Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : डिजिटल इंडियातील नॉट रिचेबल गाव

Ground Report : डिजिटल इंडियातील नॉट रिचेबल गाव

काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि वॉट्सअप काही तासांसाठी बंद झाले आणि कोट्यवधी युजर्स अस्वस्थतेच्या गर्तेत ढकलले गेले....आपण जगापासून तुटलो आहोत, असा त्रास अनेकांना झाला. मात्र एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या देशात आजही अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र हा विकसित समजला जाणारा भाग...पण याच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात काही गावं अशीही दाखवणार आहोत ज्या गावात या डिजिटल युगात देखील कोणतंही मोबाईल नेटवर्क पोहचत नाही. जी गावे आजही नॉट रीचेबल आहेत. सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Ground Report : डिजिटल इंडियातील नॉट रिचेबल गाव
X


मोबाईलवर गुगलची एक जाहिरात आपण पाहिली असेल. ज्यात एक छोटी मुलगी तिच्या वडिलांना प्रश्न विचारते. वडील आपला मोबाईल काढून गुगल व्हॉईस बटन प्रेस करतात. मुलगी प्रश्न विचारते " चांद पे कौन कौन गया है ?" गुगलकडून पटकन नील आर्मस्ट्राँग म्हणून उत्तर येते. ती मुलगी दुसरा प्रश्न विचारते कोई लडकी नही गई? तिचे वडील उत्तर देतात वो तो तुम जाओगी ना ? दुसऱ्या दृश्यात तिचे वडील तिला एक गिफ्ट आणतात ते गिफ्ट बाहुली असल्याचे तिला वाटते, पण पाठीमागील हात पुढे करीत वडील चक्क चंद्रच आणल्याचं तिला सांगतात. त्यांच्या हातात टेलिस्कॉप असतो. आणि गुगल (Google) या जाहिरातीतून बोलने से सब होगा,गुगल से सवाल करके अपने सपनो को उडान दे असा मेसेज देते.

आपल्या मखमली घरातील आराम खुर्चीत बसून गुगलला प्रश्न विचारून त्याची उत्तरे जाणून चंद्रावर झेपावण्याचे स्वप्न पाहणारी चिमुकली केवळ हे डिजिटल भारताचे एक चित्र.....पण सांगली जिल्ह्यातील ताडाची वाडी सारख्या गावातून दोन किमी बाहेर डोंगराळ भागातील उंचवट्यावर नेटवर्क शोधत अभ्यास करणारे विद्यार्थी हे देखील या डिजिटल इंडियामधील चित्र.... केवळ एक फोन करण्यासाठी गावाबाहेर जावे लागणारे नागरिक, शालेय रेकॉर्ड वरिष्ठांना पाठवण्यासाठी परिसरातील टेकड्या चढून नेटवर्क शोधत घामेजलेले शिक्षक, हे आपल्या डिजिटल देशातील वास्तव आहे.

ग्रामीण भागातील अनेक गावात केवळ एक फोन करण्यासाठी नेटवर्कची वानवा आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या बानुरगड, कुसबावडे आणि ताडाचीवाडी या गावातील लोकांना फोनवर बोलण्यासाठी गावाबाहेर अडीच किमी जावे लागते. या डिजिटल युगात या गावांमध्ये अद्याप नेटवर्कच पोहोचलेले नाही.

या गावातील विद्यार्थी आकाश इंगळे सांगतो एका बाजूला शहरातील मुले बेडवर मांडीवर उशी घेऊन अभ्यास करतात, इंटरनेट सर्फिंग करतात. पण आम्हाला ऑनलाईन क्लाससाठी गावाबाहेर अडीड किमी चालत जाऊन अडचणीत, घाणीमध्ये बसावे लागते. देश डिजिटल होत आहे पण आम्हाला गावात साधे टू जी नेटवर्क मिळत नाही. गावातील अनेक विद्यार्थ्यांनी नेटवर्क नसल्याने परीक्षाच दिलेल्या नाहीत तर मध्येच रेंज गेल्याने काहींचे पेपर राहिलेले आहेत.

