Home > मॅक्स रिपोर्ट > नामांतराचा वाद पण औरंगाबादकरांच्या समस्यांचे काय?

नामांतराचा वाद पण औरंगाबादकरांच्या समस्यांचे काय?

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पण यामध्ये शहराच्या समस्यांचा मुद्दा मागे पडतोय, औरंगाबादकरांचे नेमके म्हणणे काय आहे हे दाखवणारा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

नामांतराचा वाद पण औरंगाबादकरांच्या समस्यांचे काय?
X

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर जोर धरू लागली आहे.विशेष म्हणजे यावरून राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. तर सत्तेत सोबत असलेले पक्ष याच मुद्यावरून एकमेकांच्या विरोधात उभे राहताना पाहायला मिळत आहे. तर विरोधी पक्षा सुद्धा यावरून सोन्याची संधी साधताना पाहायला मिळत आहे. नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणावरून औरंगाबाद शहराच्या विकासाचा मुद्दा मात्र मागे पडताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरातील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचऱ्याचा प्रश्न अजूनही कायम आहे.तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामूळे सामन्य औरंगाबादकरांना नामांतराच्या मुद्यापेक्षा विकासाचा मुद्दा जिवाभावाचा वाटतो.

कचरा प्रश्न कायम?

गेल्यावर्षी औरंगाबाद शहराचं नाव कचराबाद म्हंटलं जात होता. त्याचे कारण म्हणजे गेली कित्येक वर्षांपासून शहराच्या नारेगाव भागात कचरा डम्पिंग केला जात होता. मात्र परिसरातील नागरिकांनी याला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. पुढे न्यायालयाने नारेगावमध्ये कचरा टाकण्यास कायमची मनाई केली. त्यांनतर शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला. महानगरपालिका आणि प्रशासन हतबल झालं. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध होत होता. त्यामुळे शहरात ठीक-ठिकाणी कचऱ्याचे डोंगर पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे याच कचऱ्याच्या मुद्यावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना औरंगाबादकरांची माफी मागावी लागली. पण त्यांनतर काही खाजगी कंपन्यांना कंत्राट देत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्यक्षात आजही अनेक भागात कचऱ्याच्या प्रश्न कायम आहे. रस्त्यावरील कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. त्यामुळे शहराच नाव बदलण्यापेक्षा शहरातील कचरा साफ करण्याची मागणी नागरिक करत आहे.

पाणी प्रश्न गंभीर..

औरंगाबाद शहरात कचऱ्याप्रमाणेच पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे. यावेळी जायकवाडी धरण 100 टक्के भरूनही आजही औरंगाबादच्या अनेक भागात आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. तर अनेक भागात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही.शहरातील बायजीपुरा भागात दरवेळी गढूळ पाणी येत असून, लोकांना आजाराचा सामना करावा लागत असल्याच तेथील नागरिक तमोजुद्दीन भाई सांगतात. तर काही भागात एकदा पाणी सोडल्यावर कित्येक वेळ सुरुच राहत असल्याने पाण्याची नासाडी होते. लोंढ्याचे लोंढे रस्त्यावर वाहत असते.त्यामुळे प्रशासनाच नियोजन नसल्याचं समोर येते. विशेष म्हणजे सत्तेत असलेले राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देत नाही.

रस्त्यावर खड्डेच-खड्डे

औरंगाबाद शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डेच-खड्डे पाहायला मिळतात. औरंगाबाद शहरात एन्ट्री करतानाच रेल्वे स्टेशन उड्डाणपूलावरील रस्त्यावर नेहमीच खड्डे पडलेले असतात. दरवेळी माती-मुरूम टाकून थातुरमातुर काम करून बिले काढली जाते. असच काही चित्र बीड-बायपास रोडवर आहेत.खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काहीच कळत नाही. शरीरातील अनेक भागात रस्त्याची ही परिस्थिती कायम आहे. पण येथील राजकीय नेत्यांना यापेक्षा जिल्ह्याचं नाव बदलण्याचा मुद्दा अधिक महत्वाचं वाटत हे औरंगाबादकरांच नशीब आहे.

नागरिक काय म्हणतात..!

