाठी कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, तलाठ्यानं घुटे यांच्या पिकाची नोंदच करून घेतली नाही, त्यामुळं पिक विमा भरताच आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. कामाच्या ओघात डाळिंब पिकाची नोंदच घ्यायचं राहून गेल्याचं उत्तर तलाठ्यानं दिल्याचं घुटे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं. आधीच निसर्गाशी संघर्ष करून कसंबसं डाळिंबाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या उदासीनतेचा असाही फटका बसत असल्याचं दिसतंय.

डाळिंब शेतीलाही दुष्काळाचा फटका

ऊसा पेक्षा कमी पाणी लागत असल्यानं डाळिंब शेतीकडे वळलेल्या घुटे यांना दुष्काळाचा फटका बसायला सुरूवात झालीय. कारण गेल्यावर्षी लावलेल्या डाळिंबाला यावर्षी फळ आली असती, मात्र डाळिंबालाही वेळेवर पाणी देण्यात अपयश आल्यानं डाळिंबाला फळ यायला आणखी वेळ लागणार असल्याचं घुटे यांनी सांगितलं. डाळिंबाच्या शेतीला ठिबक सिंचन करून पाणी दिलं जातंय. त्यामुळं पाण्याचा अपव्यय टाळला जातोय. शिवाय डाळिंब शेतीत आंतरपीक म्हणून भाजीपालाही घेतला जातोय. त्यातूनही आर्थिक उत्पन्न मिळण्याचं नियोजन असतं. मात्र, यावर्षी अपेक्षित पाणी नाही आणि बाजारात शेतमालालाही भावही नाही, त्यामुळं आंतरपीक घेऊनही फायदा होत नसल्याचं घुटे यांनी सांगितलं. ठिबक सिंचनासाठीचं अनुदान एक वर्ष उलटून गेलं तरीही अजून मिळालेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Updated : 10 Feb 2019 11:37 AM GMT
Next Story
Share it
Top