Home > मॅक्स रिपोर्ट > तू कपाळाचे कुंकू पुसणार नसशील तर मला आई म्हणू नको

तू कपाळाचे कुंकू पुसणार नसशील तर मला आई म्हणू नको

एखाद्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू झाल्यावर तिच्या अंगावरील साज उतरविला जातो. तिचे कुंकू पुसले जाते. बांगड्या फोडल्या जातात. पायातील जोडवी काढली जाते. या स्त्रियांना पुन्हा कोणत्याच कार्यक्रमात हा साज चढविण्याचा परवानगी नसते. स्त्रियांना दुय्यम ठरविणाऱ्या कमी लेखनाऱ्या या परंपरेला स्वतःच्या घरातूनच विरोध करत. पतीच्या मृत्यूनंतरही कपाळावर कुंकू लावणाऱ्या मंगळसूत्र परिधान करणाऱ्या वनिता वाघमारे या महिलेची परिवर्तनाची गोष्ट वाचा सागर गोतपागर यांच्या लेखणीतून....

तू कपाळाचे कुंकू पुसणार नसशील तर मला आई म्हणू नको
X

"तु तुझ्या कपाळाचे कुंकू पुसणार नसशील, गळ्यातले मंगळसूत्र काढणार नसशील तर आज पासून मला आई म्हणू नको". वनिता वाघमारे यांच्या पतीच्या निधनानंतर पारंपारिक रुढिला फाटा देत त्यांनी गळ्यातले मंगळसूत्र काढायला कपाळाचे कुंकू पुसायला, पायातील जोडवी काढायला नकार दिला. त्यावेळी त्यांच्या आईच्या तोंडून निघालेले हे भावानिक शब्द आहेत. पण या कठीण प्रसंगात तसूभरही न ढळता त्यांनी अंगावरील साज उतरविला नाही. विशेष म्हणजे त्यांना हा साज काढण्याचा आग्रह करणाऱ्या, त्याना घेरणाऱ्या बहुतांश स्त्रियाच होत्या. ज्यातील काहींनी काही वेळापूर्वीच पतीच्या पुन्यानुमोदनाच्या कार्यक्रमात प्रबोधन करणारे स्त्रीयांना समान हक्क द्या असे सांगणारे भाषण देखील केले होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांची मुले विवेक आणि वैभव या दोघांनी तसेच डॉ अर्चना खरात यांनी खंबीरपणे साथ दिली. आमची आई आम्हाला जशी आहे. तशीच दिसायला हवी आहे. अशी भूमिका मुले व मुलांनी घेतली.

वनिता वाघमारे मुंबईतील कुर्ला येथे राहतात. त्या रिपब्लिकन पक्षाच्या सक्रीय नेत्या आहेत. बौद्ध कुटुंबात जन्माला येऊनही लोक आजही विधवा महिलांना कमी लेखणाऱ्या प्रथा परंपरा पाळतात याची त्याना चीड होती. त्यांचे पती अनेक वर्षापासून पॅरालीसिसमुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांनी अनेक वर्षे अत्यंत काळजीने त्यांची सेवा शुश्रुषा केली. उपचार करत शेवटपर्यंत त्याना वाचविण्याचा प्रयत्न केला. अखेर काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचा पुन्यानुमोदनाचा विधी बौद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमातून विधवा स्त्रीयाना कमी लेखणाऱ्या या परंपराना मोडीत काढण्यासाठी त्यांनी स्वत:पासून पुढाकार घेतला. याला होणारा विरोध नम्रपणे प्रेमाने आणि तितक्याच तीव्रतेने मोडीत काढला.

