Home > मॅक्स रिपोर्ट > खाकीचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

खाकीचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

राज्यात गेल्या 3 वर्षांपासून पोलीस भरती रखडल्याने असंख्य तरुण-तरुणी हतबल झाले आहेत. पण या भरती प्रक्रियेशी संबंधित अनेक व्यवसायसुद्धा ठप्प झाले आहेत. या संपूर्ण भरती प्रक्रियेचा आणि ती रखडल्याने झालेल्या परिणामांचा आढावा घेणारा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

खाकीचे स्वप्न कधी पूर्ण होणार?
X

औरंगाबाद: राज्यात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. अशात राज्यात सत्ते येणारे सत्ताधारी कायम मोठमोठ्या सरकारी भऱतींच्या घोषणा करतात. पण राज्यात गेल्या ३ वर्षांपासून पोलीस भरतीच्या केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मात्र, भरती प्रक्रिया होत नसल्याने राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण निराश झाले आहेत. पोलीस दलात काम करण्याची इच्छा आहे, त्यामुळे भरपूर तयारी करूनही भरती होत नसल्याने तरुण निराश झाले आहे. आर्थिक, शारिरीक आणि मानसिक त्रास या तरुणांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये संतापाची भावना वाढत चालली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर गेल्या वर्षी राज्य सरकारने १२ हजार ५०० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पोलिसांची भरती केली जाईल, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटल्यांनतरही कोणतीच भरतीची हालचाल नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण निराश झालेत. आता पुन्हा पोलीस भरतीची घोषणा केली जाणार आणि त्यानंतर मात्र भरती काही होणार नाही, या कल्पनेनेच या तरुणांचा संतापही वाढत चालला आहे.

पाच वर्षांपूर्वी राज्यात तब्बल १० हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात म्हणजेच, २०१८-२०१९ या वर्षामध्ये आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यात आले. मात्र भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. २०१८ मध्ये प्रतीक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) असलेल्या जवळपास २ हजार उमेदवारांचे काय? हा प्रश्न गेल्या २ वर्षांपासून अनुत्तरीतच आहे. तसेच २०१९ मध्ये सुद्धा पोलीस भरती झालीच नाही.

२०२० मध्ये आलेल्या कोरोनाने पोलीस दल हादरले. आधीच राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच कोरोनामुळे पोलिसांवर कामाचा अधिकचा ताण वाढला. शिवाय अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे पोलीस भरतीबाबत सरकारने निर्णय घेतला पण तो केवळ घोषणेपुरताच राहिला आहे.


पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तरुण मुले जोरदार तयारी करतात. पहाटे उठून मैदानी परीक्षेसाठी तयारी करण्यापासून ते लेखी परीक्षेसाठी बौद्धिक तयारी करण्यामध्ये यांचा दिवस निघून जातो. पोलीस भरतीसाठी वयाची अट असल्यामुळे प्रत्येक संधी ही शेवटची संधी असते असं समजून पोलीस दलात भरतीसाठी तयारी करणारे तरुण आता हतबल झालेत. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या वर्षांमधला काही काळ हे तरुण पोलीस भरतीच्या तयारीसाठी देत आहेत. त्यांचा विचार राज्य सरकारने करण्याची गरज आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने मागच्या वर्षी लॉकडाऊन जाहीर केला. आता यंदाही तीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत, तर लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबल्याने शासनाने नोकर भरतीची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे अनेक मुलांचे सरकारी नोकरीचे स्वप्न भंगले. ज्यांचे वय वाढत चालले आहे, त्या मुलांना आता अपात्र होण्याची भीती वाटतेय. त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्या मेहनतीनंतर त्यांना किमान परीक्षा देण्याचा हक्कच तर नक्की आहे. आता त्यांचे वय उलटून गेले तर त्यांची संपूर्ण मेहनत वाया जाणार आहे.

कोरोनामुळे राज्यातील बेरोजगारी वाढत चालली आहे. खासगी कंपन्या मनुष्यबळ कमी करण्यावर भर देत आहेत. आता बेरोजगार तरुणाईची भिस्त सरकारी नोकरीवर अवलंबून आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण, तरुणी सैन्य व पोलीस दलाला प्राधान्य देत आहेत. पण, जवळपास तीन वर्षांपासून राज्यात पोलीस भरती झालेली नाही. २०१९ मध्ये पोलीस भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. मात्र, प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ती प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि नव्या भरतीची प्रक्रिया सुरु केली तर तरुण पुन्हा नव्या उमेदीने आपली तयारी सुरु ठेवतील.

राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्ती झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्त, बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्ते पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वदभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलीस भरती होण्याची शक्यीता असल्याने लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी मोठ्या अपेक्षेने करत आहेत.

