Home > Election 2020 > मध्यमवर्गीयांना “नमो”शरण आणि हरवलेली केमिस्ट्री

मध्यमवर्गीयांना “नमो”शरण आणि हरवलेली केमिस्ट्री

मध्यमवर्गीयांना “नमो”शरण आणि हरवलेली केमिस्ट्री
X

सतराव्या लोकसभेसाठी आपल्य़ाशिवाय कुणीही पंतप्रधानपदाचा प्रबळ दावेदार नाही आणि कुणीही त्या योग्यतेचा नाही, असा दावा करणा-या नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत मध्यमवर्गीयांसमोर सरळ लोटांगण घातलं. हाच भोळाभाबडा वर्ग आणि नवतरूण मतदार आपल्याला तारू शकतात याची जाणिव झालेल्या मोदींनी मध्यमवर्गीयांसमोर थेट नमोशरण केले तर प्रगतीची आणि आपली केमिस्ट्री जमली आहे हे सांगताना त्यांच्या देहबोलीतून कसलाही आत्मविश्वास झळकताना दिसत नव्हता. गेल्या निवडणूकीपूर्वी किंवा अगदी काही महिन्यांपर्यंत जो आवेश ते दाखवत होते ती केमिस्ट्रीच गायब झाल्याचे दिसत होते.

मुंबईच्या भाषणात त्यांनी उसना आवेश आणून देशात केवळ मोदी लाट सुरू असल्याचे सांगितले. या मोदी लाटेमुळे विरोधक कसे घाबरले आहेत हे सांगताना त्यांची वाक्ये काही वेगळं बोलत होती आणि देहबोली काही वेगळे सांगताना दिसली. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची जंत्री मोदी वाचून दाखवतील. नितीन गडकरी ज्याप्रकारे आकड्यांचा भडिमार करतात. त्याच्या किमान अर्धी फेकाफेक तरी होईल, अशी अपेक्षा होती. तसेच आता येत्या पाच वर्षांत आपण काय करणार आहोत, देशाचा कसा विकास होईल हे नक्कीच लोकांसमोर मांडतील असे वाटत असताना त्यांनी थेट देशातील नवमतदारांना साद घातली. ज्यांची पाटी कोरी आहे, ज्यांचे रक्त सळसळते आहे ज्या वयात मरण काहीच वाटत नाही, देशप्रेम सर्वोच्च वाटते अशा नवमतदारांना देश आपल्यामुळे सुरक्षित आहे हे सांगत त्यांनी या मतदारांना आता मोदीशिवाय काहीच दिसत नाही, असे ठरवून टाकले. किंवा त्यांना तसे भासवण्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मुंबईकराचे गुणगाण गात त्यांच्या देशभक्तीचे, बॉम्बस्फोटानंतर, कसाब हल्ल्यानंतर मुंबई कशी दुस-या दिवशी धावली याची भावनिक आठवण करून दिली. (वास्तविक जिद्दीने नव्हे तर पोटाची खळगी भऱण्याच्या अपरिहार्यतेनने काळजावर दगड ठेवून मुंबईकर घराबाहेर पडला होता ही बाब अलाहिदा) त्याच मुंबईतील टॅक्सीवाल्यापासून ते कोळीबांधव, कामगार मजूर आणि टॅक्स भरणा-या मध्यमवर्गीयापर्यंत त्यांनी मतांसाठी साद घातली.

काळ्या पैशाबाबत काहीही बोलले नाही पण भ्रष्टाचार करणा-यांना जेलमध्ये टाकण्याचे तेच आश्वासन पुन्हा देताना त्यांना काहीही वैषम्य वाटले नाही. तर मध्यमवर्गीयांच्या सबसिडी त्यागाने देश कसा प्रगती करतो आहे, पेट्रोल डिझेलच्या भावावर न बोलता महागाई कशी कमी झाली, याचे गोडवे गायले. पोलीस बांधवांना चुचकारताना कॉंग्रेसने कसा अन्याय केला होता याचे एकही उदाहरण न देता मोघम हल्ला केला. या भाषणात त्यांनी अधून मधून कॉंग्रेस आणि विरोधकांवर टीका केली पण त्या टीकेला अजिबात धार आणि पाया नव्हता.

बुलेट ट्रेन आणि मेट्रो तुमच्या दिमतीला येतेय हा जूनी टिमकी पुन्हा वाजवली. विशेष म्हणजे या भाषणात त्यांनी राहूल गांधी आणि त्यांना उघडे पाडण्यात जराही कसूर न करणा-या राज ठाकरे यांच्यावर अथवा त्यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नावर बोलण्याचे टाळले. मात्र, त्यानंतर त्यांनी त्याचा हुकूमाचा प्रचार म्हणजे देशावरचा हल्ला, देश सुरक्षित, यापूर्वी कधीही आतंकवादाला असे उत्तर दिले गेले नव्हते. यापुढे अतिरेक्यांच्या घरात घुसून त्यांना मारणार आणि त्यासाठी या शिवरायांच्या मावळ्याला मत द्या, असे आवाहन केले. पण यादरम्यान देशातील गरीबी, बेरोजगारी, करदात्यांचे प्रश्न, शेतक-यांचे प्रश्न, शेतमालाला भाव आणि मुख्य म्हणजे नव्या योजना किंवा नवे आश्वासन याबाबत चकार शब्दही न काढता त्यांनी आपलाच विजय होणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपल्यालाच कसे मतदान केले पाहिजे हे सांगत राहिले.

विशेष म्हणजे त्यांच्या राज्यातील प्रमुख घटक पक्षाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनीही केवळ भगवा, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, मावळा, विरोधक म्हणजे नालायकांची औलाद, देशद्रोह्यांना शिक्षा होणारच असे ठासून सांगितले. त्यांच्याही भाषणातून विकास आणि प्रगतीची केमिस्ट्री हरवलेलीच दिसली. गंमत म्हणजे काही महिन्यांपूर्वी अयोध्येत जावून वीट ठेवून आलेले उद्धव ठाकरे यावेळी राम आणि राममंदीर पार विसरून गेले होते.

Updated : 26 April 2019 6:02 PM GMT
Next Story
Share it
Top