सामाजिक कार्यात सक्रीय असल्यामुळे त्या अनेक कार्यक्रमात सहभागी होतात. पतीच्या मृत्युनंतर अशाच एका लग्न समारंभात बौद्धाचार्य यांनी स्टेजवरून सूचना केली. पाच सुवासिनीनी पुढे यावे आणि हळद कुंकू लाऊन जावे. बराच वेळ कुणी पुढ येत नाही हे पाहून त्या बौद्धाचार्यांनी समोर बसलेल्या वनिता वाघमारे यांनाच पुढे बोलावले. काही क्षणातच त्यांच्या लक्षात आले कि त्यांचे पती नाहीत. स्टेजवर सर्वांसमोर त्यांनी गालावर हात मारून घेत चुकले असे म्हणाले. या प्रसंगाने त्यांचे मन दुखावले गेले. हा प्रसंग त्याना अपमानास्पद वाटला. याबाबत त्या सांगतात "ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला. ज्यांनी स्त्रीयांना बरोबरीचे अधिकार दिले. गुलामीतून बाहेर काढले. त्याच बौद्ध धम्माने पार पडत असलेल्या या कार्यक्रमात विधवा स्त्रीयाना कमी लेखले जात असेल. सुवासिनी आणि विधवा असा भेद केला जात असेल. तर हे चुकीचे आहे. हे बंद व्हायला पाहिजे. याची सुरवात मी माझ्यापासून माझ्या घरापासून करेन. माझ्या घरात होणाऱ्या कार्यक्रमात मी विधवा समजल्या गेलेल्या स्त्रीयांना पहिला मान देण्याचा निश्चय केला".





काही महिन्यानंतर त्यांचा मुलगा विवेकचे लग्न ठरले. विशेष म्हणजे त्यानेही जातीने विवाहाची घालून दिलेली बंधने मोडत आंतरजातीय विवाह बौद्ध पद्धतीने केला. त्यांच्या विहीन देखील पतीच्या निधनानंतर अनेक वर्षापासून कुंकू लावत नव्हत्या. या प्रसंगाबाबत त्या स्वतः सांगतात " माझ्या विहीनीचे पती मृत्यु पावलेले आहेत. अनेक वर्षापासून त्या कुंकू लावत नाहीत. आमच्यात पोट झाकणे म्हणून साडी आहेर घेऊन जाण्याची प्रथा आहे. ते घरी जाऊन देत असताना मी स्वत: त्याना कुंकू लावण्याचा आग्रह केला. सुरवातीला त्यांनी विरोध केला. पण विनंती केल्यावर अनेक वर्षात कुंकू न लावलेल्या मोकळ्या कपाळावर हळद आणि कुंकू सन्मानाने चमकू लागले. त्यांच्या मुलींनी गेल्या अनेक वर्षातून आईला पहिल्यांदाच या रुपात पाहिलं होत. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले".

या लग्नातील सर्व पारंपारिक कार्यक्रमात विधवा समजल्या जाणाऱ्या स्त्रियांना हळदी कुंकवाचा पहिला मान दिला गेला. मेड पुजनापासून ते सर्वच धार्मिक कार्यक्रमात सर्वच स्त्रिया पुढे होत्या. त्यांनी कार्यक्रमास आलेल्या बौद्धाचार्याना केवळ सुवासिनी हा शब्द वापरू नये असे अगोदरच बजाऊन ठेवले होते. या लग्न समारंभात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री अविनाश महातेकर यांनी त्यांचे कौतुक केले.

वनिता वाघमारे दररोज याना दररोज अनेक स्त्रियांचे अन्याय अत्याचार झाल्याचे फोन येतात. त्या दररोज त्याना मदत करण्यासाठी फिरत असतात. आजही त्या घरातून निघताना हळदी कुंकवाच्या करंडयात बोट बुडवून आरशात पाहत आपल्या कपाळावर कुंकू लावून साडीचा हिरवा पदर कंबरेला खोचून महिलांच्या मदतीला जायला त्याच चिंचोळ्या गल्लीतून एकट्या जातात. त्या गल्लीत आता त्याना बांगड्या फोडण्याचा आग्रह करणाऱ्या, कुंकू पुसण्यासाठी पुढे सरसावलेल्या स्त्रिया बसलेल्या दिसतं नाहीत. हि पारंपारिक गल्ली पार करून त्या पुढे निघून गेल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या या वाटेवरुन इतर स्त्रिया देखील परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकतील...

Updated : 1 March 2022 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top