Home > मॅक्स रिपोर्ट > लिंगभेदी व्यवस्थेला सुरुंग लावत सुसाट सुटलेली कल्याणी एक्स्प्रेस

लिंगभेदी व्यवस्थेला सुरुंग लावत सुसाट सुटलेली कल्याणी एक्स्प्रेस

बैलगाडा चालवणे, शर्यत हे पुरुषाचे काम असे बिंबवले गेले. पण तृतीय पंथी म्हणून जन्माला आलेल्या कल्याणी गोवारे यांनी टाळी वाजवणाऱ्या हातात शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांची वेसण पकडून लिंगभेदाच्या या समीकरणालाच सुरुंग लावला आहे. आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा हा विशेष रिपोर्ट..

लिंगभेदी व्यवस्थेला सुरुंग लावत सुसाट सुटलेली कल्याणी एक्स्प्रेस
X

 बैलगाडा चालवणे, शर्यत हे केवळ पुरुषाचे काम आहे असे बिंबवले गेले. पण तृतीय पंथी म्हणून जन्माला आलेल्या कल्याणी गोवारे यांनी टाळी वाजवणाऱ्या हातात शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांची वेसण पकडून लिंगभेदाच्या या समीकरणालाच सुरुंग लावला आहे. आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा हा विशेष रिपोर्ट..

"मला एक गुंठा देखील शेती नाही. आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील मी बाजारातून मागून आणलेल्या पैशातून बैलाला सांभाळायची आणि शर्यतीतून आलेल्या पैशातून कुटुंब. इतक्या अडचणी आल्या तरी मी बैलगाडा शर्यतीचा नाद काही सोडला नाही. टाळ्या वाजवून पैसे मागायला गेले की बरेच लोक नाक मुरडायचे नजर फिरवायचे पण आज शर्यत(bullock cart race)मारली की तेच लोक मैदानात टाळ्यांचा कडकडाट करतात, शिट्ट्या मारतात. माझी मैदानात एन्ट्री झाली तरी भोंग्यावर अनाऊन्समेंट होते. कल्याणी एक्स्प्रेस म्हणून आज माझी जी महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे ती केवळ या बैलगाडा शर्यतीमुळेच". तृतीयपंथी बैलगाडा चालक असलेल्या कल्याणी जाधव गोवारीकर यांची ही प्रतिक्रिया आहे. कल्याणी या तृतीयपंथी समुदायातून येतात. बाजारात पैसे मागणे या परंपरागत उदरनिर्वाहाच्या साधनाच्या पुढे जाऊन त्यांनी बैलगाडा शर्यतीचा छंद जोपासला. आर्थिक समस्येला तोंड देत त्यांनी हा छंद उदरनिर्वाहाचे साधन बनवला. यामुळेच त्यांना सामाजिक आयुष्यात देखील मान सन्मान मिळाला आहे. आज या क्षेत्रात त्या प्रसिद्धी झाल्या आहेत.

आपल्या देशातील लिंगभेदाच्या(Gender Discrimination) मर्दानी संकल्पनांनी इथल्या स्त्रियांवर अन्याय तर केलेच. पण त्याहूनही जास्त अन्याय केला तो तृतीयपंथीयांवर. कमी ताकत असणे अकार्यक्षम असणे म्हणजे तृतीयपंथी(transgender) असा गैरसमज रुजवला गेला. एखादे काम होत नसेल तर त्याला हिजडा आहेस का ? छक्का आहेस का ? असे संबोधले जाते. राजकीय आखाड्यात तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही हीजड्याची अवलाद नाही अशी मर्दुमकी गाजवणारी लिंगभेद करणारी विधाने सर्रास केली जातात. काही विशिष्ट कामे मर्दांचीच, मिशा असणाराच मर्द, मर्दासारखा वाग असे बोलीभाषेत सर्रास बोलले जाते. घोडेस्वारी, बैलगाडी चालवणे या गोष्टीदेखील पुरुष असण्याशीच जोडल्या गेल्या. पुरुषाने फेटा गुंडून मिशावर ताव मारत सर्जा राजाची, जीवाशिवाची जोड हाकताना आपण सिनेमात पाहिलेल असेल. बैलगाडी शर्यतीला देखील परंपरेने, फेटा गुंडाळून मिशांवर ताव मारत, मर्दानी आणि पुरुषाचेच काम ठरवले आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या कल्याणी जाधव गोवारीकर या तृतीयपंथीयाने लिंग भेदाच्या या पारंपारिक चौकटीलाच सुरुंग लावला आहे. कंबरेला पदर खोचून बैलगाडा शर्यतीतील फाटित वायू वेगाने धावणाऱ्या बैलांची येसन हातात सांभाळत त्यांनी महाराष्ट्रात भिरकीट उठवले आहे. परंपरेने घालून दिलेल्या चौकटीबाहेर जात त्यांनी या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांना लहानपणीच या छंदाची आवड निर्माण झाली. आजूबाजूला सुरू असलेल्या शर्यती पाहण्यासाठी त्या शाळेतून मैदानात जात असायच्या. याबाबत त्या सांगतात " मी लहान असल्यापासून शर्यती पहायचे शाळेत दफ्तर टाकून शर्यती पहायचे. जरा मोठी झाल्यावर आम्ही खेळण्यातील गाड्यांना कुत्री जुपायचो कधी मी स्वतः ओढायची तर कधी सोबतच्या मित्रांना असं करत करत मला बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. बैलगाडा शर्यतीविषयी एक वेगळेच आकर्षण होते ". जसजसं वय वाढत गेलं तसतशी त्यांची आवड वाढत गेली. सुरवातीला आई वडीलांचा या गोष्टीसाठी विरोध झाला. बैलगाडीचा नाद करण्यापेक्षा बाजारात मागून पैसे कमव हेच तुझे पारंपारिक काम आहे. तू तेच काम कर असे आई वडिलांनी बजावले.

