Home > मॅक्स रिपोर्ट > वाढत्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या हरवतोय आवाज; चिमण्या वाचवण्यासाठी युवकाची धडपड

वाढत्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या हरवतोय आवाज; चिमण्या वाचवण्यासाठी युवकाची धडपड

मोबाईल टॉवरच्या वाढत्या रॅडीएशनमुळे चिमण्यांच्या अस्तित्वाला धक्का बसत असताना मोहोळमधील पर्यवारण प्रेमी युवक समेद शहाने स्पॅरो पार्क संकल्पना प्रत्यक्षात आणून चिमण्याच्या संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....

वाढत्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या हरवतोय आवाज; चिमण्या वाचवण्यासाठी युवकाची धडपड
X

20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. एकीकडे सिमेंटची जंगले वाढत असताना पर्यावरणातील चिमणी पक्षांचा पूर्वी जो किलबिलाट ऐकायला मिळत होता,तो आता दिसत नाही. त्यातच मोबाईल टॉवरच्या वाढत्या रेडिएशनमुळे चिमण्यांचे पर्यावरणातील अस्तित्व धोक्यात आले असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरणातील पक्षी वाचावेत, यासाठी एका पर्यावरण प्रेमी युवकाने चिमणी हा पक्षी वाचवण्यासाठी आगळीवेगळी योजना राबवत चिमणी पक्षासाठी "स्पॅरो पार्क" म्हणजे चिमणीचे घरटे तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. या पक्षाचे पर्यावरणातील महत्व अबाधित राहण्यासाठी पापरी ता. मोहोळ येथील पर्यावरण प्रेमी युवक समेद शहा यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. गेल्या चार वर्षांपासून स्पॅरो पार्क नावाचे चिमणीचे घरटे स्वतः बनवून मित्र,नातेवाईक, विद्यार्थी, अधिकारी यांना मोफत वाटप करत आहेत. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पर्यावरतातील पक्षांची घरटी नामशेष होत असताना चिमणी या पक्षाला राहण्यासाठी घरटे मिळावे,यासाठी समेद शहा यांनी तयार केलेल्या स्पॅरो पार्कच्या घरट्याला विशेष महत्व आले आहे.

वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे चिमण्यांची नैसर्गिक घरे नष्ट

मानवाच्या बदलत्या जीवन शैलीचा पर्यावरणातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. त्यात चिमणी या पक्षाचाही समावेश होतो. दिवसेंदिवस सिमेंटची घरे वाढत चालली आहेत. त्यातच चिमण्यांचे अस्तित्व हरवत चालले आहे. याला ग्रामीण भागही अपवाद राहिला नाही. ग्रामीण भागातही गावा-गावातील रस्तेही सिमेंटचे झाले आहेत. त्याचाही परिणाम चिमणी या पक्षाच्या जीवनावर झाला असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी ग्रामीण भागात कुडाची घरे असायची त्यात या चिमण्या घरटी करून राहत असत. त्यांची नैसर्गिक घरे नष्ट झाल्याने चिमण्या गावापासून दूर जाऊ लागल्या आहेत.त्यात वाढत्या वाहनांच्या आवाजामुळे चिमण्यांचा आवाज नामशेष होत चालला आहे. पूर्वी जे नैसर्गिक पाणवठे होते,त्यावर अतिक्रमण झाल्याने चिमण्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. शेतातील पिकांवर कीडनाशकांच्या फवारण्या केल्याने त्यांना शेतातील पिके खाण्यासाठी धोकादायक ठरू लागली असल्याचे पर्यावरण तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच शेतातील पिकांची पद्धती बदलली आहे. नैसर्गिक असणारी पिके कमी झाली आहेत. त्याचाही परिणाम चिमणी या पक्षावर झाला असल्याचे सांगण्यात येते.

मनुष्यामुळेच चिमण्यांचा चिवचिवाट हरवत चाललाय

हमेशा माणसाच्या संगतीत रमणाऱ्या चिमण्यांना आता घरघर लागली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते आपले बस्तान बसवण्यासाठी मानवी वसाहतीतून जंगलाकडे शेत-शिवारात धाव घेताहेत. चिमणीच घर मेणाचे आणि कावळ्याचे घर शेणाचे होते... एकदम मोठा पाऊस येतो व पावसात कावळ्याचे घर वाहून जाते आणि चिमणीचे मेणाचे घर वाचते ही गोष्ट लहानपणी पासून आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेली आठवते; परंतु ही गोष्ट आज लहान मुलांना सांगायची म्हटल्यावर त्या चिमणीचे घर आहे कुठे? आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे चिमण्या आपल्यापासून दूर जात आहेत. शहरासह ग्रामीण भागातही प्रचंड वाढत चाललेले सिमेंटचे जंगल, मानवी वसाहतीतील वृक्षांचा अभाव इत्यादी प्रमुख कारणामुळे चिमण्या दुर्मिळ होत चालल्या आहेत.वर्षभर एनकेन कारणांमुळे चालणारी फटाक्यांची आतषबाजी, वाहनांची गर्दी, सातत्याने चालू असलेले वायुप्रदूषण, रासायनिक व कीटकनाशकांचा वारेमाप वापर, ग्रामीण भागातील मातीच्या रस्त्यांचे काँक्रिटच्या रस्त्यात रूपांतर, मोबाईल मनोरे इत्यादी कारणांमुळे चिमण्यां गुदमरत आहेत. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे चिमणीची घरे संकटात आली आहेत. अनादी काळापासून माणसाच्या सहवासात राहायला पसंत करणाऱ्या मुठीच्या आकाराची इवल्यासा पक्षी आता माणसांकडे 'घर देता का कोणी घर' असे टाहो फोडत दूर पळ काढत आहेत. चिमण्यांच्या सहवासापासून वंचित होत असलेला माणूस संकटात येणार आहे.

