Home > Top News > देवाक काळजी रे! दुसऱ्यांदा पेरुनही उगवलं नाही...

देवाक काळजी रे! दुसऱ्यांदा पेरुनही उगवलं नाही...

देवाक काळजी रे! दुसऱ्यांदा पेरुनही उगवलं नाही...
X

यंदा वेळेवर मान्सून आल्याने आनंदीत असलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांमूळं आनंदावर विरजण आलं. राज्यात सोयाबीनच बियाणं बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच लाखो हेक्टर वरील पीक वाया गेले. यात सरकारच्या नियंत्रणात असलेल्या महाबीज बियाणांसह खाजगी कंपनीच्या बियाणांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यावर राज्यसरकारने उशिराने शेतकऱ्यांना कंपनीकडून पुन्हा बियाणं देण्याचं फर्मान सोडलं. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना आपला हंगाम वाया जाईल. म्हणून सरकारच्या निर्णयाची वाट न पाहताच पुन्हा बियाणं घेऊन दुबार पेरणीही केली.

शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा पेरणी केलेले सोयाबीन बियाणंही निकृष्ट दर्जाचं निघाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पहिल्या पेरणीचे उगवण काही ठिकाणी आलीच नाही. तर काही ठिकाणी 10 ते 15 टक्केच उगवण आल्याने शेतकऱ्यांनी अगोदरच्या पिकावर नांगर फेरून पुन्हा सोयाबीन ची पेरणी केली. मात्र, त्याची उगवण क्षमताही 20 ते 25 टक्केच आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पहिला पाऊस वेळेवर आल्याने जळगाव जिल्ह्यातील असोदा येथील राजेश चिरमाडे या शेतकऱ्याने 10 जुनलाच चार एकर मध्ये सोयाबीन ची लागवड केली. मात्र, आठ दिवस उलटूनही सोयाबीनला कोंबच फुटले नाही. बियाणं बोगस निघाल्याच व आपली फसवणूक झाल्याचं चिरमाडे यांना समजलं, त्यांच्या सारखेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातही सोयाबीन नाही.

रडत बसण्यापेक्षा पाऊस चांगला असल्याने शेतात ओल ही चांगली होती. लगेच दुबार पेरणी करत पुन्हा एकदा सोयाबीनचीच पेरणी केली. मात्र, दुसऱ्यांदा पेरणी करूनही 25 टक्केच उगवण आल्याने चिरमाडे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.

तिसऱ्यांदा आपण पेरणी करू शकत नाही. यामुळं सरकारनं पंचनामा करून संपूर्ण हंगामाचीच भरपाई द्यावी. अशी मागणी केली आहे. राजेश चिरमाडे सारखे शेकडो शेतकऱ्यांची देखील हीच परिस्थिती आहे. अर्धा हंगाम गेल्याने दुसरं पीकही कसं आणि कोणतं घ्यावं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक शेतकरी चिंतीत सापडले आहेत.

मॅक्समहाराष्ट्रने जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांच्याशी संवाद साधून सोयाबीन बियाणांची दुसऱ्यांदा केलेल्या पेरणीची उगवण क्षमता ही कमी असल्याचं निदर्शनास आणून दिले, संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभाग पाहणी करून योग्य कारवाही करेल. असे कृषी अधीक्षक यांनी संगीतले आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ह्या भागात कापूस नंतर सर्वाधिक सोयाबीन ची लागवड होते. यंदा चांगला पाऊस असूनही बोगस बियाणांमुळं शेतकऱ्यांना आपला हंगाम गमवावा लागतो आहे. शेतकऱ्यांना फक्त बियाणं बदलून देऊन प्रश्न सुटणार नाही. तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हंगामाचीच भरपाई दिली पाहिजे.

Updated : 17 July 2020 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top