Home > मॅक्स रिपोर्ट > 'आ सरकारच पारधीनु गुन्हेगार हिरू' , पारधी समाजाचा आक्रोश

'आ सरकारच पारधीनु गुन्हेगार हिरू' , पारधी समाजाचा आक्रोश

भटके जीवन जगणारे हे पारधी कुटूंब तीस वर्षापासून या जागेवर स्थिरावले होते. मुख्य प्रवाहात येऊ पाहत होते. गायींवर थाटलेला त्यांचा संसार पालातून, ओढ्या वगळीतून आता घरात उभा राहिला होता. त्यांच्या माथी मारलेला गुन्हेगारीचा शिक्का आता शिक्षणामुळे हळूहळू पुसला जात होता. अंधार प्रिय वाटणाऱ्या, अंधारच हवाहवासा वाटणाऱ्या, उजेडाला घाबरणाऱ्या या पारधी कुटुंबाच्या स्थिरावलेल्या घरात स्वयंप्रकाशाचा झरोका आता कुठे आत येऊ पाहत होता. तोच दोनशे हत्यारबंद पोलिसांचा फौजफाटा पहाटे सहा वाजताच घराजवळ दाखल झाला. नेमकं काय घडलं पारधी कुटूंबासोबत? जाणून घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा रिपोर्ट....

आ सरकारच पारधीनु गुन्हेगार हिरू , पारधी समाजाचा आक्रोश
X

“एकांद्या झाडा डोंगरात काळ्याकुट्ठ अंधारात तुम्ही अडकला आसाल, आणि तुमाला तिथ एखान्दा माणूस दिसला तर तुमाला आधार वाटल. पण डोंगर, दऱ्या खोऱ्यात, रानात एखादी बारीक जरी लाईट दिसली तरी आमच्या छातीत धस्स हुयाच. एखादा माणूस आढाळला की आम्हाला धोका वाटायचा. रानावनातून आम्ही धूम ठोकायचो. आयुष्यात उजेड तेवडा नको वाटायचा. जेवढा आंधार आसल तेवढ बर वाटायचं. दिसलं तिकड पळायच. का पळतुय म्हायीत नव्हतं?” महांतेश शंकर चव्हाण या आठवणी सांगायला सुरवात करतात आणि त्यांच्या जन्माचा संपूर्ण पट त्यांच्या डोळ्यापुढून झरझर सरकू लागतो.

पारधी कुटुंबात जन्मलेले महांतेश हे एका पायाने पूर्ण अपंग आहेत. ते जेवढा वेळ आईच्या काखेत बसलेले नसतील तेवढा वेळ गाईच्या अंगावर बसलेले आहेत. ते सांगतात “अपंग असल्यामुळे नातेवाईक कुठेही टाकून निघून जायचे. मला जास्त वेळ चालता यायचं नाय. त्यावेळी मी गाईवर बसलो ते तिच्या अंगावरच आयुष्य काढलं. गाईवर बसायचं, भीख मागून जगायचं. गाय माझी खरी आई हाय. परीसरात कुठ चोरी झाली की पोलीस पहिल्यांदा आमाला पकडायचे. मी राज्यातल्या बारा जेलात राहून आलुय. पुलिस तळपायाचा भाकरीच्या तुकड्याएवढा पापुंद्रा काढायचे. पायावरील केस उपटायचे, त्यांचं एकच म्हणणं असायचं नाव घे. आमी चोरीच केल्याली नसायची मंग नाव कुणाच घ्यायचं. भीख मागून जगायचं आणि पुलीसाचा मार खायाचा. आसं कुठ झोपडं उभा करून संसार कराय लागालु की पोलीस घुसायच. आमचं संसारातलं मोडकं तोडकं साहित्य घेऊन जायाचं. पाण्याची मडकी फोडून टाकायची. आम्हाला पाणी भरायला सुद्धा भांडी नसायची. जरमनच ताट दगडाने ठोकून ठोकून खोलगट करायचं. त्यातनं हिरीवरनं पाणी आणायचं. त्यात एकाची पण ताण भागायची नाय. पाउस पडाय लागला की आमी वर तोंड करून तोंडात थ्योंब झेलायचू. आसलं आमच आयुष्य हुतं. कुठंच ठाव ठिकाण नाय. एखाद्या रानावनात झोपायच. जागसुद झोपावं लागायचं. कोण आल्याची चाहूल लागली एखादा उजेड दिसला की त्या क्षणाला रात्रीच तिथून हालायच. दिसल तिथपर्यंत रान तुडवायचं. माणूस नसलेल्या ठिकाणी राहायचं. माणूस दिसला की आमची पळापळ हुयाची. एखादा नवा शर्ट विकत घेऊन जरी अंगावर घातला तरी लोक कुठन आणलायस विचारायचे”.

