Home > मॅक्स रिपोर्ट > Positive News : दुर्गम भागात शिक्षणाचे अनोखे प्रयोग, शाळा बंद शिक्षण चालू !

Positive News : दुर्गम भागात शिक्षणाचे अनोखे प्रयोग, शाळा बंद शिक्षण चालू !

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण शक्य न झाल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. पण याच काळात नाशिक जिल्ह्यातील एक दुर्मग आदिवासी पाडा आणि एका छोट्याशा गावात शिक्षणाचे अनोखे प्रयोग केले गेले.

Positive News : दुर्गम भागात शिक्षणाचे अनोखे प्रयोग, शाळा बंद शिक्षण चालू !
X

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा गेले दीड वर्ष बंद आहेत. नुकतेच सरकारने शाळा सुरू केल्या. पण तिसऱ्या लाटेच्या भीतीने पालकही मुलांना शाळेत पाठवण्यास फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाची नवी संकल्पना समोर आली. हळूहळू ही बाब विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडली. पण या काळात ग्रामीण भागातील अनेक गरिब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन नसल्याने शिक्षण घेता आले नाही. काही विद्यार्थ्यांनी तर मोबाईल नसल्याने आत्महत्या केल्याच्यी घटना समोर आल्या. अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क येत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाल्याचे दिसले. तर एका घरात मोबाईल एक आणि शिकणारे दोन किंवा तीन अशी परिस्थिती होती. यात अनेक मुलांचे शिक्षण सुटले.

पण यासर्व नकारात्मक वातावरणातही पर्याय शोधून काढणारे काही लोक आहेत. अशाच काही शिक्षकांनी पुढाकार घेत या अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अनोख्या संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत केली आहे. अशाच एका प्रयोगाची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी भागात टीव्हीवरची शाळा भरवली जाते आहे. धामडकीवाडी नावाने प्रसिद्ध असलेला हा पॅटर्न विद्यार्थी प्रिय ठरला आहे.


नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर हा प्रयोग केला गेला आहे. रस्ता नसलेली धामडकीवाडी दुर्गम ठिकाणी आहे. इथे कोणत्याही फोनला तासदेखील नेटवर्क नसते. त्याचबरोबर मुलभूत सुविधांच्या समस्यांनी ग्रासलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ही आदिवासी वाडी आहे. अतिदुर्गम आदिवासी वाडीतील शाळा बंद आहेत, असे असतानाही येथील प्रयोगशील शिक्षक प्रमोद परदेशी यांनी खराब झालेल्या तीन टीव्ही सेट्सचा उपयोग करीत घरोघरी शाळा भरवण्याचा अभिवन प्रयोग केला. हा धामडकीवाडी पॅटर्न विद्यार्थ्यांना खूप आवडला आहे.

लॉकडाऊनमुळे साऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. शाळाही बंद होत्या. या काळात प्रमोद परदेशी यांनी अडचणींमुले न थांबता त्या अडचणींवर स्वकौशल्याने मात करण्याचा निर्धार केला. संपूर्ण राज्याला दिशा देणारा असा हा धामडकीवाडी पॅटर्न चर्चेत आला आहे. प्रमोद परदेशी त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य स्तरावर घेतली गेली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार देवून त्यांचा सरकारतर्फे सन्मान देखील करण्यात आला आहे. धामडकीवाडी येथील शैक्षणिक कार्याची दखल घेत मुंबई येथील पेहेचान फाऊंडेशन, तसेच विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, लखोटिया फाऊंडेशन,मुंबई यांनी या शाळेसह ग्रामस्थांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

