Home > मॅक्स रिपोर्ट > कोल्हापुरी चप्पल विकली जातेय तीन हजार रुपयाला

कोल्हापुरी चप्पल विकली जातेय तीन हजार रुपयाला

चर्मकार समाजाच्या पारंपारीक (traditional) पिढीजात चप्पल व्यवसायाला हवाई- बाटा (bata)उद्योपतींनी आव्हान निर्माण केले असताना सोलापूरमधील कारागीर नामदेव क्षीरसागर कोल्हापुरी चप्पला (kolhapur) आकर्षक डिझाईन बनवून महाराष्ट्राचे मार्केट मिळवले आहे. ५०० ते तीन हजार रुपये किमतीच्या या कोल्हापूरी चपलांच्या सोलापूरी उद्योगाची यशोगाथा मांडली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

X

सध्या बाजारात वेगवेगळ्या आकराच्या विविध रंगाच्या आणि कमी अधिक किंमतीच्या चप्पला उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार या चप्पला खरेदी करत असतात. पूर्वीच्या काळी हा चप्पल व्यवसाय ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे चालत होता. ग्रामीण भागातील कारागिरांनी बांधून तयार केलेल्या चप्पलाना विशेष अशी मागणी होती. ही चप्पल मुख्यतः शेतकरी वर्ग वापरत असे. या चप्पलीमुळे शेतातील काट्यापासून पायांचे रक्षण होत होते. आजही ग्रामीण भागातील वयस्कर व्यक्ती या चप्पला वापरत असल्याचे दिसतात. पण पायाणा आणि व्यक्तींना विशेष अशी उंची प्राप्त करून देणारी कोल्हापुरी चप्पल आजही ग्रामीण भागात तयार केली जात आहे. या चप्पलाची किंमत 3 हजार रुपयाच्या आसपास असून हे ऐकून सर्वसामान्य ग्राहकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही,पण हे खरे आहे. पूर्वीच्या काळी चप्पला बनवण्याचा व्यवसाय सामान्यतः ग्रामीण भागातील गाव खेड्यात चालत होता. या व्यवसायात गाव खेड्यातील चर्मकार समाज पारंगत होता. आजच्या काळात शहराच्या ठिकाणी सध्या चप्पलांचे मोठ-मोठे कारखाने उभे राहिल्याने ग्रामीण भागातील या व्यवसायावर गंडांतर आल्याचे दिसते.

ग्रामीण भागातील लोप पावत चाललेला चप्पल व्यवसाय माढा तालुक्यातील नामदेव क्षीरसागर यांनी टिकवून ठेवला आहे. गेल्या 50 वर्षापासून ते कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे काम करत असून ते ग्राहकांना त्यांच्या डिझाईन नुसार चप्पल बनवून देतात. या कोल्हापुरी चप्पलची किंमत 1 हजार पाचशे रुपयांपासून सुरू होवून ती 3 हजार रुपये किंमती पर्यंत विकली जात आहे. कोल्हापुरी चप्पलला खेडेगाव आणि शहरातून मागणी असून या कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीतून महिन्याकाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये मिळत आहेत. सध्या या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाह सुरू आहे.

आधुनिक युगात चप्पलला विशेष महत्व

आजच्या आधुनिक युगात चप्पलला विशेष असे महत्त्व आले आहे. लोक ज्या रंगाची कपडे परिधान करतात,त्याच रंगाला मॅच होणारी चप्पल पायात घालतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि विविध आकाराच्या चप्पला पहायला मिळतात. त्यांचे रंग ही खूपच आकर्षक असतात. त्यामुळेच त्या चप्पला ग्राहकांना आकर्षित करतात. पूर्वीच्या काळी लोक पायात चप्पल असो अथवा नसो अनवाणी फिरत परंतु सध्याच्या युगात सर्व लोकांच्या पायात चप्पल पहायला मिळते. एखाद्या व्यक्तीने कपडे चांगले घातले असतील परंतु त्याने पायात चप्पलच घातली नाही तर त्याच्या पेहरावाला विशेष असे महत्त्व राहत नाही. या चप्पला मानवाच्या पायाचे रक्षण करत असून कडक उन्हात पायाला चटके बसू नये म्हणून चप्पल संरक्षकाचे काम करते. चप्पलमुळे मानवाचे आरोग्य सुस्थितीत राहण्यास मदत झाली असून शहरात आणि ग्रामीण भागात लोक आता विविध आकाराच्या आणि रंगाच्या चप्पला वापरत आहेत. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि लहानापासून ते थोरांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या चप्पला सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे या चप्पलाच्या उत्पादन आणि विक्रीसाठी विविध प्रकारच्या कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे या चप्पलाच्या विक्रीतून वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारचा ग्राहक ठराविक कंपनीच्या चप्पला खरेदी करताना दिसत आहे. या ब्रँड मध्ये बाटा, हवाई यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

