Home > मॅक्स किसान > सरकारशी लढून मरु, पण आता आत्महत्या करणार नाही !

सरकारशी लढून मरु, पण आता आत्महत्या करणार नाही !

सरकारशी लढून मरु, पण आता आत्महत्या करणार नाही !
X

परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पिकांचं नुकसान झालं होतं. तोंडाशी आलेले पीक गेले. त्यातच कांद्याचे भाव कोसळल्याने तीन दिवसापूर्वी नगर तालुक्यातील खडकी गावचे शेतकरी अरूण कोठुळे यांच्या कांद्याला 8 रूपये भाव मिळाला. याचे दु:ख झाल्यानं रडताना त्यांचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर मॅक्समहाराष्ट्र ची टीम त्यांच्या शेतात पोहोचली आणि त्यांची व्यथा जाणून घेतली त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट.

परतीच्या पावसाने कांदा सडला / Photo : रोहित वाळके

दोन वर्षांपासून दुष्काळ आणि आता परतीच्या पावसानं झालेलं नुकसान यात आमचे सर्व पैसे संपले आहे. आता सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली तरी कर्ज भरू शकतो. अन्यथा बॅंकेने आमच्या जमीनीचा लिलाव करावा. ‘आम्ही पैसे कुठुन आणणार घर कसे चालवणार? जर सरकारने कर्जमाफी केली नाही. तर आम्ही आता आत्महत्या करणार नाही. अरूण कोठुळे यांची खडकी सात एकर शेती आहे. सर्व सात एकरात कांदा लागवड केली आहे. त्याच्या नावावर 80 हजार रूपये तर पत्नी च्या नावावर 80 हजार रुपये आणि आईच्या नावावर 40 हजार रूपये कर्ज आहे. पीक विमा भरला आहे. पण 30% पैसे मिळाले आहे. लागवडीचा खर्च 70 ते 80 हजार रूपये झाला.

त्यात 8 रूपये गेलेल्या कांद्याचे पाच हजार रुपये आले आहेत. घरी पत्नी आई वडील दोन मुलं आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी व घर चालावायला देखील अरूणकडे पैसे उरले नाहीत. त्याने एकच भूमिका घेतली आहे. जर कर्जमाफ झाले नाही. तर सरकारच्या धोरणाविरोधात मैदानात उतरून लढा देणार आहेत.

अरुण म्हणतात...

‘मुगाचं पीक वाया गेलं म्हणून ते मोडून कांदा केला. मुगाचा विमा उतरवला होता. पण काय झालं? असा सवाल उपस्थित करत कांदा पिकाला चार फवारण्या केल्या. दोन वेळा खुरपणी केली, खत टाकले, बी विकत घेतलं, बियाणांसाठी 20 ते 25 हजार लागले. एका फवारणीला 7 – 7 हजार रुपये खर्च झाला. 40 ते 50 हजार रुपये लागले नुसता पिकासाठी खर्च केला. उसने पैसे घेऊन मी शेती केली. ... आणि आम्हाला ७ ते ८ रुपये किलो कांद्याला भाव दिला जातो. कसं होणार?

माझ्यावर जिल्हा बॅकेचं कर्ज आहे. ते तीन नवर्षापासून थकीत आहे. कांद्याला असा भाव मिळाला तर कर्ज कसा फेडणार? माझ्या कांद्याला असा भाव मिळाल्यानंतर मला समजलं. त्यामुळं शेतकरी का आत्महत्या करतो? याचा अंदाज मला आला.

पडलेल्या कांद्याकडे पाहून अरुण म्हणतो ‘दुसरं पीक करायचं म्हटल्यावर कसं करायचं? रडणार नाही तर काय करणार? नशीब आम्ही रडून राहतो... काही काही शेतकरी आत्महत्या करतात जुने लोक दम धरत नाही... आम्ही लोक दम धरतो. असं वाटतं नवीन सरकार आलं तरी मदत करेल.

जरा शांत होत... एक दीर्घ श्वास घेत अरुण म्हणतो आता आम्ही आत्महत्या करणार नाही. आता आम्ही सरकारशी लढा देऊ. कोणतंही सरकार असू आम्ही लढता लढता मरणार... पण आम्ही आत्महत्या करणार नाही. सरकार सोबत लढून मरणार.

सध्याच्या परिस्थीतीवर अगतिक झालेला अरुण म्हणतो, कोणत्याही मंत्र्यांनी येऊन नफ्याची शेती करुन दाखवावा. मी म्हणणं ते करायला तयार आहे. घरात प्रत्येक व्यक्तीच्या नावावर कर्ज आहे.

या संदर्भात बोलताना अरुणची आई सांगते...

5 हजार रुपयांची पट्टी आली आहे. त्यातील अर्धा माल नासला. पावसानं सगळं पीक वाया गेलं. काय करायचं? कर्ज कशानं भरायचं? शेतीच्या जीवावर कसं जगायचं? गेल्या दोन वर्षापासून दुष्काळ, आता ओला दुष्काळ? काय खायचं लेकरा बाळांनी?

असा सवाल अरुण ची आई विचारते आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांची अशीच काही परिस्थीती आहे. एक वेळ पीक आलं नाही तर ठीक असतं, मात्र, पीक जेव्हा काढणीला येतं. तेव्हा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. शेतकऱ्यांना सरकारकडून एकच अपेक्षा असते. ती म्हणजे त्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा. मात्र, शहरी मतदारांना खूश ठेवण्यासाठी कोणतंही सरकार शेतकऱ्यांचा विचार न करता मतांचा विचार करुन वारंवार कांदा आयात करतं. त्यामुळं अरुण सारख्या अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी आहे.

Updated : 14 Nov 2019 3:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top