Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : झोपडीतून पक्क्या घरात समस्या मात्र त्याच...

Ground Report : झोपडीतून पक्क्या घरात समस्या मात्र त्याच...

Ground Report : झोपडीतून पक्क्या घरात समस्या मात्र त्याच...
X

नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवणं आणि त्याबाबतच्या समस्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सोडवण्याची जबाबदारी असते. यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दक्ष असणे गरजेचे असते. पण जर लोकप्रतिनिधीच गप्प राहिले तर सामान्यांना काय त्रास होतो याचे जिवंत उदाहरण तासगावमध्ये समोर आले आहे. इथल्या इंदिरानगर भागातील झोपडपट्टीतील नागरिकांना पक्की घरं देण्याच्या हेतून दिवंगत आर.आर.पाटील यांनी इथे घरकुल योजना आणली. योजनेचा हेतू चांगला होता. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसते आहे.

तुटलेले दरवाजे....कचऱ्याचे साम्राज्य.....गळणारी घरं...अनेक समस्यांचा सामना करत दिवस काढणारे नागरिक....ही परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील इंदिरानगर भागातील नागरिकांची....इथे आधी झोपडपट्टी होती...पण शहरातील बेघर नागरिकांना घरकुल देऊन त्यांची एक नवीन वसाहत बांधण्यात आली. ही वसाहत म्हणजे तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी आहे... 2013 साली इंदिरा घरकुल आवास योजने अंतर्गत एकूण 393 घरं बांधण्यात आली. मात्र 2013 पासून या ठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची सोयी नाहीत....लाईट नसल्याने येथील एका वर्षाच्या बाळाला घुशीने चावा घेतला आहे.



तासगाव शहरातील बेघर, मागासवर्गीय दलित लोकांसाठी 2013 साली तासगाव पालिकेने 393 घरकुल मंजूर केली. मात्र या घरांमध्ये लोक राहत असल्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसते आहे. या वस्त्यांमध्ये काही ठिकाणी घाणीचे साम्राज दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सांडपाणी जाण्यासाठी गटारी केल्या आहेत. मात्र त्यातील साचलेला गाळच काढण्यात आलेला नाही. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या ठिकाणी वस्तीत लोक जनावरासारखी राहत आहेत.

या ठिकाणी ज्या लोकांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यांनी घरं ताब्यात घेऊ रहायला आले. मात्र त्या ठिकाणी काही लोक अनधिकृतपणे राहत आहेत, असा आरोपही इथल्या लोकांनी केला आहे. काही लोकांची या योजनेत नावे आहेत. पण तेथे राहण्यासाठी जागा नाही. जे लोक तेथे राहतात त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. घरं आहेत पण त्यांना दारे खिडक्या नाहीत. शौचालय आहेत, पण पाणी नसल्याने ती बंद अवस्थेत आहे. त्यामुळे स्त्रियांना उघड्यावर शौच करण्यासाठी जावे लागते. इतक्या वाईट परिस्थितीत येथील लोक दिवस काढत आहे. या संदर्भातील तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेला नागरिकांनी दिल्या आहेत. पण नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

इंदिरानगर झोपडपट्टीत गेल्या अनेक वर्षांपासून काही घरांमध्ये लाईट नाहीत. या ठिकाणी लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडणे हे धोकादायक असल्याचे नागरिक सांगतात. डुक्कर, घुशी, साप यासारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यामुळे रात्रीचे घरातून बाहेर पडणे धोकादायक मानले जाते. इंदिरानगर झोपडपट्टी येथे राहत असलेल्या शोभा शिंदे यांच्या घरात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने त्यांच्या घरात झोपलेल्या एका वर्षाच्या नातीला घरात घुसून घुशीने चावा घेतला. यामुळे येथील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचेही दिसते आहे. या ठिकाणी 393 घरांची योजना तयार करण्यात आली खरी मात्र अतिशय नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. या घरांना दारं नाही आणि खिडक्याही नाहीत. स्लॅबही गळत आहे, अशी परिस्थिती या इंदिरानगर झोपडपट्टीची आहे.