कंपन्यांनी चप्पलांचे कारखाने उभे केल्याने गाव खेड्यातील चप्पल व्यासायिकांवर परिणाम

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात चप्पला बनवल्या जात होत्या आणि त्याचे ग्राहक दूर शहरापर्यंत असायचे. हा चप्पला बनवण्याचा व्यवसाय महाराष्ट्रातील चर्मकार समाज करत होता. या व्यवसायात कालांतराने बदल होत जावून मोठ-मोठे उद्योगपती या व्यवसायात उतरले आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या चप्पलांकडील खरेदीचा कल आपोआप कमी झाला असल्याचे दिसते. याच कारणाने हा चर्मकार समाज इतर उद्योग व्यवसायाकडे वळला आहे. पण अजूनही चप्पल विक्रीची दुकाने थाटून अनेक जण या व्यवसायात टिकून आहेत. उद्योगपती या व्यवसायात उतरल्याने ग्राहकांना कारखाने वेगवेगळ्या आकारात,रंगात आणि माफक दरात चप्पला उपलब्ध करून देवू लागले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात चप्पला बांधून बनवल्या जात होत्या. तो व्यवसायच ठप्प झाला आहे. पण नामदेव क्षीरसागर यांनी अशा ही काळात हा व्यवसाय टिकवून ठेवला असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

कोल्हापुरी चप्पलाच्या विक्रीतून महिन्याकाठी मिळतात 10 ते 12 हजार रुपये

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना नामदेव क्षीरसागर यांनी सांगितले की,गेल्या 50 वर्षापासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा व्यवसाय करत असून चप्पला बनवण्याची कला मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे. मी जेंव्हा कोल्हापुरी चप्पल बनवायला सुरुवात केली होती तेव्हा तिची किंमत 25 रुपये होती. तर सध्या तिची किंमत 1500 ते 3000 हजार रुपयापर्यंत पोहचली आहे. या चप्पला ग्राहकांच्या डिझाईननुसार बनवल्या जात आहेत. त्यासाठी तीन प्रकारचे चामडे वापरले जात आहे. एक चप्पल बनवण्यासाठी 300 ते 400 रुपये खर्च येतो. एक चप्पल बनवण्यासाठी 1 ते 2 दिवस लागत असून महिन्याला 20 ते 25 चप्पला बनवत आहे. या व्यवसायातून महिन्याला 10 ते 12 हजार रुपये मिळत असून या कोल्हापुरी चप्पला सोलापूर,पुणे, मुंबई याठिकाणी विकल्या जात आहे. तसेच आजूबाजूच्या गाव खेड्यात आणि शहरात या चप्पला विकल्या जात आहेत.

वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन मध्ये तयार केल्या जातात कोल्हापुरी चप्पला

कारागीर नामदेव क्षीरसागर कोल्हापुरी चप्पला या वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन मध्ये बनवत असून जिल्ह्याच्या विविध भागातून ग्राहक त्यांच्याकडे येत आहेत. नामदेव क्षीरसागर यांनी बनवलेल्या चप्पला आकर्षक असून त्यामुळे ग्राहक या चप्पलांच्या खरेदीकडे वळला आहे. एकीकडे पूर्वीचे ग्रामीण भागातील चप्पलांचे व्यवसाय बंद पडले असतानाही नामदेव क्षीरसागर यांनी हा व्यवसाय टिकवून ठेवल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.


Updated : 20 Jun 2022 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top