Home > मॅक्स रिपोर्ट > एक गाव स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत…

एक गाव स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत…

एक गाव स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत…
X

जागतिक महासत्तेच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा निर्धार केंद्र सरकार करतंय....तर राज्यात सत्ता कुणाचीही असो राज्याचा विकासरथ जोराने जात असल्याचा दावा केला जातो. पण हे सर्व दावे किती फोल आहेत याचा प्रत्यय येतो रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी आणि कोंडी आदिवासीवाडी या पाड्यांमध्ये गेल्यावर...इथल्या लोकांना स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतरसुद्धा मुलभूत नागरी सेवा-सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विकासाची किरणं आजपावेतो या गावापर्यंत पोहोचलीच नसल्याचं इथं गेल्यानंतर दिसतं.

वाडीवर जाण्यासाठी रस्ताच नाही

नागशेत गावापासून पाच किमी अंतरावर कोंडी धनगरवाडा आहे. इथं जाण्यासाठी रस्ताच नाही. काटेरी आणि दगडगोट्यांची खडतर वाट तुडवून जाताना गावकरी, विद्यार्थी आणि महिलांचे खूपच हाल होतात. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी कसरत असते. गावापर्यंत एसटीचीदेखील सोय नाही. रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. रस्ता नीट नसल्याने सायकल किंवा टू व्हिलर खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ येते. अनेकांना तर रोजगारालाही मुकावे लागले आहे. इथं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्यानं ५ ते ६ किलोमीटर पायी जावे लागते. शाळेच्या वेळेच्या दीड तास आधी या मुलांनी सकाळी पायी निघावे लागते.

पाण्यासाठी जीव धोक्यात

रस्त्याची समस्या कायम असताना इथं दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाण्याची....पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय गावात नसल्याने इथल्या महिलांना डोक्यावरुन पाणी आणावे लागते. अर्धा तास चालत जाऊन या महिलांना ४० ते ५० फूट खोल खाणीत उतरुन पाणी घेऊन वर चढावे लागते. जीव धोक्यात घालून दोन हंडे पाणी घऱी आणताना या महिल्यांच्या डोळ्यात पाणी येतं.

स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही हाल

या लोकांचे जिवंतपणी असलेले हाल मृत्यूनंतरही संपत नाहीत कारण या गावाला अजूनपर्यंत स्मशानभूमीसुद्धा मिळालेली नाही. मृत व्यक्तीला जागा मिळेल तिथे दगड लाऊन मग दहन करावे लागते. यामुळे मृतदेहांची विटंबनादेखील होते. त्यामुळेच जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका...या ओळी इथं मात्र खोट्या ठरतात. नागशेत ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोंडी धनगरवाड्याची लोकसंख्या 210 आहे. इथं साधारण 40 कुटुंब राहतात. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करावते हा प्रश्न पडतो. लाकडं आणि जागा ओली असल्याने अनेकदा मृतदेह अर्धवट जळतात. मृतदेहांची अक्षरशः विटंबना होते. हक्काची स्मशानभूमी नसल्याने अशा भयानक परिस्थितीत अंत्यविधी करावा लागत असल्याने ग्रामस्थ प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. कोंडी धनगरवाडीचे राहणारे बाळू ढेबे हे नागशेत ग्रामपंचायत सदस्य आहेत. पण पाठपुरावा करुनही समस्या सुटत नसल्याचे ते सांगतात.

ठाकरे कुटुंबाचं कुलदैवत याच ठिकाणी

कोंडी धनगरवाडा आणि आदिवासी वाडीला प्राथमिक सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दरबारी आपली निवेदने दिली आहेत. मात्र कुणालाही इथल्या ग्रामस्थांच्या वेदनेची जाणीवच नसल्याचं हे गावकरी सांगतात. कोंडी धनगरवाडा आणि आदिवासीवाडी नागशेत ग्रामपंचायत हद्दीत येते. ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे केली जातात पण कोंडीधनगरवाडा इथं स्मशानभूमी आणि मूलभूत सोयीसुविधा ग्रामपंचायतीला देता आलेल्या नाहीत.

ठाकरे कुटुंबीयांचं कोंडजाई देवी हे कुलदैवत इथंच आहे. बाळासाहेब ठाकरे अनेक वर्षांपूर्वी येऊन गेले तेव्हा रस्त्याचे काम झाले होते. पण त्यानंतर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. राज ठाकरे इथं देवीच्या दर्शनासाठी नेहमी येत असतात. आता राज्यात ठाकरे सरकार आले आहे,आतातरी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मुलभूत सुविधा द्याव्या अशी अपेक्षा इथले गावकरी व्यक्त करतात.

पंचायत समितीतर्फे फक्त आश्वासनं

कोंडी धनगरवाडीच्या या समस्या सोडवण्यासाठी पंचायक समितीमार्फत फक्त आश्वासनंच मिळतात. स्मशानभूमी मिळावी यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, तसेच सध्या जलजीवन आराखडे तयार केले जात आहेत, त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला जाईल, अशी सरकारी प्रतिक्रिया पाली सुधागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिली आहे. एकूणच काय तर या आदिवासी बांधवांच्या समस्यांची दखल घेऊन त्या तातडीनं सोडवण्याची राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही हे नक्की...

Updated : 1 March 2020 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top