Top
Home > मॅक्स रिपोर्ट > #SpecialReport लेखनिक नसल्यानं दृष्टीहीन 12 वीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात...

#SpecialReport लेखनिक नसल्यानं दृष्टीहीन 12 वीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात...

#SpecialReport लेखनिक नसल्यानं दृष्टीहीन 12 वीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात...
X

कोरोनाचं संकट बऱ्यापैकी निवळल्यानंतर राज्य सरकारने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर 10 वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. या संदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

मात्र, यंदा परीक्षेत दृष्टीहीन मुलांनी परीक्षा कशा द्यायच्या? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण 12 वी ची परीक्षा देत असताना 11 वीचे विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करत असतात. तसा निकषही आहे. परंतू यंदा Covid-19 च्या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचं गणित बिघडलं आहे. त्यामुळं दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्यासमोर लेखनिक कुठून आणायचे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

यासंदर्भात आम्ही काही दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला... साबीर शेख हा विद्यार्थी सध्या पुण्याच्या मॉर्डन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. तो सांगतो आमच्या परीक्षा जवळ आल्या असताना देखील आम्हाला लेखनिक मिळालेला नाही. आम्ही कितीही अभ्यास केला तरी योग्य लेखनिक न मिळाल्यास आमचे नुकसान होऊ शकते.

अशीच परिस्थिती गणेश कदम याची देखील आहे. गणेश कदम सांगतो... सध्या 12 वीच्या परीक्षा येत आहेत. 12 वीसाठी अंध विद्यार्थ्यांना रायटरची गरज असते. तर आम्हाला रायटरची समस्या निर्माण झाली आहे. 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रश्नामुळे आम्हाला रायटर मिळत नाही. महाविद्यालय आम्हाला व्यक्तीगत पातळीवर स्वत: लेखनिक शोधा असं सांगत आहेत. व्यक्तिगत पातळीवरती रायटर शोधण्यासाठी जी मुलं शहरांमध्ये शिकतात. जसं की मी पुण्यात वसतीगृहात राहतो, पुण्यात शिकण्यासाठी आलो आहे. त्यात माझ्या पुण्यात काही ओळखी नाही. त्यामुळं मी रायटर कुठून आणायचा असा सवाल गणेश ने केला आहे.

महाविद्यालय दरवर्षी आम्हाला रायटर देत असतं. मात्र. यंदा कोरोनामुळे 11 वीच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मी बाहेरचा आहे. समजा मी इथं रायटर ला घेऊन आलो तर त्यांची इथं राहण्याची व्यवस्था नाही होतं. कारण आम्ही व्यक्तिगत वसतीगृहात राहतो. आणि त्यांना इथं ठेवणं अडचणीचं आहे. मला असं वाटतं की शालेय शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यावं असं गणेश सांगतो.

नाशिकच्या राहुल पवार ची परिस्थिती देखील अशीच आहे. तो म्हणतो... लेखनिकाची मोठी अडचण उद्भवली आहे. या संदर्भात आम्ही महाविद्यालयातील प्रशासनाला सांगितले असता, तुम्ही तुमच्या व्यक्तिगत पातळीवर लेखनिक शोधा. असं महाविद्यालयाकडून सांगण्यात येत आहे. मी नाशिक मध्ये नवीन आहे आणि वसतीगृहात राहतो. आता आम्ही आमच्या व्यक्तिगत पातळीवर लेखनिक शोधावे तरी कसे? गावाकडून जर लेखनिक आणले तर त्यांची राहण्याची व्यवस्था कशी करावी? असा सवाल राहुल पवार यांनी केला आहे.

मुंबईतील विद्यार्थ्यांची देखील अशीच परिस्थीती आहे... मुंबईत शिकणारा शुभम सोळंके सांगतो... मी मुंबई येथील एलफिस्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. मला लेखनिकाची मोठी अडचण उद्भवली आहे. आमच्या या अडचणीकडे शालेय शिक्षण विभागाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी शुभम ने केली आहे.

अमरावती विभागात देखील अशीच परिस्थिती असल्याचं प्रविण शिंदे सांगतात. प्रविण शिंदे हे माणुसकीचा हात या गटात काम करतात. हा गट दृष्टीहीन विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम करतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता एकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसमोर रायटरचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या प्रश्नाकडे गांभीर्यपुर्वक लक्ष द्यावा. अशी मागणी प्रविण शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान या सर्व विद्यार्थ्य़ांनी सामाजिक संस्थांना देखील त्यांना रायटर उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. सध्या राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट येऊ शकतं. अशा परिस्थितीत राज्यातील सामाजिक संघटनांनी त्यांना मदतीचा हात द्यावा. अशी विनंती त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना राज्यातील जनतेला केली आहे. जर आम्हाला लेखनिक मिळाला नाही. तर आमचं वर्ष वाया जाईल. त्याचबरोबर परीक्षा तोंडावर असताना अभ्यासापेक्षा आम्हाला रायटर नसल्याचं मानसिक दडपण आलं आहे. त्यामुळं सामाजिक संस्थांनी यामध्ये लक्ष घातलं तर अधिक मदत होईल. असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

या संदर्भात मॉर्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्याशी बातचीत केली, यावेळी त्यांनी आम्ही आमच्या पातळीवर सहकार्य करण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं. त्याचबरोबर आम्ही या संदर्भात शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार , महिला व बालविकास, इतर मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी 'मी उद्या या संदर्भात बैठक घेतो. आणि यातून कशा प्रकारे निर्णय घेता येईल. ते ठरवू. कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.. राज्यातील सर्वच कॉलेजची ही परिस्थिती आहे. त्यामुळं या दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी त्यांना लेखनिक मिळवून देण्यास शासनाने मदत करावी. अन्यथा आमचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येईल. असं या विद्यार्थ्यांचं मत आहे.

Updated : 2021-02-18T19:43:25+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top