Home > मॅक्स रिपोर्ट > पुराचा गुळ व्यवसायाला मोठा फटका...

पुराचा गुळ व्यवसायाला मोठा फटका...

कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूरच्या प्रयाग चिखली या गावालाही बसला आहे. या महापुरात प्रयाग चिखली गावातील शेकडो नागरिक अडकले होते. पश्चिम महाराष्ट्राची ओळख म्हणजे ऊसाचे पीक. मात्र, या महापुराने नदी, ओढ्यांच्या काठचे ऊसाचे पीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा ? असा पेच गुऱ्हाळमालकांसमोर आहे. यंदाच्या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

त्यामुळे गुजरातसह देशातील अनेक बाजारपेठांत मोठी मागणी असणाऱ्या कोल्हापुरी गुळाला यंदा अतिवृष्टी व महापुराने मोठा फटका बसला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रात गुळाचे उत्पादन करून देण्यात चिखलीगाव अग्रेसर आहे. मात्र, यंदा पुरामुळे सर्वच ऊस वाहून गेल्यामुळे गावात असणाऱ्या ३० गुराळांना गुळ कुठून आणणारा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आसपासच्या गावातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे यंदा गुळ व्यवसाय बंद ठेवण्याची गुळ उत्पादक मालकांवर आली आहे.

या भागात गुळ व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यामुळे या गुराळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड ओढवली आहे. गुराळात रोजगारासाठी अनेक गावा- गावातून त्याचबरोबर कर्नाटक ,आंध्रप्रदेश मधून लोकं कामासाठी येत असतात. मात्र, आता पुरामुळे सर्व ऊस वाहून गेल्यामुळे त्यांच्या रोजगारावर प्रश्न निर्माण झाला आहे. महापुरामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचे नुकसान झालं आहे, ऊसाला कीड लागली आहे. गुळाचे उत्पादन घटणार आहेच; त्याशिवाय पुरात सापडलेल्या ऊसामुळे गुळाची गोडी आणि रंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

https://youtu.be/fU6fw2KHEr0

Updated : 24 Aug 2019 10:34 AM GMT
Next Story
Share it
Top