Home > मॅक्स रिपोर्ट > विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी..?

विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी..?

विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी..?
X

सांगोला तालुक्यातील वाढेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिमटा वस्तीची १५० च्या आसपास लोकसंख्या आहे. आफ्रुका आणि कोरडा या दोन नद्यांनी वेढलेलं हे एक छोटसं आणि शासनाकडुन दुर्लक्षित गाव. नदीवर पुल नसल्यामुळे वस्तीतील ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. यामध्ये लहान शाळकरी मुलं आणि महिलाही आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

मुलांना शाळेत वेळेवर पोहचायचं असत तर, महीलांना शेतमजुरीच्या कामासाठी गावाबाहेर जायचं असतं. गावाबाहेर ये-जा करण्यासाठी हवा भरलेल्या ट्यूबवर बसून दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. २००९ साली आफ्रूका आणि कोरडा या दोन्ही नद्यांना पुर आल्यानं चिमटा वस्तीतील ४० लोक अडकले होते.

त्यावेळी त्यांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढलं होत. या घटनेला दहा वर्ष उलटून गेली तरीही ना प्रशासनाने दखल घेतली ना लोकप्रतिनिधींनी. यावर्षीही पावसाचा जोर जास्त असल्यामुळे दोन्ही नद्यांचे बंधारे १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झालेली नाही. चिमटा वस्तीतील ग्रामस्थ ,विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीतून ये जा करावा लागत आहे.

दरवर्षी पावसाळ्याचे चार महीने आणि नदीचं पाणी ओसरेपर्यंत गावकऱ्यांना ही तारेवरची कसरत करावी लागते. गावाबाहेर जाण्यासाठीचा रस्ता हा नदीपात्रातुनच जातो. नदीचं पाणी ओसरलं की कच्चा रस्ता दिसु लागतो आणि गावकऱ्यांचं दैनंदीन जीवन पुढच्या पावसापर्यंत सुरळीत होतं. चिमटा वस्तीवर सुमारे ४०० लिटर सकाळ- संध्याकाळ दूध संकलन होतं. सोबतच डाळिंब फळ विक्रीला घेऊन जाण्यासाठी रस्ता किंवा पुल नसल्यामुळे शेतकऱ्यांचही मोठे नुकसान होत आहे.

चिमटा वस्ती ते वाढेगाव नदी पात्राचे अंतर ३०० फुटाच्या आसपास आहे. सध्या नदी पात्रात २० ते २५ फूट इतकं खोल पाणी आहे. वस्तीतील लोकांना वाढेगाव किंवा दुसऱ्या गावाला कामाधंद्याला जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. नदी पात्रातून कित्येक वर्षांपासून ये- जा करावी लागत असल्यामुळे ग्रामस्थांनी पुलाची मागणी करून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाने आमची दखल घेऊन सद्यस्थितीला एखाद्या होडीची व्यवस्था करून द्यावी आणि कायमस्वरूपी नदीवर पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

ग्रामस्थांच्या या जीवघेण्या समस्येविषयी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांकडून कोणत्या उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था ग्रामस्थांसाठी केल्या याचा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न केला. सरपंच नंदकुमार दिघे यांना विचारणा केली असता नदीच्या पात्रातील पाणी ओसरल्यानंतर कायमस्वरुपी पुल बांधला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सरपंच आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करुन लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल असं सांगितले आहे. सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी पाटील यांनीही गावकऱ्यांना नदीपात्रातुन ये-जा करण्यासाठी आठवड्याभरात बोटीची व्यवस्था करु असं म्हटलं आहे.

Updated : 15 Dec 2019 9:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top