याच गावातील पंकज पवार हे पुण्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. कोरोनामुळे त्यांचे सध्या Work from home सुरू आहे. पण गावात नेटवर्क नाही त्यामुळे ते दुसऱ्या गावात रूम घेऊन राहत आहेत. ते सांगतात एका बाजूला देशात फाईव्ह जीची टेस्टिंग झाली आहे. पण माझ्या गावात लोकांना फोन करण्याइतपत नेटवर्क उपलब्ध नाही. यामुळे या गावांच्या विकासाचे काय ? असा सवाल ते उपस्थित करतात.

विठ्ठल पवार यांनी रेंज यावी म्हणून आपला मोबाईल उंचावर टांगून ठेवला होता. तो फोन माकडांनी उचलून नेला आणि झाडावरून आपटला. गावात काही ठिकाणी रेंज यावी यासाठी गुड्या उभाराव्या त्याप्रमाणे लोकांनी काठीला फोन टांगून ठेवले आहेत. समाधान सावंत सांगतात आमचे गाव हे सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. परिसरातील तीन गावात कसलीही रेंज येत नाही. त्यामुळे या गावांचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे येथील नागरिक मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेले आहेत.

आपले सरकार आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. पण या गावात नेटवर्क नसल्याने शिक्षकांना ऑनलाइन रेकॉर्ड पाठवण्यासाठी गावाबाहेरील टेकड्या शोधाव्या लागत आहेत. याबाबत या गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किशोर चौरे सांगतात, गावात इंटरनेट नसल्याने आमच्या शाळेतील मुलांना शिक्षणाची आधुनिक साधने वापरता येत नाहीत. कॉम्पुटरला रेंजच नसेल, स्मार्ट टिव्हीला रेंज नसेल तर त्यांचा आमच्या मुलांना काय उपयोग होणार आहे? साहजिकच ही मुले स्पर्धेच्या युगात इतर मुलांपेक्षा मागे राहणार आहेत. याचा विचार करून गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ते करतात.

इंटरनेट युगात सर्वच क्षेत्रात ऑनलाईन सुविधा देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. रेशन दुकानातील धान्य, पीक पाहणी, शालेय रेकॉर्ड, अंगणवाडीमधील माहिती याचबरोबर कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे लेक्चर्स देखील ऑनलाईन होत आहेत. परंतु ऑनलाईन म्हणून जेवढ्या सुविधा आहेत त्या सर्वांमध्ये ही गावे मागे पडत आहेत.

रेशन दुकानात ई पॉज मशीन नेटवर्क असल्याशिवाय काम करत नाही. त्याची सुविधा गावात उपलब्ध नाही. या गावांमध्ये प्रवेश करताना आपल्याला त्यांच्या अलिकडे अडीच किमी अंतरावर विद्यार्थी दगडावर, टेकडीवर उन्हामध्ये डोक्यावर छत्र्या घेऊन बसून बसलेले दिसतील. फोन करण्यासाठी आलेले काही नागरिक दिसतील. गेल्या अनेक वर्षांपासून लोक या समस्येशी झुंजत आहेत.

अत्यावश्यक सेवा मिळण्यात अडचणी

नेटवर्कमुळे अत्यावश्यक सेवाही मिळत नाहीत. रुग्णवाहिकेसाठी तात्काळ फोन लावता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो. येथील नागरिकांनी नेटवर्कच्या समस्येबाबत तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावर लवकरच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नेटवर्कची समस्या न सुटल्यास करणार आंदोलनाचा इशारा

वर्षानुवर्षे या समस्येला सामोरे जाणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या समस्या न सुटल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना सांगितले आहे. ही समस्या केवळ एक दोन गावांची नाही, पण राज्यातील अनेक गावं अशी आहेत जिथे आजही नेटवर्क पोहोचत नाहीये. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशातील सत्ताधाऱ्यांनी या गावातील डिजिटल वेदनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिक जगाशी जोडले न गेल्याने ही खेडी मुख्य प्रवाहापासून लांब राहणार आहेत. यासाठी तातडीने लक्ष देऊन या गावांची इंटरनेट समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.

Updated : 2021-10-15T12:10:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top