या संदर्भात तासगाव पालिकेला निवेदन देण्यात आले. आंदोलनं करण्यात आली मात्र या पालिकेला कधीच कोणत्याच आंदोलनाचा फरक पडलेला नाही. तासगाव शहरातील मंजूर झालेल्या घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणत भष्टाचार झाल्याचे आरोपही वारंवार झाले आहेत. मात्र या ठिकाणी सत्तेत असलेला भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी यांच्यात साटेलोटे असल्याचे नागरिक सांगतात. नगराध्यक्षांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला पण ते उपलब्ध नव्हते.

वीज पुरवठ्याबाबत तासगावचे महावितरण विभागाचे शाखाधिकारी व सहाय्यक अभियंता किरण भोईटे यांना आम्ही संपर्क साधला तेव्हा, त्यांनी सांगितले की, 2016 मध्ये तासगाव नगरपालिकेने ज्या लोकांना घरकुल वाटप केलेली आहेत, त्यातील 120 घरांना वीजपुरवठा केलेला आहे. तेव्हापासून आतापर्यंत नवीन अर्ज खूप आले पण ते अर्ज कागदपत्रांच्या अपूर्ण असल्याने आम्हाला त्या लोकांना वीज कनेक्शन देता आले नाही. दरम्यान 2016 रोजी महावितरण विभागाला एक पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये नगरपालिकेने आपल्या परवानगीशिवाय इंदिरानगर झोपडपट्टी येथे वीज कनेक्शन देण्यात येऊ नये, असे महावितरण विभागाला कळवले असल्याने त्या ठिकाणी वीज कनेक्शन दिलेली नाहीत, असे सांगितले.



तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपची युती असल्याने या नित्कृष्ट दर्जेच्या कामावर बोलण्यास एकही नेता नसल्याची चर्चा आहे. या घरकुल योजनेचे काम अजूनही अपूर्ण आहे. 393 घरे बांधली खरी मात्र यातील फक्त 120 घरांचे वाटप करण्यात आले. उर्वरित घरांचे वाटप अजूनही करण्यात आलेले नाही. जी 393 घरे बांधण्यात आली आहेत. त्या घरांची कामेही अर्धवट करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विद्यमान नगरसेविका राष्ट्रवादीच्या नेत्या पद्मिनी जावळे यांनी राष्ट्रवादी व भाजपची सेटलमेंट असल्याच्या आरोप इन्कार केला. त्या म्हणाल्या की,120 लोकांना 2016 रोजी घरकुल वाटप केले आहे. त्या धर्तीवरती बाकीच्या लोकांना घरांचे वाटप झाले पाहिजे. उर्वरित नागरिकांना लाईट, पाणी कनेक्शन दिले पाहिजेत. तर भाजपचे गटनेते जाफर मुजावर यांनी असे सांगितले आहे की,काही घरे गळकी व नित्कृष्ट दर्जाची आहेत. ती घरे नगरपालिकेने ताब्यात घेतलेली नाहीत. मात्र त्या ठिकाणी ज्या घरांना लाईटचे कनेक्शन नाही. त्या घरांना महावितरणला वीज कनेक्शन जोडण्यास खासदार संजयकाका पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांना पत्र देण्यास सांगितले असून येत्या दोन दिवसात सर्व वीज कनेक्शन जोडून घेणार असल्याची माहिती जाफर मुजावर यांनी दिली.

तर दुसरीक़डे या भागातील महिलेने राजकीय हेतुने इथली कामं केली जात नसल्याची तक्रार केली आहे. पण कोण कामं अडवत आहे, हे नाव सांगणे त्यांनी पुढील कारवाईच्या भीतीने सांगणे टाळले. पण राजकारणातून जनतेचे भले झाले पाहिजे असा हेतू असला तरी प्रत्यक्षात तसे झालेले दिस नाही.

Updated : 27 Aug 2021 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top