Home > मॅक्स रिपोर्ट > लम्पीमुळे दुग्ध व्यावसायिकांना फटका; गैरसमजामुळे ग्राहक संख्या घटली

लम्पीमुळे दुग्ध व्यावसायिकांना फटका; गैरसमजामुळे ग्राहक संख्या घटली

पशुधनाच्या लम्पी विषाणुजन्य संसर्गित आजाराने डोके वर काढले असून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. या आजाराबद्दल अनेक नागरिकांमध्ये समज गैरसमज पसरत आहेत. परिणामी काही लोकांनी दूध घेणे व पिणे बंद केले असून याचा फटका पाली सुधागड सह जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे, प्रतिनिधी धम्मशील सांवंत यांचा रिपोर्ट...

लम्पीमुळे दुग्ध व्यावसायिकांना फटका; गैरसमजामुळे ग्राहक संख्या घटली
X

लम्पी स्किन पशुधनाच्या विषाणु जन्य संसर्गित आजाराने डोके वर काढले आहे. गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. या आजाराबद्दल अनेक नागरिकांमध्ये समज गैरसमज पसरत आहेत. परिणामी काही लोकांनी दूध घेणे व पिणे बंद केले असून याचा फटका पाली सुधागड सह जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे.

लम्पीचा फैलाव दुधातून होत नाही. याबद्दल पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली आहे. तरीही याबाबत लोकांमध्ये चिंता व भय आहे. परिणामी धोका नको व खबरदारी म्हणून काही लोकांनी दूध सेवन करणे बंद केले आहे. कोरोनामुळे गावखेड्यातील दुग्ध व्यवसाईकांचे कंबरडे मोडले होते. आता कुठे पुन्हा एकदा हा व्यवसाय रुळावर येत होता. आणि लम्पीमुळे पुन्हा या व्यवसायावर काळे ढग आले आहेत.

झाप सुधागड येथील शेतकरी सतीश बोनकर यांनी सांगितले, की लम्पी आजाराच्या बाबत समाजात गैरसमज व अफवा आहेत, त्यामुळे हजारों पशुपालक अडचणीत सापडलाय. लोक दूध घेण्यास नकार देत आहेत. आमच्या उदारनिर्वाहाचे मुख्य साधन दुग्ध व्यवसाय हेच आहे. कुणी दूध घेतलं नाही तर आम्ही जगणार कसे? माझ्याकडे 3 गाई आहेत, सकाळी संध्याकाळी दहा लिटर दूध येते, ते विकुन महिना आठ हजार मिळतात, पण आज या उत्पादनावर टाच आली आहे, आम्ही संकटात सापडलो आहोत, जनतेने दूध घ्यावे व प्यावे ही अपेक्षा आहे.

लम्पी रोगाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकांना वाटते की दुधातून सुद्धा हा आजार पसरतो. त्यामुळे भितीपोटी अनेक ग्राहकांनी दुधाचे उकडे बंद केले आहेत. त्यामुळे धंद्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभाग लोकांमध्ये जनजागृती करत आहे. मात्र अधिक लोकांपर्यंत हे जनजागृती झाली पाहिजे, असे कोंडगाव, सुधागडचे दूध व्यावसायिक राम तुपे यांनी सांगितले.

बिनधास्त प्या दूध,

लम्पी आजार दुधातून होतो ही अफवा असून बिनधास्त दूध प्या. लम्पी बाधित जनावराचे दूध पिता येऊ शकते, आपण दूध 100 डिग्री सेल्सिअसला उकळून घेतो. त्यामुळे कोणताही विषाणू या तापमानाला जिवंत राहू शकत नाही. लम्पीमुळे दुधाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही.डॉ. सविता राठोड,सुधागड तालुका पशुधन विकास अधिकारी, सुधागड

जिल्हा प्रशासन सज्ज

लम्पी रोगासंदर्भात प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी अधिनियमाखालील अधिकारांतर्गत तात्काळ कार्यवाही करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना

लम्पी (एलएसडी) सदृश / बाधित जनावरे आढळल्यास योग्य ते उपचार करणे. विलगीकरण करणे, नमुने गोळा करणे व तात्काळ प्रयोगशाळेत पाठविणे, आजारी जनावरांचा दैनंदिन अहवाल तयार करणे, उपचार करणे, नमुने होकारार्थी आल्यास 5 किलोमीटरच्या अंतरातील गावामध्ये लसीकरण करणे. आदी उपयोजना केल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात कर्जत तालुक्यात 8 लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत. त्यांचे लसीकरण करून विलगिकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाच बाधित क्षेत्र आहेत. लम्पी रोग देशी गाईंमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. संकरित गाईंवर होत नाही. त्यामुळे दुधावर आत्तापर्यंत काही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात एकूण 2 लाख 39 एकूण जनावरांची संख्या आहे. त्यातील गोवंश संख्या आहे दीड लाख व उर्वरित 89 हजार महिष (म्हैस) वर्ग जनावरे आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली.

जिल्ह्यात 15 तालुक्यात मिळून संघटित, असंघटित नोंदणीकृत व अनोंदणीकृत, किरकोळ विक्री करणारे असे साधारण 20 ते 25 हजार दूध व्यवसाईक आहेत. लम्पीच्या गैरसमजुतीमुळे ग्राहकांनी दूध बंद केल्याचा फटका साधारण 10 ते 15 टक्के व्यावसायिकांना बसला असण्याची शक्यता आहे.

Updated : 22 Sep 2022 3:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top