Home > News Update > लोहगढ; त्याग, शौर्य आणि बलिदानाचं सुवर्ण पान - रवी चव्हाण

लोहगढ; त्याग, शौर्य आणि बलिदानाचं सुवर्ण पान - रवी चव्हाण

लोहगढ; त्याग, शौर्य आणि बलिदानाचं सुवर्ण पान - रवी चव्हाण
X

जगातील सर्वात मोठा किल्ला अर्थातच लोहगड. ह्या किल्ल्यात घडलेल्या शौर्य त्याग आणि बलिदानाची शौर्यगाथा गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आली नव्हती. सुमारे ७००० एकरवर पसरलेल्या ह्या किल्ल्यावर अनेक पराक्रम झाले. हरजिंदर सिंह दिलगीर, गगणदीप सिंह आणि गुरुविंदर सिंह यांनी लिहिलेल्या ‘लोहगढ: वर्ल्डस् लार्जेस्ट फोर्ट’ या इग्रंजी शौर्य ग्रंथाचं मराठी अनुवाद ठाण्याचे उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांनी केले आहे. त्यामुळे मराठी वाचकांना पहिल्यांदाच लोहगडाचे शौर्य वाचायला मिळेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जयराम पवार यांनी लोहगड ग्रंथाच्या माध्यमातून पुसला गेलेला इतिहास पुनश्च प्रकाशात आणला आहे.

त्याकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपाला आलेल्या लखी राय बंजारा यांनी लोहगड ह्या किल्ल्याची निर्मिती केली. ह्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यास सुमारे ८० वर्षे लागली. लखी राय बंजारा मोठे व्यापारी होते. त्यांच्यापाशी ४ लाख बैल, लाखो गाई, म्हशी, उंट, घोडे, हत्ती खेचर होते. लखी राय ज्या ठिकाणाहून प्रवास करत त्याठिकाणी रस्ता तयार व्हायचा. त्यांनी उत्तर भारतात शेकडो तळे, असंख्य विहिरी बांधल्या. यातून बंजारा यांचे वैश्विक प्रेम लक्षात येते. भारतीय उपखंडात आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय आणि संरक्षण क्षेत्रात बंजारा समाजाचे अद्वितीय योगदान आहे. किंबहुना भारतीय संस्कृती साबूत ठेवण्यासाठीही बंजारांचे कार्य विसरता येणार नाही.

मात्र, इतिहासासाच्या कुठल्याही पैलूत बंजारांची नावे दिसत नाही ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यामुळे जयराम पवार यांनी ‘लोहगढ’ शौर्यग्रंथाच्या माध्यमातून इतिहासात हरवलेल्या बंजारा समाजाचा इतिहास पुन्हा उजेडात आणला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची करावी तितकी स्तुती कमीच आहे.

ह्या शौर्यग्रंथात लेखकाने १६ व्या शतकातील शिख राज्याची राजधानी लोहगड आणि अजरामर व्यक्तीमत्व असलेल्या लखी राय बंजारा, बंदासिंह बहादूर, बल्लुराव बिंजरावत, मख्खनशाह लभाणा, भाई मणिसिंह पवार आणि १५० शूर विरांनी देव, देश, धर्मासाठी दिलेलं बलिदान आणि कार्य प्रकाश झोतात आणले आहे. त्यामुळेच हे पुस्तक केवळ ग्रंथ नसून शौर्यग्रंथाच्या परमोश्च शिखरावर जाऊन पोहचतो. ह्या ग्रंथातील प्रत्येक क्षण विलक्षण आहे. २७५ पानाचा हा ग्रंथ बंदासिंह बहादूर यांच्या अवतीभोवती फिरतो किंबहूना ह्या ग्रंथाचं मुख्य नायकच बंदासिंह आहेत असे म्हणायला हरकत नाही. बंदासिंह बहादूर यांचा त्याग, सेवाभाव आणि पराक्रम लेखकाने अद्वितीयरित्या ह्या ग्रंथात रेखाटले आहे.

