Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज आहे का?

Ground Report : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज आहे का?

Ground Report :  तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज आहे का?
X

गणेशोत्सव संपल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेतर्फे सर्व तयारी झाल्याचा दावा केला जात आहे. पण खरंच राज्यात तिसरी लाट आली तर राज्याची आरोग्य व्यवस्था तयार आहे का, याची तपासणी करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने बुलडाणा जिल्ह्यात ग्राऊंडवरची परिस्थिती पाहिली...यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे. पण या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांना लागण झाली आणि मृत्यू देखील झाले. ग्रामीण भागातही दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. या सर्व पार्श्वभूमीवर तिसरी लाट आली तर तयारी आहे, असे सरकारने सांगितले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या कोवीड लाटेत अनेक कोविड सेंटर्सची निर्मिती करण्यात आली होती. पण दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर निर्णय झाला आणि यातील बहुतांश कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. रुग्ण नसल्याने कोविड सेंटर बंद ठेवण्याची भूमिका एकवेळ समजून घेता येऊ शकते. पण आरोग्य विभागाने त्या ठिकाणी काम करत असलेल्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील कार्यमुक्त केले आहे.

त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली आणि अचानक रुग्ण वाढले तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्मचारी कुठून येणार असा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात काय तयारी केली आहे, याचाच आढावा आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे यांनी घेतला तेव्हा तर आणखी धक्कादायक माहिती समोर आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्यात आजतागायत 87 हजार 537 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी 86 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पण आतापर्यंत कोरोनामुळे 673 रुग्णांचा जीव गेला आहे. सध्या जिल्ह्यात 27 रुग्ण उपचार घेत आहेत.

22 मार्च 2019 रोजी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिल्या एका कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होताय. पण दोन दिवसांनंतर तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली. या दरम्यान जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी 81 कोवीड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. विविध ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आले होते. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेऊन खाजगी कोविड केअर सेंटरसुद्धा उभारले. शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता अनेक खाजगी रुग्णालयांना देखील कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली होती.

मात्र जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानंत जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद केले आहेत. एवढेच नाही तर या कोविड सेंटरमध्ये मिळून जिल्ह्यातील 587 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून देखील कार्यमुक्त करण्यात आले. यामुळे जिल्हावासियांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. केवळ कोविड सेंटर बंद करण्यात आले, असे नाही तर या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी लागणारे साहित्यही काढून घेण्यात आले आहे. आरोग्य विभागाने कोविड सेंटरमधील बेड, ऑक्सिजन सिलेंडर, यासह इतर साहित्य हे पूर्णपणे काढून घेतलेले आहेत. अजूनही जिल्ह्यामध्ये दिवसाकाठी तीन ते चार रुग्ण आढळत आहेत, अजूनही जिल्हा कोरनामुक्त झालेला नाही, आणि आता त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण हे सर्व असतानाही कोविड बंद करुन कर्मचाऱ्यांनाही कार्यमुक्त करण्याचा हेतू काय हेच कळत नाहीये.

तिसरी लाट आलीच तर आरोग्य विभाग सज्ज आहे का याची माहिती आमच्या प्रतिनिधीने जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांना विचारली. तेव्हा त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेचा प्रश्न खूपच गंभीर झाला होता. अनेक रुग्णांना आक्सिजनसाठी धावपळ करावी लागली होती. हा अनुभव लक्षात घेता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण असला पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. त्यानंतर आता बुलडाणा जिल्हा स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करतो आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती कऱणारे 10 प्लांट निर्माण करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ प्लांट हे कार्यान्वित झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. एवढेच नाही तर कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या बेडची व्यवस्था देखील दुपटीने वाढविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

पण कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्यासंदर्भात जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढत जाईल त्यानुसार त्या त्या ठिकाणी किती आरोग्य कर्मचारी लागतील यासंदर्भातला आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या आराखड्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनी दिली.

जिल्हा प्रशासन सर्व तयारी झाली असल्याचे सांगत आहे. पण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर काय, असा प्रश्न आहे, कारण आरोग्य विभागाने तर कोविड सेंटर बंद केले आहेत. तसेच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जाईल असे सांगितले जात असले तरी आतापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याला कामावर रुजू करुन घेण्यात आलेले नाही. एवढेच नाही तर कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात शासकीय पातळीवर कोण्यात्याही हालचाली होत असल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग तहान लागल्यानंतर विहीर खोदणारा का असा प्रश्न, इथल्या सामान्य नागरिकांना पडला आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे, असा दावा सत्ताधारी करत आहेत. पण दुसरीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करुन कोणता संदेश दिला जातो आहे, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर बंद केलेले कोविड सेंटर खुले करता येईल, त्यात तातडीने साहित्य देखील आणता येईल, पण कुशल मनुष्यबळ कसे मिळणार याचा विचार सरकारने केला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णसेवा केली आहे, पण त्यांना कार्यमुक्त करताना याचा देखील विचार केला गेलेला नाही, असे दिसते आहे.


Updated : 2021-09-27T20:47:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top