अशीच काही परिस्थिती औरंगाबादच्या विकास पवार यांची झाली आहे. वडिलांनी आयुष्य शेतात राबराब राबून विकास यांचे शिक्षण पूर्ण केले. मुलाला चांगले शिकवले तर तो काही तरी करेल म्हणून आजही विकास यांचे वडील 4 एकर शेतात दिवसाची रात्र करून मेहनत घेत आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी विकास सुद्धा गेल्या पाच वर्षांपासून पोलीस भरतीचा सराव करत आहे.

विकासने आतापर्यंत दोनदा भरतीसाठी प्रयत्न केले. पण त्यांना या प्रयत्नांमध्ये यश आलं नाही. पण त्याची जिद्द अजूनही कायम आहे. पण सरकारच्या उदासीन धोरणासमोर त्याची जिद्द कमी पडते आहे. प्रचंड कष्ट करूनही केवळ सरकार पोलीस भरती प्रक्रिया राबवत नसल्याने विकास आता हतबल झाला आहे.


"गेल्या तीन वर्षांपासून माझा दिवस ग्राउंडवर निघतो, सतत सराव करून दिवसभर अभ्यास करण्यात व्यस्त असतो. पोलीस भरतीची तारीख प्रत्येकवेळी वाढत चालली आहे. पण घरची परिस्थिती अशी नाही की,आई-वडील पुढे आणखी पैसे लावू शकतात. त्यामुळे आता लवकरच भरती झाली नाही तर, सराव थांबवून कुठंतरी काम बघावे लागेल," असं विकास पवार म्हणतो.

विकास प्रमाणेच ऋषिकेश शिरसाठ या तरुणाचीहीह परिस्थती आहे. गेली चार वर्षे ऋषिकेश पोलीस भरतीची तयारी करत आहे. पण पोलीस भरतीच सुरू होत नसल्याने, तो निराश झाला आहे. भरतीच्या तयारीसाठी ऋषिकेशने शहरात जाऊन मित्रांसोबत रूम करून राहण्याचा निर्णय घेतला. मेस,रूम भाडे आणि क्लासेस यासाठी ऋषिकेशला महिन्याला 7 हजार रुपये खर्च लागतो. मात्र, काही दिवसांपूर्वी वडील कामावरून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता घरची जबाबदारी ऋषिकेशवर आली आहे. अशातही पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऋषिकेशची धडपड सुरु आहे. पण सरकार भरतीची प्रकिया राबवत नसल्याने, ऋषिकेश सुद्धा हतबल झाला आहे.

अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली...

सरकारी घोषणा झाल्या, पण गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही. त्यामुळे भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांपैकी अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. वयाचे 5-6 वर्षे घालवूनही पोलीस भरतीपासून त्यांना मुकावे लागत आहे. तर भऱतीसाठी असलेली वयोमर्यादा 6-7 महिन्यांना ओलांडली जाईल असेही अनेक जण आहेत. त्यामुळे जर भरती झाली नाही, तर त्यांना सुद्धा पोलीस बनण्याचं स्वप्न सोडावे लागणार आहे.


लग्नासाठी मुलींना घरच्यांचा आग्रह

मुलांप्रमाणे अनेक तरुण मुली सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत आहेत. पोलीस भरती होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहण्याचं स्वप्नं पूर्ण करु अशी अनेक मुलींची जिज्ज आहे. त्यासाठी अनेक मुली गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत सराव करत आहेत. यात अनेक मुलींचे लग्नाचे वय झाले असे सांगत त्यांना घरच्यांकडून लग्नाचा आग्रह केला जात आहे. त्यातच भरती कधी होईल हे कळतच नसल्याने घरच्यांना अजून किती वर्ष थांबायला सांगावे, या चिंतेने मुलीही हतबल झाल्या आहेत.

क्लास चालकांना फटका...

पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणारे अनेक खाजगी क्लासेस सुद्धा आहेत. मात्र भरती होत नसल्याने याचा फटका क्लास चालकांना सुद्धा बसला आहे. भरतीच होत नसल्याने अनेत करुण मुलं क्लास लावत नाहीत. त्यात तीन-चार वर्षे खर्च केला, मात्र तरीही भरतीच होत नसेल तर क्लासमध्ये पैसे का खर्च करावे असा प्रश्न या तरुणांना पडला आहे. त्यामुळे अनेक तरुण घरीच सराव करण्यावर भर देत आहेत. भरतीची कोणतीही शाश्वती नसल्याने विद्यार्थी क्लासमध्ये येत नाहीत त्यामुळे क्लास बंद करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचं क्लास चालक रवी जाधव सांगतात.

पुस्तक रद्दीत विकण्याची वेळ...

