Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा आयसीयू वर !

शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा आयसीयू वर !

शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा आयसीयू वर !
X

कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असल्यावर कुटुंबातील व्यक्ती ज्या प्रकारे रुग्णाला वाचवण्यासाठी धडपड करत असतात. तीच धडपड शेतकरी द्राक्षांच्या बागा वाचवण्यासाठी करतान दिसत आहे. सांगली जिल्हा द्राक्षाच्या उत्पन्नात अग्रेसर आहे. मात्र, सध्या बरसत असणाऱ्या परतीच्या पावसानं या जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाचं सर्वात मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे.

तासगाव हे द्राक्ष उत्पन्नाचे केंद्र आहे. दर वर्षी येथून मोठ्या प्रमाणात द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यंदा हे उत्पादन पुर्णपणे घटण्याची चिन्हं आहेत.

पावसामुळे बागांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी साचले आहे. ढगाळ वातावरणात द्राक्षांच्या बागेवर डाऊनी सारखा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो. यावर वेगवेगळी रसायने फवारून शेतकरी ती आटोक्यात आणतो. मात्र, सध्या हा रोग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यात बागांमध्ये पाणी साचल्यामुळे फवारणीसाठी ट्रॅक्टर आत जाऊच शकत नाही.

शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर उध्वस्त होणाऱ्या बागा पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या चिखलातून मजुरांकडून रसायनं फवारणी करणे शक्य होत नाही. द्राक्षांच्या वेली काळे होऊन उन्मळून पडले आहेत.

हे ही वाचा:

कांद्याचे भाव कमी होणार का?

यंदा कापसाला किती भाव राहणार?

द्राक्षांचे कोवळे घड हाताने दाखवत द्राक्ष बागायतदार पृथ्वीराज माने सांगतात ‘रोगाचा प्रादुर्भाव इतका झालाय की, यावर औषध फवारणी करून देखील परिणाम होईनासा झाला आहे. एक लिटर औषधाची किंमत ५००० रुपये आहे. हे वातावरण अजून तीन दिवस राहिलं तर एकही बाग हाताला लागणार नाही. तेंव्हा कुणाला किती मंत्रिपद द्यावं? कुणाचा मुख्यमंत्री असावा यासाठी वेळ घालणाऱ्या पुढाऱ्यांनी जरा शेतकऱ्यांकडे बघावं? असं ते आवर्जून सांगतात.

द्राक्षांच्या वेलीवर वरच्या बाजूने मुळ्या फुटायला सुरवात झाली असून द्राक्षांचे कोवळे घड गळून पडत आहेत.

या परिसरात शेतकरी आपापली बाग वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करताना दिसत आहे. या सर्वात मात्र प्रशासन आणि गेल्या काही दिवसात प्रचारासाठी गल्लोगल्ली हिंडणाऱ्या राजकीय नेते गायब आहेत. बंडू धाबुगडे संतप्त होऊन शेतकरी उध्वस्त होत असताना खुर्च्या वाचवत बसणाऱ्या सरकारला लाजा वाटायला हव्यात असे सांगतात.

विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करायची वेळ पश्चिम महाराष्ट्रात आलेली असताना या भागातील लोकप्रतिनिधी कोठे आहेत? असे प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

ग्रामीण भागात शेतकऱ्याची शेती खंडीने पिकावी म्हणजे आम्हाला त्यातली ओंजळ तरी मिळेल असा आशीर्वाद शेतमजूर देत असतात. मात्र, या भागात हातातोंडाशी आलेली शेती गेल्याने शेतकरीच उध्वस्त आहे तर शेतमजुराचे काय हाल होत असतील याचा विचार करायला हवा. पावसामुळे शेतमजूर घरात बसून आहेत. भुईमुग कडधान्य पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे.

हे ही वाचा :

कृषिमूल्य आयोगाचे कारनामे

काय आहेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी?

भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनातील शेतकरी विषयी चर्चा खरी की लोकसभेतील लेखी उत्तरं?

शेतकरी एका बाजूला उध्वस्त होत आहे. तर त्याने दाद मागायला महाराष्ट्रात सरकारच अस्तित्वात नाही. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद तरी कुणाकडे मागायची? हा प्रश्न आहे.

सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांना त्यांना गेल्याच आठवड्यात ज्यांनी निवडून दिलंय त्या शेतकऱ्यांचे काही सोयर सुतक आहे की नाही? असं चित्र महाराष्ट्रात उभं राहील आहे. या भीषण परिस्थितीतून शेतकऱ्यांना वाचवलं नाही तर या राज्यातला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोजण्याशिवाय सरकारच्या हातात काहीच राहणार नाही.

Updated : 2 Nov 2019 4:32 PM GMT
Next Story
Share it
Top