Home > मॅक्स रिपोर्ट > प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

सफर या संस्थेच्या पाहणीनुसार चेंबूर, वांद्रे, कुर्ला, वरळी, अंधेरी, बोरिवली, माझगाव, मालाड, कुलाबा व भांडुप परिसरात वायुप्रदूषणात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे आढळले होते. प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होण्यात महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. आधिवेशनाच्या गर्दीत या गंभीर प्रश्नावर चर्चा झाली नाही परंतू त्यानिमित्ताने वायुप्रदुषनाच्या जीवघेण्या समस्येचा घेतलेला आढावा....

प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
X

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात मुंबईतील वायुप्रदूषणाबाबत अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या तारांकीत प्रश्नात डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत मुंबईत वायुप्रदूषणात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे आढळून आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

या कालावधीत 200 ते 309 पार्टीक्युलेट मॅटर इतकी धोकादायक आकडेवारीची नोंद झाली असून यामुळे 500 मीटरहून अधिक अंतरावरील स्पष्ट दिसत नसल्याबद्दल हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी लेखी उत्तर दिले होते. मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईसाठी तयार केलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण कृती आराखडय़ास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्रिसदस्यी समितीने मान्यता दिली असून या आराखडय़ाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

एकंदरीत प्रदुषण ही मोठी समस्या बनली आहे. धुम्रपानापेक्षा अधिक मृत्यू हे प्रदुषणामुळे होत आहे. सरकार या प्रकरणी सर्व सरकारी यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, असं पर्यावरण अभ्यासक फराह ठाकुर सांगतात.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात महत्वाकांशी समन्वीत कृती आवश्यक आहे. या समस्येचं निकारकरण करताना वरवरची मलम नको. कोविड १९ साथीपेक्षा वायुप्रदुषणामुळे अकाली मृत्यू पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रदुषणालाच महामारी समजून त्यावर उपायोजना करणे आवश्यक असल्याचे वातावरण फांऊडेशनचं म्हणनं आहे.

प्रदुषण वाढल्याने प्रामुख्यानं फुफ्फुसासंबधी आजारांमधे वाढ झाली असून त्याचे प्रमाण ३६.५ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे सीओपीडी २१.१ लोअर रेस्पीरेटरी इंफेक्शन १४.२ फुफ्फूसाचा कर्करोग १.२ आणि इतर आजारांमधे हृद्यविकार २४.९ स्ट्रोक १४.१, मधूमेह ८.४, लिओनेटल डिसऑर्डर १३.३ डी कॅटरॅक्ट २.७ टक्के इतक्यापर्यंत पोचले आहे.

मुंबईसारख्या अतिलोकसंख्या घनता असलेल्या शहरासोबत देशातील इनडोअर आणि आऊटडोर प्रकाराच्या प्रदुषणात गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होत आहे. त्यात ओझोन प्रदूषणाचाही समावेश आहे. देशभरातील १७ लाख नागरीकांच्या मृत्यूचे टक्केवारीतील प्रमाण हे १७.८ टक्के आहे. खुल्या जागेवरील प्रदुषणात सातत्याने वाढ होत आहे. या प्रदुषणामुळे ९ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे ६ लाख नागरीकांचा मृत्यू झाला आहे. मात्र १९९० पासून २०१९ या वर्षांचा विचार करता, बंदिस्त जागेतील प्रदुषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे ६४.२ टक्क्यांनी घटले आहे, तर बाहेरील प्रदुषणामुळं मृत्यू होण्याचे प्रमाण हे ११५.३ टक्क्यांनी वाढले आहे. ओझोन प्रदुषनाचा विचार करता, हे प्रमाण १३९.२ टकक्यांनी वाढले आहे. या अर्थ बंदिस्त जागेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी असून, रस्ते, सार्वजनिक जागा येथील तत्सम ठिकाणांवरील प्रदुषणाचे प्रमाण अधिक असून, धुम्रपानापेक्षा कितीतरी पटींनी अधिक मृत्यू हे प्रदूषणामुळे होत आहेत. दरम्यान, प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच आर्थिक तोट्यातही भर पडत असल्याने मनुष्यहानीसह आर्थिक असे दुहेरी नुकसान होत आहे.

इंडीयन काऊंन्सिल फॉर मेडिकल रिसर्च पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि इन्स्टीट्यून फॉर हेल्थ मेट्रीक्स अॅण्ड इव्हॅल्यूएशन या संस्थेने वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या रोगाच्या अंदाजाबद्दल एक अहवाल जाहीर केला. त्यातून भारतातील प्रदुषणाची सद्यस्थिती समोर आली. या अंदाजानुसार वायू प्रदूषणामुळे दरवर्ष १.७ दशलक्ष अकाली मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृत्यूपैकी ५ वर्षाखालील मुलांचा मृत्यू १ लाख ५० हजाराहून अधिक झाला आहे, या वयोगटातील मृत्यू आणि आजारासाठी वायू प्रदुषण हा सर्वात महत्वाचा धोका घटक आहे.