तरीही त्यांनी शर्यतीचा नाद सोडला नाही. शर्यतीसाठी स्वतःचा बैल असावा आपण देखील स्वतः बैलगाडी हाकावी. आपणही शर्यत जिंकावी. या स्वप्नातून त्या एका बैलवाल्याकडे पैरा मागायला गेल्या पण त्यांनी पैरा देण्यास नकार दिला. तो बैलच विकत घेण्याची ऑफर दिली. उसने पैसे घेऊन तसेच काही उधार ठेवून त्यांनी तो बैल विकत घेतला आणि त्यांचं स्वप्न बैलगाडी बनून शर्यतीच्या फाटित उतरलं. त्या स्वतः येसन हातात घेत बैलगाड्यावर स्वार झाल्या तेंव्हापासून त्यांनी मागे फिरून पाहिलच नाही. अनेक शर्यतीत त्यांनी विजय मिळवला आहे. बैलगाडा शर्यतीच्या फाटित पळवणे हे कठीण काम असते. यामध्ये धोका देखील असतो. पण ही जोखीम पत्करत त्या कंबरेला पदर खोचून हातात बैलाची वेसण सांभाळत शर्यत करतात. शर्यतीच्या बैलांना खास प्रशिक्षण द्यावे लागते. त्याच्यासाठी वेगळे खाद्य द्यावे लागते. गरीब परिस्थितीत त्यांनी बैल सांभाळले प्रसंगी बाजारात पैसे मागूनही त्यांनी बैल जगवले. या कष्टाच्या जोरावर त्यांनी कल्याणी एक्स्प्रेस हि महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेली आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांना या खेळात इतका आनंद मिळतो त्या स्वतःच सांगतात " मला बैल या विषयातील कोणती गोष्ट येत नाही असे राहिलेले नाही. बैलगाडा शर्यत हि माझ्या रक्तात नसानसात भिनलेली आहे. ती आता माझ्यापासून वेगळी होऊ शकत नाही. यातून मला आनंद मिळतो. मी एकवेळ माझ्या गुरूकडे कमी जाते पण जास्तीत जास्त वेळा शर्यतीला जाते मी पोटच्या लेकराप्रमाणे बैलांना संभाळते. थंडीच्या दिवसात त्याची काळजी घेते ". तृतीयपंथीयांना समाजात दुय्यम वागणूक मिळते.

या वागणुकीतून त्यांना दुसरे काम मिळत नाही. यामुळे बाजारात पैसे मागून उदरनिर्वाह करणे हाच मार्ग त्यांच्याकडे उरतो. या कामात समाज त्यांची हेटाळणी करतो. दुय्यम लेखतो. पण कल्याणी गोवारे यांनी वेगळा मार्ग निवडत इतर तृतीय पंथीयांना प्रेरणा निर्माण करणारे काम केले आहे. एकेकाळी एखाद्या दुकानात टाळी वाजवून पैसे मागण्यासाठी गेल्यावर नाक मुरडनारे, नजर फिरवणारे लोक त्यांची मैदानात एन्ट्री झाल्यावर उभे राहून टाळ्या वाजवतात. शिट्ट्या वाजवतात एकेकाळी केवळ टाळ्या वाजवणाऱ्या बाजार मागणाऱ्या कल्याणी जाधव यांनी अनेक विजय खेचून आणत लोकांच्या टाळ्या मिळवल्या आहेत. त्यांनी या क्षेत्रात उडवलेला धुव्वा, विजय मिळवत घेतलेला टाळ्यांचा कडकडाट, हा इथल्या लिंगभेदी व्यवस्थेच्या कानशीलात निघालेला कणखर आवाज आहे.

Updated : 24 July 2022 2:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top