चिमण्या का कमी होत आहेत

मानवी वस्तीतील प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील रस्त्यांचे काॅंक्रीटीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील माळवद, मातीच्या भिंतीचे माणसाच्या घराच्या ठिकाणी सिमेंटची घरे झाली आहेत. फासस्टफुड संस्कृती, माॅलमधून निवडलेले धान्य आणले जात आहे. घराबाहेर अंगणात बसून धान्य निवडण्याची पध्दत नामशेष झाली आहे. हवा व ध्वनीप्रदूषणात वाढ झाली आहे. मोबाईल मनोऱ्यातून बाहेर पडणाऱ्या लहरीचा परिणाम चिमण्यांवर झाला आहे. शेती व्यवसायातील बदल, कीटकनाशकांचा अतिवापर, धान्य पिकांच्या जागी ऊस,गहू या सारख्या पिकांचे अतिक्रमण झाल्याने चिमण्यांच्या खण्यापिण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे

आपल्या घरात अडगळीत पडलेल्या कार्डबोर्ड, मिठाईचे डबे, पुट्ट्यांच्या खोक्यांना घरट्यांचे आकार देऊन कृत्रिम घरट्यांची सोय करावी.‌ मातीच्या भांडीत पाणी भरून अंगणात ठेवावे. शिंकाळींत धान्य व पाणी लटकवून ठेवावे. अंगणात व गच्चीवर दररोज सकाळी तांदूळ, धान्य पसरून टाकावे. आपल्या घराच्या परिसरात वृक्षलागवड करून चिमण्यांना पोषक वातावरण निर्माण करून द्यावे. घराच्या अंगणात व गच्चीवर शिळी भाकरी- चपातीचे तुकडे व पसाभर धान्य दररोज पसरून टाकावे. मुलांना पर्यावरणात चिमण्यांचे महत्त्व पटवून देऊन चिमण्याना चारापाणी ठेवावे, कृत्रिम घरटी बनवायला स्फूर्ती द्यावी. माणसांचा सहवास प्रिय असलेल्या चिमण्यांकडे आपण आपल्या दररोजच्या व्यापातून दुर्लक्ष करत चाललो आहेत. दोन-चार मिनिटे चिमण्यांना न्याहाळले तर आपला थकवा निघून जातो. आपल्या पासून दूर लोटत चाललेल्या चिमण्यांना तुम्ही त्यांना घर बनवायला जागा तसेच चारा-पाणी पुरवला तर काही दिवसांतच त्या आपल्या अवती-भवती वावरत चिवचिवाट करतील.

चार वर्षात दीड हजार चिमण्यांच्या घरट्यांचे वाटप

पर्यावरण प्रेमी युवक समेद शहा या युवकाने गेल्या चार वर्षांत दीड हजाराच्या आसपास चिमण्यांच्या घरट्यांचे मोफत वाटप केले आहे. समेद शहा यांनी बोलताना सांगितले,की चिमण्यांची गोष्ट बालपणातील "एक घास चिऊचा,एक घास काऊचा" येथून सुरू होऊन चिमणीचे घर मेणाचे तर कावळ्याचे घर शेणाचे,चिऊताई-चिऊताई दार उघड येथे येऊन थांबते. काळानुसार शहराबरोबर ग्रामीण भागही स्मार्ट होऊ लागला आहे. पूर्वी गव्हाच्या काडाची घरे होती ती आता नामशेष झाली आहेत. त्याची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. त्यामुळे चिमण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे या पक्षाचे संवर्धन होण्यासाठी त्यांची घरटी बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. घरटी बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. वर्षाला 400 ते 450 घरटी बनवली जात आहेत. ही घरटी नातेवाईक, मित्रपरिवार, शासकीय अधिकारी यांना भेट देत आहेत.

टाकाऊ वस्तूपासून बनवली चिमण्यांची स्पॅरो पार्क घरटी

शेतात खरबूज,कलिंगड व वेलवर्गीय पिके घेण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. हा पेपर एका गोल आकाराच्या रोलला गोलाकार गुंडाळून येतो. पेपर पिकांवर पांघरूण झाल्यानंतर राहिलेला पुष्ठा रोल लोक समेद शहा यांच्याकडे आणून देतात. त्यापासून आकर्षक अशी चिमण्यांची घरटी बनवली जात आहेत. एका टाकाऊ वस्तूचा पर्यावरण संवर्धनासाठी असा उपयोग केला जात आहे. या स्पॅरो पार्क नावाच्या घरट्यावर आकर्षक रंगीबेरंगी पेपर लावून डिझाईन केले गेले आहे. या घरट्याच्या पुढच्या बाजूला काडी बसण्यात आली आहे. या काडीवर बसून चिमण्या आपल्या पिलांना अन्न भरू शकतात. ही घरटी जाड रोलची असल्याने पावसापासून चिमण्यांचे संवर्धन होते. ही घरटी चिमण्याना राहण्यास योग्य आहेत. त्यांच्या आरोग्यावर या घरट्यांचा कोणताही परिणाम होत नाही. घराच्या बाहेर घरटी लावता येतात. समेद शहा चिमण्यांची स्पॅरो पार्क घरटी वर्षभर मोफत वाटतात. ज्या लोकांनी चिमण्यांची स्पॅरो पार्क घरटी घरी बसवली आहेत,त्यांनी समेद शहा यांना सेल्फी काढून फोटो पाठवले आहेत. त्यांच्या या अनोख्या पर्यावरण आवडीची सर्वत्र सध्या चर्चा सुरू आहे.


Updated : 24 May 2022 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top