Home > मॅक्स रिपोर्ट > सुविधा नसलेलं गाव : 'हे गाव अजुनही पितंय, डोंगरातील पाणी'

सुविधा नसलेलं गाव : 'हे गाव अजुनही पितंय, डोंगरातील पाणी'

सुविधा नसलेलं गाव : हे गाव अजुनही पितंय, डोंगरातील पाणी
X

नळाची तोटी फिरवताच वॉश बेसिन मध्ये आवाज न करता बरसणाऱ्या पाण्याचा पाईपमधील प्रवास जितका सुखकर असतो. तितकाच वेदनादायक असतो पाणवठ्यापासून डोक्यावरच्या एकावर एक मांडलेल्या दोन हंड्यातील पाण्याचा प्रवास. जिथे पाणवठ्यावर पोहोचायला माणसांना डोंगर दऱ्या कपाऱ्यातून कसरत करावी लागते तिथे पाणी तरी अलगद घरात कसे येणार?

सातारा जिल्ह्यातील कडवे (खुर्द) या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या रेडेवाडी या डोंगर माथ्यावर असणाऱ्या गावचे ग्रामस्थ वर्षानुवर्षे डोंगरातल्या झऱ्यातून जीवघेणा प्रवास करत दररोज पाणी भरतात. त्यांच्या पूर्वजांनी डोंगरातील एका झऱ्यात दगडांनी बनवलेल्या झऱ्याने आतापर्यंत त्यांची तहान भागवली आहे. तिथं पर्यंत पोहोचण्यासाठी लोकांनी श्रमदानातून पाऊल वाट बनवली आहे.

गावकरी दिलीप शेडगे सांगतात...

'दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून आम्हाला अर्ध्या डोंगरातून पाणी भरावं लागतं. कित्येक वर्षांपासून डोंगरात पाझरत असलेला नैसर्गिक आहे. त्याने आमची तहान भागवली आहे. त्याच्यात सरकारने काहीही केलेलं नाही. उन्हाळ्यात एक हंडा भरायला आम्हाला अर्धा तास थांबावे लागते. एका तांब्याचे पाणी हंड्यात भरून हंडा घरात न्यावा लागतो'.

छोट्या तांब्याने भरलेल्या हंड्याचा प्रवास सुरू होतो. डोक्यावर हंड्याचे ओझे घेऊन पायाने दगड गोटे तुडवत स्त्रिया मुली पुरुष दररोज हा डोंगर चढतात. चुकून पलीकडे तोल गेला तर जगण्याची तसूभरही शास्वती नाही. या झऱ्यावर पाणी भरायला आलेली नववीची विद्यार्थिनी रेशमा शेडगे सांगते.

'माझे आईवडील वयस्कर आहेत. मला सकाळी पाच सहा वाजता देखील पाण्यासाठी यावं लागतं. पाणी भरल्यानंतर शाळेत जायलाही मला वेळ होतो. माझी शाळा सात ते आठ किमी असणाऱ्या मुरुड येथे आहे. तिथंपर्यंत डोंगरातील गवतातून वाट काढत मला शाळेत जावं लागतं. यामुळं गावातील मुली शाळा देखील सोडुन देतात'.

ग्रामीण भागात पाणी भरण्याचे काम बहुतांश स्त्रिया करत असतात. त्यामुळे याचा सगळ्यात जास्त त्रास हा स्त्रियांना होत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणं देखील धोक्याचं असतं. रामचंद्र शिंदे मॅक्स महाराष्ट्रला सांगतात ‘माझे आजचे वय जवळपास पन्नास आहे. मी जेंव्हा पासून बगतोय. तेंव्हापासून हीच अवस्था आहे. पाणी भरणं हे दिवसातील सगळ्यात महत्वाचं काम आमच्यासाठी आहे.

यामध्ये दिवस जातो. त्यामुळे दुसरीकडे दररोज रोजगाराला जाणं शक्य होत नाही, मे महिन्यात मागणी केल्यानंतर केवळ एक टँकर आला. तो गेला ते अजुन आम्ही टँकर पहिला नाही. प्रशासनाला हे सर्व माहीत आहे. पण ते दखल घेत नाहीत. मायबाप सरकारने आमच्यासाठी तात्काळ पाण्याची सोय करावी अशी विनंती ते करतात. सायब आणि पाणी डोंगरातून भरतो आणि गराम पंचायत आमच्याकडून पाणीपट्टी नेते अशी खंत सीताबाई शेंडगे २०१९ ची पाणीपट्टी भरलेली पावती दाखवत व्यक्त करतात.

रेडेवाडी गावात येण्यासाठी रस्त्याची सोय नाही. गावात कुणी आजारी पडले. तर डोंगरातून कसेबसे त्याला न्यावे लागते.

मूल जन्माला आल्यापासून त्याला त्रास सहन करावा लागतो. तर आयुष्यात मरणानंतर देखील गावकऱ्यांचा त्रास कमी होत नाही. गावात मयताचे दहन करण्यासाठी स्मशानभूमीची सोय नाही. पावसाळ्यात प्रेत काटीने ढोसवून जाळावे लागते.

शेतमजुरी शेती मेंढपाळ हे लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.

गावात पक्के घर शोधून सापडत नाही. मात्र, गावात एकही घरकुल योजनेचा लाभार्थी नाही. शासनाच्या अनेक योजनांपासून हे गावकरी वंचित आहेत. अंगणवाडी शाळा या प्राथमिक शिक्षणासाठी मुलांना डोंगरातून दुसऱ्या गावात जावे लागते. गावात गावठानाची जमीन नाही. रेडेवाडी ग्रामस्थांची ही अवस्था अनेक दशकांची आहे. गावकरी निवेदनं देतात. त्या निवेदनावर त्यांना आश्वासनं मिळतात.

मात्र, या डोंगराच्या खडतर पाऊलवाटेने विकास सुध्दा यायला धजावत नाही. डिजिटल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या अजेंड्यावर रेडेवाडी सारख्या खेड्यांच्या समस्यांना जागा नाही का? असा प्रश्न निर्माण होतो ? खेड्यांचा देश म्हणून जगात मिरवणाऱ्या भारत देशाला खेड्यातील या जनतेच्या वेदना स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी समजल्या नाहीत. स्मार्ट सिटीची स्वप्न पाहणाऱ्या सरकारने या खेडयातील लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे.

Updated : 9 Dec 2019 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top