Home > मॅक्स रिपोर्ट > लहान मुले बाहेर सोडताय... तर मग सावधान!

लहान मुले बाहेर सोडताय... तर मग सावधान!

लहान मुलामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत असताना लहान मुलांमध्ये कोरोनाची नक्की कोणती लक्षण आढळत आहेत. या संदर्भात तज्ज्ञांचं नक्की मत काय आहे? वाचा प्रदीप लोखंडे यांचा स्पेशल रिपोर्ट

लहान मुले बाहेर सोडताय... तर मग सावधान!
X

आपले लहान मुलं बाहेर सोडताय... किंवा ते घरच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या सोबत खेळत आहे... तर मग सावधान... कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लहान मुलांना देखील त्वरित कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर उपचार घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती डॉक्टर देत आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना घातक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट देखील लहान मुलांना घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सध्या सुमारे 10 कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. पूर्वी केवळ एखाद्या मुलावर उपचार केले जायचे. आता ते प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. वायसीएम मध्ये सध्या 2 वार्ड मध्ये 60 बेड लहान मुलांसाठी ठेवण्यात आले आहेत. या मध्ये नवजात अर्भकांसाठी 18 आयसीयु बेड तर उर्वरित बालकांसाठी 12 आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या बरोबरच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देखील ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

लहान मुलांमध्ये आढळलेली लक्षणे -

मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आढळत आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांना याचा अधिक त्रास होत आहे. ही मुले पॉझिटिव्ह आल्यास त्यांना उलटी, जुलाब, जास्तीचा ताप, सर्दी आदी लक्षणे जाणवत आहेत.

...तर मुलंही पॉझिटिव्ह असतील

अनेकदा घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह असताना. अशावेळी जवळ असलेल्या लहान मुलाला कोणताही त्रास झाला नसल्याची उदाहरणे सापडत आहेत. किंवा त्वरित तपासणी केल्यास ती निगेटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर 5 दिवसानंतर मुलांमध्ये लक्षणे जाणवत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

लहान मुलांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्यास ठरतोय घातक

प्रतिकार शक्ती चांगली असल्यास अनेक लहान मुलांना कोरोना होऊन गेल्याचे देखील कळत नाही. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मात्र, अशा मुलांना दुसऱ्यांदा कोरोना ते घातक ठरत आहे. मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्याने त्याचा ताण हृदयावर पडण्याची शक्यता आहे. तसेच या मुलांना मानसिक धक्का देखील बसू शकतो. तोंडावर व्रण आढळून येतात तर मानेवर काटा उभा राहत असल्याचे बालरोग तज्ज्ञ सांगत आहेत.

एका मुलाचे पालकांशी संदर्भात बातचीत केली असता ते सांगतात...

आमच्या घरातील सर्व पॉझिटिव्ह आले होते. मात्र, घरात असलेल्या 2 वर्षाच्या लहान मुलाला काहीही त्रास नव्हता. इतर नातेवाईकांनी त्याच्याकडे लक्ष दिले होते. सध्या तो बरा आहे.

या संदर्भात नवी सांगवी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देणाऱ्या डॉ. सुचित्रा खेडकर यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्या म्हणाल्या...

12 ते 17 वयोगटातील मुलांना दुसऱ्या लाटेत संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेर खेळताना संसर्ग होतो. अथवा इतर मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लहान मुलांना संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. ही संसर्गाची दोन कारणे आढळत आहेत. ही मुले लवकर बरी होत आहेत. ऑक्सिजन वगैरे लावण्याचे प्रकारही कमी आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेत ते वाढू शकते. दुसऱ्या लाटेत अधिक पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते.

Updated : 28 May 2021 8:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top