असा आहे धामडकीवाडी पॅटर्न

धामडकीवाडी ही आदिवासी वाडी दुर्गम भागात आहे. इथे मोबाईल नटवर्क नसल्याने येथील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड नको असेल तर काही तरी वेगळा उपाय शोधावा लागेल हा विचार प्रमोद परदेशी यांनी केला. त्यातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक स्वतंत्र पॅटर्न तयार झाला. एका टीव्हीपुढे सात विद्यार्थी याप्रमाणे तीन टीव्हीसमोर २१ विद्यार्थी शिक्षमाचे धडे गिरवत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तयार व्हिडिओ फॉर्वर्ड केले जात होते. तेव्हा पुढची पावले ओळखून अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केली. तयार करण्यात आलेल्या विविध व्हीडीओचे प्रसारण प्रत्येक टीव्हीवर केले जाते. विद्यार्थी हे व्हिडिओ पाहून शिकत आहेत. या प्रयोगाचा फायदा शिकू न शकलेल्या अनेक ग्रामस्थांनाही होतो आहे. तर अनेकांना आपल्या पाल्यांच्या निमित्ताने उजळणी होत असल्याचा अनुभव येतो आहे. या प्रयोगामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून आदिवासी भागातील ही मुलं बाहेर पडणार असा प्रयत्न होता.

धामडकीवाडी पॅटर्न विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालाय. मात्र या भागात सतत होणारा विजेचा लपंडाव हा अडथळा चरत आहे. गरीबीमुळे घरात टीव्ही नसल्याने अनेकांना तीन टीव्हींवर अवलंबून रहावे लागते आहे. सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून कालबाह्य झालेले आणि कोनाड्यात पडलेले टीव्ही उपलब्ध झाल्यास निश्चितच अजूनही विकासापासून आणि शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या गावांमध्ये धामडकीवाडी पॅटर्न नवा अध्याय लिहू शकणार आहे, असे हा प्रयोग करणाऱ्यांना वाटते.

भिंती बनल्या फळा, येवल्यातील अनोखा प्रयोग

एकीकडे लॉकडाऊनच्या काळात शिक्षणाचे नवे प्रयोग सुरू होते. तेव्हाच ग्रामीण भागात आणखी एक प्रयोग केला गेला. इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि या भाषेवरील प्रभुत्व हे आजच्या काळात आवश्यक झाले आहे. पण अनेकांना इंग्रजी भाषेची भीती असते. त्यामुळे एक न्यूनगंड तयार होते. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी अनेकदा जास्त भीती असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर आणि पुढील जीवनातही परिणाम होत असतो. पण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील दुगलगाव या छोट्याशा गावात इंग्रजी शिक्षणाचा अनोखा पॅटर्न राबवला गेला आहे.

मुलांच्या मनातील इंग्रजी वाचण्याची आणि बोलण्याची भीती दूर व्हावी यासाठी एका शिक्षकाने अनोखा प्रयोग केला आहे. घराघरात इंग्रजी पोहोचवावी याकरीता "माय इंग्लिश व्हिलेज "हा अभिनव उपक्रम दुगलगाव येथे राबवला गेला. येथील शिक्षक राहुल धुमाळ आणि गावातील ग्रामस्थांच्या सहभागातून संपूर्ण गावातील भिंतींनाच फळा बनवण्यात आले. या भिंतींवर इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी अर्थ लिहिले गेले. अनेक ठिकाणी चित्रांचाही वापर केला गेला.

राहुल धुमाळ या शिक्षकाने गावामधील स्वस्त धान्य दुकान, ग्रामपंचायतची टाकी, विद्यार्थ्यांचे घरे, गावातील मंदिरे अशा पंधरा ठिकाणी दोन हजार इंग्रजी शब्द त्यांच्या अर्थासह रेखाटले आहेत. गावातील विद्यार्थी जाता - येता हे शब्द वाचत असतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या शब्दकोशात व इंग्रजीतील प्रभुत्वावर भर पडत आहे. याचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येऊ लागले आहे. गावातील मुले आपल्या घरी बसूनच आपल्या घराच्या भिंतीवर लिहिलेले इंग्रजी शब्द व मराठी अर्थ वाचू लागल्याने पालकांनाही समाधान वाटते आहे.

ग्रामीण भागाला लॉकडाऊनचा फटका सर्वच अर्थाने सगळ्यात जास्त बसला. ऑनलाईन शिक्षणाच्या काळात शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील होते. याच काळात असेही प्रयोग होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Updated : 21 Sep 2021 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top