Home > मॅक्स रिपोर्ट > LockDown: मुळे येवल्यातील पैठणी उद्योग संकटात

LockDown: मुळे येवल्यातील पैठणी उद्योग संकटात

LockDown: मुळे येवल्यातील पैठणी उद्योग संकटात
X

जग प्रसिद्ध येवला पैठणी तयार करणाऱ्या अनेक कुटुंबाचं पोट लॉकडाऊन मुळं बंद झालं आहे. येवले शहरातील अनेक कुटुंबाची अर्थिक नाडी येवला पैठणी व्यवसाय सध्या बंद असल्यानं पैठणी उत्पादक व कारागीर संकटात सापडला आहे.

कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैठणी उत्पादन व बाजारपेठा बंद आहे. एकीकडे पैठणीसाठी आवश्यक असलेला कच्च्या माल परराज्यातून येतो. बंद काळात तो माल उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे बाजारपेठा बंद असल्याने उत्पादीत केलेल्या मालाची विक्री होत नाही.

अशा दुहेरी संकटात सापडलेल्या पैठणी बनवणाऱ्या कारागिरांवर आणि उत्पादकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

जागतिक दर्जा व पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवले शहरात रोज राज्यासह परराज्यातून शेकडो पर्यटक पैठणी खरेदीसाठी येतात.

हे खरे असले तरी पैठणीसाठी लागणारे रेशीम, जर आणि इतर कच्चा मालासह वाढलेली मजुरी यामुळे हा पारंपरिक व्यवसाय केवळ तग धरुन आहे. सध्याची स्थिती पाहता या क्षेत्रातील अर्थव्यवस्था कमालीची मोडकळीस आलेली आहे.

भविष्यात या व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आर्थिक मदत केली तरच पैठणी व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ शकतात. अन्यथा नामशेष होण्यास फारसा वेळ लागणार नाही. असे या व्यावसायिकांचे मत आहे.

लॉक डाऊनमुळे व्यवसाय बंद आहे. त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया कारागिरांनी दिली. या संदर्भात एक विणकर कारागीर मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना आपली व्यथा मांडतात... ते म्हणतात....

आमच्या विणकरांची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. आमचा जो माल आहे. तो परराज्यातून येतो. रेशीम बंगलोर वरुन येतं. जरी सुरत वरुन येते. पूर्ण जिल्ह्याबंदी असल्यामुळं परिस्थिती वाईट आहे. आमचे विणकरांच्या चुली बंद पडण्याची वेळ आली आहे.. त्यांची लहान लहान मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळं काम मिळत नाही. त्यामुळं सरकारने घरी बसलेल्या विणकारांना आर्थिक मदत द्यायला हवी.

एक विणकर सांगतात...

आम्ही जो माल तयार करतो. ते आत्ता व्यापारी घेत नाहीत. गावात जे बाहेरुन लोक येत होते. ते आता येत नाही. ज्या पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांना अनुदान देतं, त्या पद्धतीने आम्हालाही द्य़ावं अशी मागणी हे विणकर करत आहेत.

येवला येथील एक नागरिक सांगतात...

माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून येवला पैठणी केंद्राची निर्मिती केली होती. कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने हे केंद्र बंद आहे. त्यातच हा सर्व व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून असल्यानं त्यामुळं शहारातील कारागिरांची परिस्थिती खूप बिकट झाली आहे.

एक विणकर हिंदीतून सांगतो की, सध्या जे काही आहे काम सुरु आहे. ते सर्व कच्चा मालावर सुरु आहे. मात्र, हा माल संपला की सर्व बंद. त्यातच बाहेर चे पैठणी घेणारे गिऱ्हाईक बंद झाले आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आम्हाला मदत द्यायला हवी.

यासंदर्भात येवल्याचे तहसिलदार रोहिदास वारुळे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

येवल्यातील पैठणी उत्पादक आणि कामगारांच्या समस्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated : 28 April 2020 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top