बदासिंहाच्या नांदेड ते लोहगडाचा प्रवास पाहता अंगावर शहारे आणणारा असा शौर्यप्रवास कुठल्याही योद्ध्यानी यापूर्वी केला नसावा. या ग्रंथाची अजून एक अत्यंत महत्त्वाची बाजू आहे ती म्हणजे संदर्भ, लेखकाने हे ग्रंथ लिहिताना जाणीवपूर्वक संदर्भाभिमुख लिखाण पुढे आणले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे प्रत्येक शब्द सूर्याएवढे तेजस्वी आणि तलवारीच्या धाराप्रमाणे धारधार आहेत.

भारतीय उपखंडासह आशिया, युरोप, आफ्रिका या खंडातील ५६ पेक्षा जास्त देशात बंजारांनी शिख विचारसरणी आणि वैश्विक पातळीवर सेवा, त्याग आणि बंधुत्वाचा प्रचार प्रसार केला. त्यामुळे शिख विचारसरणी जगाच्या पाठीवर ताठमानाने उभी राहिली. आजवरच्या इतिहासात राजपूत, शिख, मराठा, जाठ यांच्या पराक्रमाचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. मात्र, बंजारा योद्धेही रणांगणात तेवढेच शूर आणि पराक्रमी होते तरीसुद्धा त्यांचे त्याग, शौर्य आणि देशासाठी दिलेलं बलिदान इतिहासाच्या सुवर्ण पानावर आले नाही यासाठी तथाकथित इतिहासकार आणि राज्यकर्तेच कारणीभूत आहेत असे म्हणायला हरकत नाही.

अन्यथा एवढा मोठा शौर्याचा इतिहास पुसट झाला नसता. लोहगड शौर्यग्रंथातून लेखकाने दक्षिण आशियातील शिख आणि बंजारा योद्धांनी केलेले कर्तृत्व आणि बलिदान पुनश्च जगापुढे आणले आहे.१७०८ते १७१६ महायोद्धा बंदासिंहाच्या आठ वर्षाची कारकीर्द शैलीबद्ध पद्धतीने मांडण्यात आली आहे. १७९० मध्ये स्वरुप सिंह कौशिक यांनी लिहिलेल्या ‘गुरु की सांखिया’ बंदासिंह बहादूरांची महत्वपूर्ण माहिती घेतल्याचे या ग्रंथात दिसून येते.

शिखांच्या तत्कालिन शौर्याबदद्ल भाष्य करणारा ‘अखबरात- ए- दरबार -ए-मुल्ला’, मोहम्मद हादी कामवार यांनी १७३४ मध्ये ‘ताझकिरातू सलतीन-ए-चग्गढा’, ‘तारिख ए इरादखानी’ ‘इब्रतनामा’ ‘दस्तूर उल निशा’, ‘शाहनामा’, ‘फतेहनामा’ ‘मिरात- ए-वारदार’, ‘तारीख -ए- मोहम्मदेशाही’, ‘मुसार- उल-उमरा’, आणि असंख्य इग्रंजी स्त्रोतांचा ह्या ग्रंथाच्या उभारणीसाठी महत्वाचे योगदान आहे.

किंबहुना ह्या संदर्भाच्या सहाय्यानेच लेखकाच्या लेखनीला दिशा आणि गती मिळाली आहे असे येथे नमूद करावेसे वाटते.बंदासिंह बहादूर यांचा पराक्रम असा होता की मोघलांना सळोकीपळो करुन ठेवलं. लोहगडावर मोगलांनी असंख्यवेळा आक्रमक केले मात्र, शिख आणि बंजारा योद्धांच्या युद्धनितीपुढे मोघलांच्या लाखो सैनिकांचा टिकाव लागला नाही. हे निश्चित आहे की बंदासिंहाला मोघलांनी कैद केल्यानंतर लोहगड आणि सदौरा किल्ल्यावर कब्जा करुन हे किल्ले नेस्तनाबूत करण्यात आले. त्याचबरोबर बंदासिंह बहादूर आणि हजारो शिख बंजाराच्या हत्या करण्यात आल्या. पण हेही तेवढेच खरे आहे की बंदासिंह बहादूर यांच्या ८ वर्षाच्या युद्ध प्रतिकारामुळे बलाढ्य मोघल साम्राज्याच्या पतनास सुरुवात झाली. गुरुदास नांगल वेढ्यात बंदासिंह बहादूर यांना अटक करण्यापूर्वी प्रचंड मोठी लढाई झाली. ह्या लढाईत शिख- बंजारा योद्धांनी शेवटच्या श्वासापर्यंत लाखो मोघल सैनिकांना झुंज दिली. जवळजवळ दीड महिने चाललेल्या या युद्धात लाखो मोघल सैनिकांना शिख सैनिकांना हरविता आले नाही. शेवटी, गढीच्या आतील अन्नधान्याचा साठा संपल्यामुळे सैनिकांची उपासमार होत होती तरी शिख सैनिक युद्धाचा सामना करत होते. इब्रतनामाचे लेखक मोहम्मद कासिम लिहितात बंदासिंह बहादूर नांगलच्या गढीतून युद्ध करत होते तेव्हा मोघल सैनिक अल्लाहकडे प्रार्थना करायचे…