महांतेश यांची पत्नी शोभा मध्येच बोलता बोलता त्यांना थांबवते. त्यांना या संघर्षाच्या आठवणीने गलबलून येतं. त्या स्वतःच सांगू लागतात “एकदा माझी जाऊ पोटुशी होती. तिनं रानात एक हरभऱ्याचा ढाळा उपटला. त्या शेतकऱ्याने बघितलं. त्याने तिला इतकं मारलं की तीच पोट वाहून गेलं. पुढ एक महिना ती जमिनीवर पडून हुती”.

महांतेश आणि शोभा यांना मी एक स्पष्ट प्रश्न विचारला, तुम्ही पोलिसांना इतकं का घाबरत होता? त्यावेळी पारधी चोऱ्या करायचे का? या प्रश्नावर महांतेश यांनी बोलायला सुरवात केली. “होय आमी त्याकाळी चोऱ्या करायचो. पण कुणाची घर फोडत नव्हतो. आमी पोटासाठी कुणाच्या रानातली कणस चोरून न्यायचो. कुणाची बाजरी चोरून न्यायचो. कुणाची मक्याची कणसं चोरून न्यायचो. ह्या चोऱ्या केल्या नसत्या तर आमी जगलु कसं असतू ? आमी त्या काळी पोटासाठी चोऱ्या केल्या. आमाला दुसरा पर्यायच नव्हता. आमाला कुणी काम सांगत नव्हतं. भीख मागायला गेलं तर हजार चौकशा करत हुतं. त्यामुळ आमच्या पोराबाळांना सांभाळायला आमच्याकड दुसरा पर्यायच नव्हता.

महांतेश यांचे बोलणे मध्येच तोडत शोभा यांनी पुन्हा बोलायला सुरवात केली “आम्ही राना माळाने हिंडणारे लोक होतो. गायावरून हिंडून मागून खात होतो. आम्हाला पाल देखील नव्हता. झाडांच्या सावलीत आम्ही राहत होतो. काट्याकुट्यात आम्ही हिंडत होतो. वगळीत राहिलेलो असताना कुणी आले तर मारतील म्हणून पळून जायचो. आम्ही भीख मागून शिकार करून खात होतो. तेंव्हा गाववाले आम्हाला हे चोरटे आहेत असे म्हणत हुते. पकडून मारत होते. तरी कुणाला दादा बाबा म्हणून भीख मागून आम्ही जगत हुतो. पोलीस, गाववाले आणि सरकार सगळेच आम्हाला चोर म्हणायचे. जवळ घ्यायचे नाहीत. या परिस्थितीत पाखरू कसं फिरून चरतं तसं आम्ही पाखरासारखे दाणं दाणं गोळा करून जगलेली आम्ही माणसं हावो. माझा ह्यो थोरला मुलगा लिंबाच्या झाडाखाली जलमला”.

हा भूतकाळ सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पारधी असल्याने त्यांची हेटाळणी केली गेली. चोर म्हणून हिणवले गेले. तरीही न डगमगता त्यांनी संघर्ष करत आपले आयुष्य पुढे रेटले. डोळ्यासमोर एकच स्वप्न होत. या दलदलीतून बाहेर पडण्याच. पण हा संघर्ष इतका सोप्पा नव्हता. एका पायाने पूर्ण अपंग नव्हरा. कुठल्या गावात थांबले की लोक हाकलून काढायचे. चोर म्हणून मारहाण करायचे. या परिस्थितीत त्या नागनाथ अण्णा नायकवडी यांना भेटल्या. त्यांनी आधार देऊन कुंडलच्या वन विभागाच्या हद्दीत राहायला सांगितले”.