२०१९ या वर्षात संपूर्ण देशभरात तब्बल १७ लाख नागरीकांना हवेच्या प्रदुषनामुळं मृत्युमुखी पडावं लागलं होतं. हा आकडा कोरोना आणि धुम्रपानामुळं होणाऱ्या मृत्यंपेक्षा अधिक असल्याचे अभ्यासकाचं म्हणनं आहे.

मुंबईतील हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी महापालिकेने वरळी, खार, अंधेरी, भांडुप आणि चेंबूरच्या मरवली येथे मॉनिटरिंग सेंटर उभारली आहेत. तसेच वरळी, वडाळा आणि अंधेरी येथील सिग्नलवर स्वयंचलित मशिनद्वारे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षण केंद्रात हवेतील सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया व हवेत तरंगणारे धुलीकण याची केंद्रीय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मानकांशी तुलना केली जाते. सन २०१६-१७मध्ये सर्वेक्षण केंद्रांवर मोजल्या गेलेल्या हवेतील सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड व अमोनियाची हवेच्या दर्जाची पातळी विविध विभागांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून आली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण ५० एकक असे मान्य केले आहे. सन २०१४-१५मध्ये वरळीत हे प्रमाण १७ ते १९ एकक खारमध्ये १२ ते १८ एकक, अंधेरीत ११ ते १५ एकक, भांडुपमध्ये १३ ते १५ एकक आणि मरवली येथे ३० ते ३९ एकक इतके आहे. म्हणजे या भागांमध्ये सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या मानंकापेक्षा कमी आहे. नायट्रोजन डायऑक्साइडसाठी ४० हे मानंक असून प्रत्यक्षात वरळीत ३४ ते ४८ एकक खारमध्ये ६६ ते ८४ एकक, भांडुपमध्ये ४१ ते ४८ एकक तर मरवली येथे ६७ ते ८४ एकक इतके आहे. म्हणजे या भागात नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण मानंकापेक्षा खूप जास्त आहे.

अमोनियासाठी १०० हे मानंक असून वरळीत ६६ ते ७१ एकक, खारमध्ये ६४ ते ९६ एकक, अंधेरीत ५६ ते ६६ एकक, भांडुपमध्ये ६० ते ७० एकक व मरवलीत १८६ ते २८७ एकक इतके प्रमाण आहे. अमोनियाची हवेतील पातळी मानंकापेक्षा कमी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या २०१६-१७च्या पर्यावरण अहवालात देण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सल्फर डायऑक्साइड व अमोनियाचे प्रमाण काही भागात कमी असल्याने हवेची गुणवत्ता थोडी सुधारली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मानंकाची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढलेली सरासरी अशी आहे. सल्फर डायऑक्साइडचे मानंक ५० असताना भांडुपमध्ये ते ११ ते १३ इतके मानंकापेक्षा कमी आढळून आले आहे. नायट्रोजन डायऑक्साइडचे मानंक ४० असताना खार व भांडुपमध्ये ते ४७ ते ७३ म्हणजे मानंकापेक्षा अधिक आढळून आले आहे. अमोनियाचे मानंक १०० असताना भांडुपमध्ये ६४ ते ७० म्हणजे मानकापेक्षा कमी आढळून आले आहे. हवेची गुणवत्ता थोडी सुधारली असली तरी ती कायम राहील, याची शाश्वती नाही. मुंबईतील वाहनांचे वाढते प्रमाण पाहाता प्रदूषणाचा धोका पुढील अनेक वर्ष कायम राहाणार आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करनं काळाची गरज बनली आहे.