पोलीस भरतीसाठी मैदानी परीक्षेसोबत लेखी परीक्षासुद्धा होते. त्यामुळे लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी तरुणांना भरपूर अभ्यास करावा लागतो. त्यासाठीची आवश्यक पुस्तके विकत घ्वायीत लागतात. प्रत्येकवेळी परीक्षेचे प्रश्न बदलत असतात, त्यामुळे नवीन पुस्तकांशिवाय पर्याय नसतो. पण भरतीच होत नसल्याने, मुलं नवीन पुस्तक घेण्यासाठी येत नसल्याचं पुस्तक विक्रते सांगतात. त्यात जनरल नॉलेजचे पुस्तक घडामोडींनुसार बदलत असतात. त्यामुळे जुने पुस्तक रद्दीत टाकण्याची वेळ आली असल्याचे औरंगाबाद येथील उदय बुक सेंटरचे चालक सांगतात.

स्पोर्ट शॉप चालकांच नुकसान..

पोलीस भरतीचा सराव करणारे तरुण स्पोर्ट्स बूट, नाईट ड्रेस, गोळा, सरावासाठी दोरी अशा अनेक वस्तू खरेदी करत असतात. पण पोलीस भरतीची प्रकिया होत नसल्याने अनेक मुलांनी सराव बंद केला आहे, तर काही जण घरीच जुगाड करून सराव करत असल्याने पूर्वीपेक्षा व्यवसाय कमी झाला असल्याचं औरंगाबाद शहरातील सिटी चौक भागात असलेल्या पंजाब स्पोर्ट नावाच्या दुकानाचे मालक सांगतात.

भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

सलग तीन वर्ष पोलीस भरतीची तयार करूनही जागा निघत नसल्याने बीड जिल्हातील केजच्या 25 वर्षीय सचिन मारूती शिंदे या तरुणाने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. दिवस-रात्र प्रचंड मेहनत करूनही खाकीचे स्वप्न धूसर होत असल्याने, सचिनने टोकाचे पाउल उचलले.

खाकीची क्रेज

गेल्या काही वर्षांपासून अनेक चित्रपटात अभिनेते पोलिसांची भूमिका बजावतांना दिसत आहेत. त्यात पोलिसांना एक्शन मोडमध्ये दाखवले जाते. पोलिसांचे अधिकार आणि त्यांची दादागिरी कशी आहे हे दाखवले जाते. त्यामुळे तरुणांमध्ये खाकीची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र याच वाढत्या क्रेजमुळे अनेक तरुण पोलीस होण्याचे स्वप्न पाहत अनेक तरुण मेहनत करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेतेमंडळी काय म्हणतात?

राज्यात 12 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 5 हजार 300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल अशी घोषणा जानेवारी (२०२१) महिन्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात केली होती. पुढे त्यांनी राजीनामा दिला आणि पोलीस भरतीची घोषणा हवेतच राहिली.

तर गेल्या आठवड्यात सातारा येथील मल्हारपेठ पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी 12 हजार 500 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं म्हटले. मात्र सरकार आल्यापासून अजित पवारांनी पोलीस भरतीबाबत अनकेदा घोषणा केली खरी पण, प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही.

कोरोना संकटाच्या काऴात निवडणुका होतात, अनेक परीक्षाही घेतल्या जातात मग पोलीस भरतीची प्रक्रिया का राबवता येऊ शकत नाही असा सवाल अनेक तरुण विचारत आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री झाले आहेत. आता ते तरी भरतीबाबत काही निर्णय़ घेणार का असा प्रश्न प्रतिक्षेत असलेले तरुण विचारत आहेत.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला तेव्हा त्यात पोलीस दलासाठी मोठी प्रस्तावित करण्यात आली होती. पोलीस खात्यात हवालदार पदासाठी 18 हजार 992 रिकाम्या असलेल्या जागा भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पण पुढे सरकार बदलले आणि या घोषणचे काय झाले हा प्रश्नच आहे.

दरम्यान राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सरकारने पोलीस भरतीच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. यानुसार आता तरुणांना तयारी करावी लागणार आहे. एकीकडे नवीन भरती होत नाही. तर याआधी 2018मध्ये झालेल्या भरतीमध्ये निवड झालेले पण प्रतीक्षा यादीत असलेल्या युवकांनाही अजून नियुक्ती मिळालेली नाही. त्यांचाही संघर्ष सुरूच आहे.

पोलीस भरतीसाठी तयारी करणारे असंख्य तरुण हे गरिब, कष्टकरी वर्गातले आहेत. त्यांचे पालक काबाड कष्ट करुन या मुलांना शिकवून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करण्यास तयार करतात. हे तरुण देखील प्रचंड मेहनत करुन आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण कऱण्याची धडपड करत असतात. पण सरकारी पातळीवरील निर्णया अभावी आज हजारो तरुण हवालदिल झाले आहेत.

Updated : 2021-06-29T18:12:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top