Home > मॅक्स रिपोर्ट > लम्पी रोगानं शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडं मोडलं..

लम्पी रोगानं शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडं मोडलं..

देशातील अनेक राज्यात लंबी रोगाने थैमान घातले असून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला या रोगामुळे आणखी खड्ड्यात घातले आहे.. खबरदारी आणि शेतकऱ्यांची आर्थिक दैना मांडणारा प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट..

लम्पी रोगानं शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडं मोडलं..
X

देशातील अनेक राज्यात लंपी रोगाने थैमान घातले असून हा रोग मुख्यत्वेकरून जनावरांत आढळून येतो. हा रोग राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात फैलावला असल्याने सोलापूर जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. त्यांनी याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हा रोग सोलापूर जिल्ह्यात येवून ठेपला असून जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात त्याची एन्ट्री झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या रोगाबाबतची योग्य ती खबरदारी घेत आठवडी बाजारांवर बंदी घातली आली आहे. परंतु या रोगांमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत पशुसंवर्धन विभाग काय काय उपाय योजना करतेय याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या रोगात जनावरांच्या अंगावर गाठी निर्माण होत असून जनावर दिसायला विद्रूप दिसते. या रोगाची लक्षणे जनावरांत दिसता क्षणी शेतकऱ्यांनी नजीकच्या पशू संवर्धन दवाखान्याशी संपर्क साधून बाधित जनावरावर औषध उपचार करून घ्यावेत. त्यामुळे हा रोग लवकरच आटोक्यात येईल. असे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात लम्पी रोगाचा शिरकाव

पश्चिम महाराष्ट्र हा भाग समृध्द मानला जातो. या भागात पुणे,सोलापूर,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सातारा या जिल्ह्यांचा समावेश होते. या जिल्ह्यात लम्पी रोगाचा शिरकाव झाला असून त्याबाबत प्रशासन जनजागृती करत आहे. या रोगामुळे अनेक ठिकाणी जनावरे दगावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामानाने सोलापूर जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव कमी मानला जातो. साताऱ्याचा माण खटाव चा भाग सोडल्यास इतर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे पाण्याची उपलब्धता असल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यात उजनी धरण असून या धरणातून कॅनॉल आणि भिमा, सिना नद्यांना बारमाही पाणी सोडले जाते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आले असून उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात 32 च्या आसपास ऊस कारखाने असून या उसाच्या शेतीबरोबरच शेतकरी शेतीला पूरक असणाऱ्या उद्योग व्यवसायाकडे वळला असल्याचे दिसून येते. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कुक्कुटपालन,बंदिस्त शेळीपालन आणि जर्शी गाई ,म्हैस पाळण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या जनावरांच्या विक्री आणि दुधातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे दिसून येते. सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन असून या पशुधनाला विविध रोगांची लागण होवू नये म्हणून शेतकरी काळजी घेताना दिसून येत आहे. जनावरांच्या दूध वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. उन्हाळा,पावसाळा,हिवाळा या तिन्ही ऋतूत जनावरांना विविध रोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच शेतकरी जनावरांना वेळोवेळी लसीकरण करून घेतो. तरीही अनेक जनावरे विविध रोगांना बळी पडतात. यामध्ये अनेक जनावरांचे बळी जावून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाने ग्रासले होते. त्या मध्ये अनेक जनावरांना जीवाला मुकावे लागले होते. त्यातही प्रशासनाने तत्परता दाखवत लसीकरण वेगाने केले होते. परंतु अनेक जनावरे या रोगाला बळी पडले होते. या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.





रोगाबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित

जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. शासनाने 8 सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यामध्ये 8 सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे. गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे.

राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी

राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केल्याने, लंपी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येणार आहे. गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे.





जनावरांच्या बाजारांवर जिल्हा प्रशासनाने घातली बंदी

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लंपि रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यातील गुरांच्या भरणाऱ्या बाजारांवर बंदी घातलेली आहे. या रोगाबाबत जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जनावरांच्या जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

लंम्पी रोगाचा प्रसार कसा होतो

बाधित जनावरांच्या अंगावर डास, चावणाऱ्या, माश्या,गोचीड,चिलटे,बाधित जनावरांचा स्पर्श,दूषित चारा पाणी यामुळे या रोगाचा एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराकडे प्रसार होतो.

या रोगाची कारणे काय आहेत

या रोगाचा संसर्ग कॅप्रीपाॅक्स विषाणू मुळे होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यामधील देवी रोगाच्या विषाणूशी संबधित आहे.

या रोगाची लक्षणे काय आहेत

जनावरांच्या अंगावर 10 ते 15 मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस जनावरास भरपूर ताप येवून जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून चिवट स्त्राव येण्यास सुरुवात होते. जनावर चारा,पाणी खाण्याचे बंद करते. दुधाचे प्रमाण ही घटते. या आजारात काही जनावरांच्या पायावर सूज येवून जनावर लंगडते.

शेतकऱ्यांनी लंम्पी रोगापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी

बाधित जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी बांधावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेश बंदी करणे आवश्यक आहे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरास गावातील बाधित व निरोगी जनावरास चराऊ कुरणांमध्ये एकत्रित चरण्यासाठी सोडू नये. डास,गोचीड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषधे लावणे व गोठ्या मध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करून घ्यावी. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेहण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

या रोगांवर काय उपाय करावेत

या रोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशू वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये,यासाठी जखमेवर औषध मलम लावावे. तसेच पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करून घ्यावे.

या रोगाचा राज्यात वेगाने होत आहे फैलाव

पशूधन विकास अधिकारी डॉ.प्रदीप रणावरे यांनी बोलताना सांगितले,की लंम्पी हा त्वचा रोग असून तो जनावरांच्या अंगावर फोड्याच्या स्वरूपात येतो. सध्या हा रोग देशातील 11 राज्यामध्ये आढळून आला आहे. तसेच राज्यात 10 ते 11 जिल्ह्यामध्ये याचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये जळगाव,पुणे, धुळे,याठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात या रोगाने शिरकाव केलेला नाही. तरही शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. या रोगाची लक्षणे जनावरांत आढळल्यास शेतकऱ्यांनी पशू संवर्धन विभागामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्कता बाळगावी. जेणेकरून जनावरांना या आजाराची लागण होणार नाही व त्याचा प्रतिबंध करता येईल. हा आजार विषाणू जन्य असून गेल्या दोन वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु या रोगाला लगेच आटोक्यात आणणे सोपे गेले होते. या आजारामध्ये जनावरांच्या अंगावर 10 ते 15 एमएम च्या गाठी तयार होतात. त्या पूर्ण शरीरभर दिसतात. त्यामुळे जनावर दिसताना विद्रूप दिसते. पशू पालकांनी या रोगाला घाबरून न जाता दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जनावरांत या रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशू वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. बाधित जनावर निरोगी जनावरांपासून विलगीकरनात ठेवावे. हा आजार खूपच फास्ट फैलवणारा असल्याने जनावरांच्या गोठा आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. गोठ्यात औषधे फवारणी करून घ्यावी. बाधित जनावरांचा चारा पाणी वेगळा ठेवावा. या आजारात जनावरे दगावण्याची शक्यता कमी असून शेतकऱ्यांनी जनावरांवर वेळेत उपचार करून घ्यावेत. त्यामुळे या रोगाला अटकाव करता येईल.

Updated : 11 Sep 2022 12:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top