रस्त्याच्या कडेला रोज भाजीपाला विकून पोट भरणाऱ्या अरुणा जोगदंडे म्हणतात की,रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी भाजीपाला विकून दोन पैसे कमावते.गेल्या 25 वर्षांपासून माझा हाच व्यवसाय आहे.मात्र एवढ्या काळात आम्हला कधीच व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळाली नाही. महानगरपालिकेची लोकं येतात आणि दुकान बंद करायला भाग पाडतात. त्यामुळे शहराचे नाव बदलण्यापेक्षा, माझ्या सारख्या व्यवसाय करणाऱ्यासाठी काही तरी सोय सुविधा करावी अशी मागणी अरुणा जोगदंडे यांनी केली.

संभाजीनगर असो इतर काहीही आम्हाला नामांतराशी काहीही देणं घेणं नाही, मात्र आमच्या पोटापाण्यासाठी काही करता आलं तर ते सरकारने करावं. तसेच आमची मुलं बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी देण्यासाठी काही हालचाली कराव्यात असं,म्हणत एक वयस्कर आजी आपलं दुःख मॅक्स महाराष्ट्राकडे मांडत होत्या.

निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष औरंगाबाद की संभाजीनगर असा वाद पुढे आणला आहे.शहरात रस्ते,ड्रेनेज,नाले यासारख्या अनेक समस्या आहेत. मात्र राजकीय लोकांनी याविषयी काहीच देणंघेणं नाही.या लोकांनी गरज नसताना शहराचं नाव बदलण्याचा मुद्दा समोर आणला असल्याचं संदीप कंठे म्हणतात.

अभ्यासक काय म्हणतात..!

तर निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आपण केलेल्या विकास कामांबद्दल सांगण्यासाठी काहीच नसल्याने असे नामांतराचे मुद्दे समोर आणले जात असल्याच,जेष्ठ अभ्यासक शांतीराम पंदेरे म्हणतात.तसेच लोकांच लक्ष विचलीत व्हावे म्हणून जात-धर्मावरून म्हणजेच हिंदू विरुद्ध मुस्लिम असे चित्र निर्माण केले जाते. आपल्या पाया खालीची वाळू टिकवून ठेवण्यासाठी अशीच काहीना काही नाट्य सुरू असतात.राज्यात आणि केंद्रात यांचीच सत्ता होती,औरंगाबादमध्ये गेल्या 30 वर्षांपासून यांची सत्ता आहे. पण तेव्हा आपण काहीच केलं नसल्याने आता मुस्लिम विरोधात वातावरण तयार करणे म्हणजेच हा नामांतराचा भाग असल्याचं शांतीराम पंदेरे म्हणतात.

तीस वर्षांपूर्वी शिवसेने महानगरपालिकेत सत्ता असताना औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा ठराव पास करून शासनाला पाठवला होता. मात्र केंद्रात काँग्रेसची सत्ता असल्याने हा प्रस्ताव मंजूर होत नसल्याच अनेकवेळा शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं.परंतु एकवेळ अशी आली की, केंद्रात आणि राज्यात देखील हिंदुत्ववादी विचारसरणीच सरकार आलं. विशेष म्हणजे हे सलग पाच वर्षे चालले सुद्धा, परंतु या काळात अशा स्वरूपाचा प्रस्ताव दोन्ही शासनाकडून मंजूर करण्यात शिवसेनेला अपयश आलं. मात्र प्रत्येक निवडणूक आली की हाच मुद्दा शिवसेनेकडून लावून धरण्यात येतो असं ज्येष्ठ संपादक धनंजय लांबे म्हणतात.त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलणे हा फक्त राजकारणाचा भाग असून, मतदाराच्या मनाला भावनीक दृष्टया हात घालण्याची जी गरज असते,त्यासाठी हा नामांतराचा मुद्दा वापरला जाईल असही धनंजय लांबे म्हणतात. एकूणच औरंगाबाद शहराचे नाव तेच ठेवून जिल्हा संभाजीनगर करण्याचा पर्यायसुद्धा सुचवण्यात आला आहे. आता सरकारला यावर तोडगा काढायचा की राजकारण करायचे ते ठरवावे लागेल.

Updated : 11 Jan 2021 3:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top