भटके जीवन जगणारे हे कुटुंब या जागेवर स्थिरावले होते. मुले आश्रम शाळेत शिकली. एक बहिण बी ए शिकलेली आहे. एक भाऊ अनिल चव्हाण वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. याबाबत त्यांचा मुलगा श्रीकांत सांगतो “ मी दहावीला जाईपर्यंत पोलिसांना घाबरत होतो. पोलीस दिसले की, मी पळत सुटायचो. कारण माहित नव्हतं. पोलीस मारतात इतकच मनावर बिंबलेलं होतं. आता मी शिकलोय. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील हक्क कळायला लागलेत. आता कुठे ही भीती कमी झालीय.

भटके जीवन जगणारे हे कुटुंब तीस वर्षापासून कुंडल येथील वन विभागाच्या जागेवर स्थिरावले होते. मुख्य प्रवाहात येऊ पाहत होते. गायींवर थाटलेला त्यांचा संसार पालातून ओढ्या वगळीतून घरात उभा राहिला होता. त्यांच्या माथी मारलेला गुन्हेगारीचा शिक्का आता शिक्षणामुळे हळूहळू पुसला जात होता. अंधार प्रिय वाटणाऱ्या अंधारच हवाहवासा वाटणाऱ्या, उजेडाला घाबरणाऱ्या या पारधी कुटुंबाच्या स्थिरावलेल्या घरात स्वयंप्रकाशाचा झरोका आता कुठे आत येऊ पाहत होता.

तोच दोनशे हत्यारबंद पोलिसांचा फौजफाटा पहाटे सहा वाजताच घराजवळ दाखल झाला. पोलिसांनी कुटुंबियांना धरून ओढत बाजूला केले. पै पै करून उभ्या केलेल्या घरावर जेसीबी फिरू लागला. कुणाला काही सुचत नव्हत. त्यांच्या नातवंडाच्या सायकलीवर देखील जेसीबी फिरवला गेला. शोभा चव्हाण यांनी विरोध केला. त्यांना धरपकड करत मारहाण सुरु झाली. अपंग महांतेश हंबरडा फोडत होते. त्यांची मुले आमचं घर का तोडताय म्हणून जाब विचारत होते. त्यांची दारातली जनावर कावरी बावरी झाली होती. ज्या गाईवर बसून महांतेश यांनी आयुष्य काढलं ती गाय दोरी तोडून पळू लागली. फौजफाटा गाईच्या मागे दगड घेऊन लागला. गाई कुणाच्याच जवळ येईना. दुसऱ्या दिवशी महांतेश जिला आई मानत होते ती गाय त्याच ठिकाणी मरून पडली होती.

संघर्ष करून स्थिर झालेल्या पारधी कुटुंबाला इथल्या या जुलमी व्यवस्थेने पुन्हा एकदा रस्त्यावर आणले. अंधारात ढकलले. पै पै जमा करून त्यांनी बांधलेल्या घराचे पत्रे बांबू इतकेच नव्हे तर कोंबड्यांचे खुराडे देखील वनविभागाचे कर्मचारी घेऊन गेले. अंधाराकडून प्रकाशाकडे झेपावलेले हे पारधी कुटुंब पुन्हा एकदा पाठीवर आपले बिऱ्हाड लादून अंधाराच्या दिशेने जुन्याच पायवाटेवर चालायला पुन्हा सज्ज झालंय. सरकारच्या या कामगिरीची जबाबदारी इथल्या प्रशासनाची , लोकप्रतिनिधींची या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तुमची आणि माझी देखील आहे. चला अभिमानाने आपलीच पाठ थोपटून घेऊयात...

Updated : 21 May 2023 5:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top