Home > Top News > गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील महिला वळल्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे

गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील महिला वळल्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे

वाढती घरगुती गॅसची (LPG)किंमत सर्वसामान्य कुटूंबाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर वर्गातील महिला गॅस ऐवजी पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळल्या आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील महिला वळल्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे
X

वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत असताना घरगुती गॅसच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजट कोलमडले असून गॅस ऐवजी महिला पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळल्या आहेत. शासनाने अनुसूचित जातीच्या महिलांसह इतर घटकातील महिलांना मोफत गॅसचे वाटप केले होते. त्यावर सबसिडी ही देण्यात येत होती. सध्या सबसिडी बंद झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर झाला आहे. गॅसच्या किंमती वाढत चालल्याने मजुरीचे काम करून उपजीविका करणाऱ्या मजूर वर्गाला गॅसच्या वाढत्या किंमतीचा फटका बसला आहे. सध्या गॅसची किंमत 1 हजार रुपयांच्या आसपास गेली असून त्यामुळे ग्रामीण भागातील महिला जुने ते सोने म्हणत पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळल्या आहेत. यामुळे शासनाची उज्वला योजना फसली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या गॅसच्या किंमतीने महिला वर्गात असंतोष पसरला असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेला वाढत्या महागाईच्या झळा बसत असतानाही सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. मोर्चे, आंदोलने पूर्वीच्या मानाने कमी झाले आहेत. जे काही मोर्चे,आंदोलने होत आहेत. ती राजकीय पक्षांच्या वतीने केली जात आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात जनतेच्या संवेदना बोथट झाल्या आहेत,की काय असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.




ग्रामीण भागातील महिला पुन्हा वळल्या चुलीकडे

ग्रामीण भागात काही वर्षापूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जात होता. चुलीतून निघणाऱ्या धुराचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असल्याने त्यांची या त्रासातून मुक्तता व्हावी या हेतूने ग्रामीण भागात शासनाने मोठ्या प्रमाणात उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅसचे वाटप केले. याचे महिला वर्गातून जोरदार स्वागत ही करण्यात आले. सुरुवातीला या गॅसवर सबसिडी ही देण्यात येत होती. सबसिडी ऑनलाईन ग्राहकांच्या खात्यावर जमा होत होती. काही दिवसांपूर्वी गॅस 400 ते 500 रुपयांत मिळत होता. आता गॅसची किंमत 1 हजार रुपयांच्या आसपास पोहचली आहे. वाढती गॅसची किंमत सर्वसामान्य कुटूंबाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर वर्गातील महिला गॅस ऐवजी पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळल्या आहेत. शेतातून सरपण आणून चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. ग्रामीण भागात मोठी कुटूंबे असल्याने गॅस लवकर संपत असून सध्या कडक उन्हाळ्यामुळे रोजगाराच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. रोजगार नसल्याने पैशाअभावी गॅस लोकांना आणता येईना गेला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव चुलीकडे त्यांना वळावे लागत आहे. रानात जे सरपण मिळते ते फुकट असते,त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे जळण ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे आहे. गॅसच्या वाढत्या किंमतीना आता सर्वसामान्य जनता कंटाळली असून ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळल्या आहेत.




वाढत्या महागाईने जनता हैराण

पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किंमतीबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असल्याने जनतेतून त्याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी खाण्याचे तेल 80 ते 90 रुपये किलोने मिळत होते,पण तेच तेल सध्या 200 रुपये किलोच्या आसपास गेले आहे. डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचाही परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे. सध्या वाढत्या खर्चाने कुटूंबप्रमुख हतबल झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात रोजगाराची चणचण भासत आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली होती. कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री केली जात होती. नागरिकांना नाइलाजास्तव या वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या. पण लॉकडाऊन उगडल्यानंतर तर महागाईवर नियंत्रण येणे आवश्यक होते. पण झाले मात्र उलटेच सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. याच्यावर नियंत्रण येणार की नाही असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च,दवाखाना,पाहुणे,लग्न समारंभ व इतर खर्चामुळे सध्या कुटंब प्रमुख अडचणीत सापडले आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती सर्वसामान्य वर्गाची झाली आहे. सध्या तरी मागाईच्या मुद्यावरून जनतेत रोष पहायला मिळत आहे.

गरिबांचे जगणे झाले मुश्किल




मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सुमन बेसरे यांनी सांगितले,की सुरुवातीला गॅस स्वस्त मिळत होता. त्यावेळेस त्याची किंमत 350 ते 400 रुपये होती. सुरुवातीच्या काळात उज्वला योजनेतून गॅस फुकट देण्यात येत होता. त्यानंतर सातत्याने गॅसच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. आता तर त्याची किंमत 1 हजार रुपयांच्या आसपास पोहचली आहे. आमचे 10 लोकांचे कुटूंब असून 15 दिवसाला गॅस संपत आहे. गरीब कुटूंबातील लोकांनी कसे जीवन जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. खाद्य तेल महागले आहे. 90 ते 100 रुपये किंमतीने मिळणारे तेल आता 200 रुपये किलोने मिळू लागले आहे. डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. महागाई सातत्याने वाढत असल्याने गरीब लोकांच्या समोर विविध अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सध्या कडक उन्हाळा असल्याने हाताला कामे नाहीत. त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. खाण्याचे तेल दोन दिवस सुद्धा जात नाही. डाळी,शेंगदाणे व इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सर्व महाग होत चालले आहे. आधी गॅसवर सबसिडी देण्यात येत होती,पण सध्या ती बंद झाली आहे. पूर्वी जवळ पैसे नसल्यास सबसिडीच्या पैशातून गॅस खरेदी करता येत होता. पण आता वांदे झाले आहेत. गॅस आणायला पैसे नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. सरकारने यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.




महागाई वाढत असताना सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरताना दिसत नाही

वाढत्या मागाईच्या संदर्भात जोरदार चर्चा होत आहे. पण ज्या सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसत आहे, ते रस्त्यावर उतरून आंदोलन,मोर्चे करताना दिसत नाहीत. याबाबत अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. महागाईच्या मुद्यावर फक्त राजकीय पक्ष राजकारण करताना दिसत आहेत. पण महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईचा फटका अनेकांना सोसावा लागत आहे. सर्वच क्षेत्रात मागाई वाढली आहे. एसटी प्रवास, रेल्वे प्रवास, खासगी प्रवास ही महाग झाला आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने कळस गाठल्याने सर्वसामान्य जनता पुरती हैराण झाली आहे. महागाईच्या नुसत्या चर्चा केल्या जात आहेत. पण सरकार उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे मागाईच्या मुद्यावर सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

Updated : 22 April 2022 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top