Home > मॅक्स रिपोर्ट > मुलभूत सुविधा नसलेलं महाराष्ट्रातील एक गाव !

मुलभूत सुविधा नसलेलं महाराष्ट्रातील एक गाव !

मुलभूत सुविधा नसलेलं महाराष्ट्रातील एक गाव !
X

भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे. असं म्हणतात ते उगीच नाही. आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत. ज्या ठिकाणी जायला ना रस्ता आहे, ना दवाखाना आहे. इथल्या लोकांची व्यथा इथंच थांबत नाही. तर या ठिकाणच्या लोकांना पिण्यासाठी आजही पाणी नाही. मुलांना शाळेत जायला नीट रस्ता नाही. या ठिकाणी अजूनही नीट वीज पोहोचलेली नाही. मोबाईल रेंज तर नसतेच मात्र, मोबाईल चार्ज करण्यासाठी कधी कधी 4 किलोमीटर जावं लागतं. असं हे ठिकाण! या ठिकाणाचं नाव आहे. गाठेमाळ आदिवासी ठाकूर वाडी!

thakurvadi

गाठेमाळ आदिवासी ठाकूर वाडी, पाली खोपोली राज्य महामार्गापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. या राज्यमहामार्गावरुन कोकणाकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जातात. विशेष म्हणजे कोकणातील सर्व नेते मंडळी याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, 4 किलोमीटरवर असणाऱ्या गाठेमाळ आदिवासी ठाकूरवाडी कडं यांची गाडी कधीच वळत नाही. त्यामुळं हे गावं कायमच विकासापासून वंचित राहिलं.

मॅक्समहाराष्ट्रने या गावातील लोकांशी संवाद साधला. दगड गोटे तुडवत आम्ही वाडीवर पोहोचत होतो. तितक्यात तोंडावर सुरकत्या पडलेली 70 वर्षाची म्हतारी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालत होती. वाडीवर कोणीतरी नवखं माणूस येत असल्याचं तिला समजताच, ती जरा थबकली. आणि धापा टाकत आमची चौकशी केली. तेव्हा आम्ही तिला आमची ओळख करुन दिली. आणि पाण्याच्या समस्येबाबत विचारलं.

thakurvadi

म्हातारी म्हणाली...

‘जायला त्रास होतो आता, 70 वर्षे वय झालं. तरी पाणी डोक्यावर आणतो. रस्ता नसल्यानं दम लागतो. धापा टाकत पाणी आणावं लागतं. उन्हाळ्यात परिस्थिती तर अत्यंत बिकट होते. पाण्यासाठी रोज वणवण करावी लागते.’

धापा टाकत म्हातारी बोलत होती.

एका घरापासून पुढं जात असताना, एक म्हातारी बसली होती. त्या म्हाताऱ्या आजीला रोजगाराचं साधन विचारलं असता, तिने तिची कैफीयत मांडली.

‘आम्हाला जंगलात जावं लागतं, शेती करण्यासाठी पण फॉरेस्ट चे अधिकारी त्रास देतात. तसंच जगावं लागतं. शेतीत काहीच नाही’

असं म्हणत तिने सध्याच्या शेती बरोबरच वन शेतीचा मुद्दा उपस्थित केला.

आमच्या गावाला नीट रस्ता नाही. ‘म्हातारा जर आजारी पडला तर त्याला झोळी करुन न्यावं लागतं’ असं म्हणत गावात कोणीही आजारी असलं तर अशाच पद्धतीने दवाखान्यात न्यावं लागत असल्याचं म्हातारीने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

20 ते 25 वर्षाच्या एका तरुणानं आमच्या वस्तीवर लाईट कधी येते तेच कळत नसल्यानं 4 किलोमीटर वर जाऊन मोबाईल चार्ज करावा लागतो. मात्र, चार्ज केलेल्या मोबाईलला नेटवर्क नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळं महत्त्वाचा निरोप देता येत नाही. असं म्हणत गावात रेंज नसल्यानं आम्हाला जर महत्त्वाचं काही बोलायचं असेल तर डोंगऱ्याच्या कपारीला जावं लागतं. असल्याचं त्याने सांगितलं.

गावातील एक व्यक्ती आमच्याशी खूप तावा तावाने बोलत होता.

‘मला पण थोड फार कळतं. मराठी लोक येतात, म्हणतात... तुम्ही मतदान करा आम्ही तुमची सुविधा करु. मात्र, सगळी फसवणूक आम्हाला घरकूल नाही देत. आमची सगळी फसवणूक करतात. आम्ही शेती करतो, पण फॉरेस्ट लोक आम्हाला त्रास देतात. तिकडं सरकार स्थापन होत नाही... आम्ही गरीब लोक काय करणार ओ...’

एका दमात त्याने गाव ते राज्याचं राजकारण अशा लोकांचा प्रवास विषद केला.

त्यातच वसतीवर सुविधा, रोजगार नसल्यानं स्थलांतर वाढत असल्याचं गावातील नागरिक सांगतात. स्थलांतर झाल्यानं दुसऱ्या ठिकाणी गेल्यानं मुलांची शाळा सुटत आहे. मुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच पटसंख्या नसल्यानं शाळा बंद होत असल्याचं गावातील लोकाचं मत आहे.

या गावातील असुविधांबाबत आम्ही पाली सुधागडचे तहसिलदार दिलीप रायन्नावार, यांच्याशी बातचित केली असता त्यांनी...

thakurvadi

आदिवासी ठाकूर कातकरी समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या विविध योजना असून या योजनांचा लाभ दुर्बल, दुर्लक्षित घटकाला मिळावा. या उददेशाने प्रत्येक योजनेची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन काम करत आहे. सर्वसमाजघटकांचा सर्वसमावेषक विकास साधला जावा यासाठी प्रशासन कायम कटिबध्द आहे. आदिवासी बांधवांना भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातून आदिवासी वाड्यापाड्यांवर जावून आम्ही काम करण्यावर भर देणार आहोत.

असं सांगतिलं आहे.

आता या ठिकाणी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांच्या बरोबरच विकासाची किरण देखील या ठिकाणी पोहोचतील अशी आशा आहे. गाठेमाल आदिवासी ठाकूरवाडी च या समस्येच्या गर्तेत आहे असे नाही. तर अशा अनेक वाड्या अठरा विश्व दारिद्र्यात पिचत आहेत. या जनतेला यातून जर आज कोणीही बाहेर काढलं नाहीतर ही जनता फक्त मतदाना पुरतीच या देशाची नागरिक राहील. असं दुर्दैवानं म्हणावं लागेल.

Updated : 21 Nov 2019 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top