“हे अल्लाह कसेही करुन बंदासिंहाला येथून पळून जाण्यास यश मिळो, जेणेकरून आमचे प्राण वाचतील.”

ह्या प्रसंगावरून बंदासिंहाची मोघल सैनिकांवर किती दहशत होती याचा प्रत्यय येतो. गढीतील अन्नधान्याची कोठार संपल्यामुळे शेवटी भूकेने जर्रजर झालेले शिख सैनिक मृतअवस्थेत पोहचले. मोघंल सैनिकांनी सगळ्या शिख सैनिकांना बेड्या टाकल्या. बंदासिंह बदादूर यांना सुद्धा बेड्या टाकून बंदिस्त करण्यात आले. दरम्यान, बंदासिंह आणि त्यांच्या शिख योद्ध्यांचा शिरच्छेद करण्यात आले.

लेखकाने बंदासिंहाच्या शिरच्छेदाचा प्रसंग अत्यंत धैर्याने लिहिला आहे. शिरच्छेद करण्यासाठी बंदासिंहाना पिंज-यातून बाहेर काढण्यात आले होते. त्यांचा उजवा हात मोकळा करुन त्यांना त्यांचा मुलगा अजय सिंहाला मारण्यास सांगितले होते. त्यांचा मुलगा केवळ साडेचार वर्षाचा होता. बंदासिंहाने मुलाला मारण्यास नकार दिल्यानंतर जल्लादाने अजय सिंहला मारण्याची विडा घेतला. तत्पूर्वी, अजय सिंह किंचितही न घाबरता जयघोष देत होता. त्याला अभिमान वाटत होते की तो मातृभूमिसाठी आपले प्राण अर्पण करतोय. जल्लादाने बंदासिंहाच्या मुलाचे पोट फाडले आणि ह्रदय काढून बंदासिंहाच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. बंदासिंहाने आपले दात घट्ट रोवले होते. नंतर जल्लादाने बंदासिंहाचे डोळे काढले. तरी बंदासिंह धैर्याने उभे होते नंतर जल्लादाने निर्दयपणे चिमट्याने शरिराचे कातडे काढून बंदासिंहाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. इब्रतनामाचे लेखक मोहम्मद कासिम म्हणतात…

“जेव्हा बंदासिंहाच्या डोळ्यादेखत त्यांच्या मुलाचे तुकडे-तुकडे करण्यात आले तेव्हा त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही आणि डोळ्यातून अश्रू ढळण्याविषयी काय बोलावे? त्यांच्या चेह-यावर स्मित ढळले नव्हते.”

इतिहासातील गर्द अंधारात पडलेल्या लोहगडातील शौर्याला पुनश्च प्रकाशात आणण्याचं धाडशी कार्य लेखकाने केले आहे असे येथे नमूद करावे लागेल. ‘लोहगढ: वर्ल्डस् लार्जेस्ट फोर्ट’ या मूळ इग्रंजी ग्रंथाचे लेखक हरजिंदर सिंह दिलगीर, गगणदीप सिंह आणि गुरुविंदर सिंह यांनी केलेल्या लिखाणाची करावी तितकी स्तुती कमी पडेल. या ग्रंथाचं मराठी अनुवाद करुन उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यापुढे महाराष्ट्रातील १२ कोटी मराठी जनांना लोहगडाचा खरा इतिहास कळेल यात शंका नाही.

– रवी चव्हाण

Updated : 15 Jun 2019 11:18 AM GMT
Next Story
Share it
Top