शहरातील अनेक भागात पाण्याचा निचरा व्हायला जमीन क्वचित शिल्लक असल्यामुळे धुळीचे लोटच्या लोट उडत राहतात. हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, संध्याकाळी धूळ आणि धुरक्याच्या मिश्रणाची बदलती 'हवा' मुंबईकरांसाठी डोकेदुखी बनते. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वडाळा, अंधेरी, चेंबूर यासारख्या भागांतल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार येथील अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये बस्तान बसवलं आहे. प्रतीक्षानगर, चेंबूर, देवनार, मानखुर्द या भागामध्ये डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. एसपीएम (सस्पेंडेड पार्टिक्युलेटेड मॅटर) मध्ये धुके, धूळ आणि धूर या घटकांचा समावेश असतो. तर आरएसपीएम (रेस्पीरेटेल सस्पेंडेड पार्टिक्यूलेटेड मॅटर) मध्ये आठ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या कणांचा समावेश असतो. या घटकांचे हवेतील प्रमाण इतर घटकांपेक्षा वाढले की श्वास घ्यायला त्रास होणे, खोकला येणे, नाक चोंदणे, सर्दीमुळे हैराण होणे, नाकातून पाणी गळत राहण्याचा त्रास वाढतो. साथीच्या आजारांचा जोर शहरात असताना या भागातील धुरके व धुळीमुळे त्वचेवर लाल पुरळ उठणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे, पांढरे चट्टे असे त्रास होतात. वडाळा, चेंबूर या भागामध्ये या प्रकारच्या आजारांचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. स्त्रियांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण आधीच कमी असते, लोहाची रक्तात तूट असेल तर त्वचाविकार, श्वसनविकारांचा संसर्ग लगेच होतो. धुळीमुळे केवळ श्वसनविकार, दमा बळावत नाही तर धुळीचे कण कानात गेले तर श्रवणक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. हा परिणाम दृश्य स्वरूपातील व पटकन होणारा नसला तरीही कालांतराने ही क्षमता कमी होत असल्याचे डॉ. गिरीष गायकवाड यांनी म्हटले आहे.

वडाळा, चेंबूर, देवनार, सायन या परिसरात राहणारे अनेकजण घरात धूळ येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजे सतत बंद ठेवतात, पण धुळीला चाप लावताना सूर्यप्रकाशही अडवला जातो, असे डॉक्टरांचे म्हणने आहे. त्यामुळे लहान मुलांना नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या कॅल्शियमचाही अभाव येथे आढळून येतो. वारंवार श्वास लागण्याच्या, धाप लागण्याच्या तक्रारींमुळे मुलांना कमी वयात नेब्युलायझर, अस्थमा पंप वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा अधिक प्रमाणातील वापरही आरोग्यास हितावह नसल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. या धुळीच्या अॅलर्जीमुळे त्वचा व डोळ्यांवरही परिणाम होतो. प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही या प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल श्वासातून तो शोषला जातो, त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे ,डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास हवेतील धुळीमुळे वाढतो. धुळीचे लोट वाऱ्यासोबत वाहत राहिले वा कोंडीमुळे प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरिरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते. कार्बनचे प्रदूषित हवेतील वाढते प्रमाण नाक चोंदण्याच्या तक्रारींसह कोणत्याही वस्तूचा गंध घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. गर्भवती महिलांमध्ये प्रदूषणामुळे त्वचाविकार बळावले तर प्रतिजैविकेही घेता येत नाही. खोकल्याची उबळ वाढल्याने मूत्रमार्गावरील ताबाही जातो, त्यामुळे गर्भावस्थेमध्ये त्रास होण्याची शक्यता असते.

सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढल्यापासून मुंबईत प्रामुख्याने वाहनांपासून होणारे प्रदूषण कमी व्हायला सुरुवात झाली असली तरी बांधकामामुळे होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या व्यतिरिक्त मुंबईत आणि मुंबईच्या आसपास कारखाने आहेत, त्यामुळेही प्रदूषणामध्ये भर पडत असते. डम्पिंग ग्राऊंडवरील आग, फटाके हेसुद्धा घटक मुंबईच्या प्रदूषणात वाढ करण्यासाठी कारणीभूत ठरतात.मुंबईची हवा बाधित करणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी कसे होईल, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यरत असणे गरजेचे आहे. मात्र पर्यावरण अभ्यासकांशी बोलल्यावर प्रामुख्याने लक्षात येणारी गोष्टी अशी की, कागदोपत्री काही कामे मंडळाकडून केल्याचे दाखवले जाते मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करते असा प्रश्न उपस्थित राहतो. वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणासाठी मुंबईमध्ये ११ ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी ८०० कोटींची योजनाही तयार आल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, भारत चरण तीन आणि भारत चरण चार या प्रकारातील गाड्यांवर नियंत्रण आल्याने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रवक्ते संजय भुस्कुटे यांनी सांगितले. मात्र हा दावा करताना यासंदर्भातील कोणतीही सांख्यिकी उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे अनुमान नेमके कशाच्या आधारे काढले जाते, हा प्रश्न निर्माण होतो.

बांधकाम करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे परवाने दिले जातात. बांधकामासाठी रेडी मिक्स काँक्रीट वापरण्याच्या सूचना दिल्या जातात. सांडपाणी पुनःप्रक्रिया प्रकल्प बांधण्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात दर तीन महिन्यांनी अधिकारी जाऊन पाहणी करतात.बांधकाम प्रकल्पावर पाणी फवारायला सांगितले जाते. मात्र एवढी कडक देखरेख मुंबईच्या उंचावणाऱ्या क्षितिजावर असेल तर अनेकदा मुंबईच्या परळ, लालबाग, वरळी भागात उंचच उंच इमारतींची कामे होत असताना या भागावर धुरक्याचा पडदा इतका जास्त कसा दिसतो? अशी शंका पर्यावरण अभ्यासक व्यक्त करतात.

सणासुदीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवर फटाक्यांमुळे निर्माण झालेले प्रदूषणाची काही वर्षांची आकडेवारी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीही फटाक्यांची चाचणी घेण्यात आली होती. यामधील धातूंचे विश्लेषण करण्यात आले होते. मात्र याचे विश्लेषण लोकांपर्यंत वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध झाले नाही, अशी तक्रार यासंदर्भात आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमेरा अब्दुलअली यांनी केली आहे. लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही तर लोकांमध्ये जनजागृती होणार कशी, असे त्या विचारतात. गेली दहा वर्षे सातत्याने ध्वनिप्रदूषणाबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा या गोष्टींचे पडसाद हळुहळू जनसामान्यांमधून उमटू लागले. त्यामुळे जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अधिक जागरुकपणे करणे गरजेचे आहे.

कारखान्यांना परवाने देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेकदा लहान कारखान्यांवर कारवाई केली जाते, मात्र मोठे कारखाने या कारवाईतून सुटतात. या कामासाठी महापालिका किंवा राज्य सरकारकडे जबाबदारी ढकलून आपली सुटका करून घेतली जाते. प्रदूषणासंदर्भात तक्रार केल्यावर कारवाई किंवा पाहणीसाठी कामाच्या वेळेतही अधिकारी पोहोचू शकत नाही. पाहणीसुद्धा अनपेक्षितपणे होणे गरजेचे असते, मात्र त्याची माहिती संबंधित कारखानादारांपर्यंत पोहोचते आणि प्रदूषण खरोखरच किती होत आहे, याची माहिती कागदोपत्री उघड होत नाही. ही कार्यपद्धती बदलणे गरजेचे आहे. यासंदर्भात लोकांनीही जागरुक होणे गरजेचे आहे. गाड्यांमध्ये किंवा घरामध्ये एसी सुरू केला म्हणून प्रदूषणापासून सुटका होत नसते. त्याचबरोबर मास्क लावून फिरले तर आजूबाजूचे प्रदूषण कमी परिणाम करेल मात्र याचा अर्थ आपण त्यातून सुटलो असा होत नाही. दोन-चार कार्यकर्ते, पर्यावरणवादी प्रश्न उपस्थित करतात मात्र याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करून यंत्रणांना ते सामान्यांना उत्तरदायी आहेत, याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

दक्षिण मुंबईत पेडर रोड, दादर, अंधेरी, वांद्रे, मुलुंड, पवई या परिसरात वाहनांची संख्या वाढताना दिसते. याबाबत काय करता येईल, यावर परिवहन विचार करत आहे. वाहतूक कोंडीतून होणारे हवेचे प्रदूषण हा गंभीर विषय आहे. तीन हजारहून अधिक पोलिस वाहतूक नियत्रंणाचे काम करतात. कामाची दगदग, ताणतणाव, अनियमित जेवण, अपुरी विश्रांती या जोडीला वाढत्या प्रदूषणामुळे वाहतूक पोलिसही जेरीस आले आहेत. वाहनांमधून निघणारा काळा धूर आणि धुलीकण यामुळे पोलिसांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहेत. त्यातच वाढती आर्द्रता आणि गरम हवेमुळे आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. डोळे चुरचुरणे, श्वास घेताना त्रास होणे, दम लागणे, उन्हात सतत उभे राहून अशक्तपणा जाणवत आहे. प्रदुषणापासून त्रास होऊन नये म्हणून पोलिसांना मास्क दिले आहेत. मात्र हे मास्क बांधल्याने चेहऱ्यावर चट्टा उमटतो. चेहरा धुतल्यानंतर हातरुमालाने पुसल्यावर संपूर्ण रूमाल काळा पडतो, एवढे प्रदूषण आहे. सुदैवाने पोलिसांची दर तीन महिन्याला वैद्यकीय तपासणी होत असल्याने काही आजार असल्यास लगेच निदान होते, तेवढाच काय तो दिलासा, अशी वाहतुक पोलिसांची भावना आहे. मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईसाठी तयार केलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण कृती आराखडयास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या त्रिसदस्यी समितीने मान्यता दिली असून या आराखडयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे विधानसभेतील उत्तरात नमूद आहे. राजकारणी धोरणकर्ते प्रदुषणाच्या या गंभीर प्रश्नाकडे कधी गंभीरपणे पाहणार हा प्रश्न मात्र कायम आहे.

Updated : 12 March 2021 5:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top