Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : महापूर तर ओसरला अश्रूंचा पूर कायम

Ground Report : महापूर तर ओसरला अश्रूंचा पूर कायम

कोल्हापुरमध्ये पूर ओसरल्यानंतर आता या पुराने केलेले नुकसान समोर येऊ लागले आहे. या पुरामुळे कुंभार व्यावसायिकांना कसा फटका बसला आहे, याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Ground Report : महापूर तर ओसरला अश्रूंचा पूर कायम
X

कोल्हापूर - तुंबलेल्या गल्ल्या, घाणीचं साम्राज्य, कुजलेल्या वस्तुंचा उग्र दर्प, पाच दिवसांपासून पाण्याची वानवा, गायब झालेली विज, भिजलेलं अन्नधान्य, रस्त्यावरती पडलेले अन्न, घरातल्या दोन मजल्यापर्यंतच्या भिंती पुसण्यासाठी धडपडणारे हात आणि विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले कर्ते पुरुष.... हे आहे कोल्हापूरच्या शाहूपुरी या परिसरात राहणाऱ्या कुंभार समाजाचं चित्र.....




कोल्हापूरमध्ये ओसरलेल्या पुरानंतर दिसणारे हे चित्र वेदनादायी आहे. 2005, 2019 पेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचा महापूर 2021 मध्ये कोल्हापुरकरांनी अनुभवला. फक्त अडीच दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसाचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये पसरायला लागले. अगोदरच्या महापूराचा अनुभव लक्षात घेता लोकांनी लोकांनी सामानाची आवराआवर करून ठेवली होती. परंतु त्यांना दुसरीकडे जाण्यासाठी सवडच मिळाली नाही. त्यामुळे 2021 च्या या महापुरामध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. कुंभार समाजाचं तर मोठे नुकसान झाले आहे. २०१९चा महापूर, त्यानंतर कोरोना आणि आता पुन्हा महापूर यामुळे कुंभार समाज मोठ्या संकटात अडकला आहे. कोल्हापूर शहरामध्ये बापट कॅम्प, शाहूपुरी, पापाची तिकटी या ठिकाणी हे कुंभार समाजाचे वास्तव्य आहे. दिवाळी, दसरा, नवरात्र आणि गणेश उत्सव या हा काळ कुंभार कारागिरांसाठी महत्त्वाचा आहे.

वर्षभराच्या सणवारासाठी लागणाऱ्या मुर्ती आणि इतर वस्तू बनवण्याचे काम ते करतात. पण या व्यवसायाला गेल्या तीन वर्षापासून ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळते. 2019 ला आलेला महापूर, 2020 कोरोनामुळे अनेक सणांवर निर्बंध आल्यामुळे त्या वर्षीचे अनेक सण उत्सव रद्द झालेत. यंदा कोरोनाची लाट हळूहळू कमी होत असल्याने यंदा तरी गणेशोत्सव चांगला होईल अशी आशा या लोकांना होती. पण त्यामुळेच विविध प्रकारच्या मूर्ती त्यांनी बनवण्यास घेतल्या होत्या. पण महापुरात त्यांची सर्व स्वप्न पूर्णपणे वाहून गेली आहेत.




एकट्या शाहूपुरी प्रभागामध्ये जवळपास हजार ते बाराशे कुटुंब राहतात प्रत्येक कुटुंबामध्ये मूर्तीच्या माध्यमातून वर्षाकाठी लाखो रुपयांचा कमाई होत असते. एकंदरीत कोल्हापूर शहरापुरता विचार केला तर कुंभार समाज बांधवांची वार्षिक उलाढाल ही कोट्यावधी रुपयांपर्यंत होते. या व्यवसायाशी निगडित अनेक व्यवसाय आहेत जसे बँड, सजावटीची दुकाने, साऊंड सिस्टीम, मंडप, लाइट या सर्वांना त्याचा फटका बसला आहे.

स्थानिकांशी संवाद साधला त्यावेळेस अनेकांनी आपल्या मनातल्या व्यथा आणि वेदना बोलून दाखवल्या. काही जणांचे अश्रु थांबत नव्हते. त्यांच्यासमोर प्रश्न आहेत आता जगायचं कसं? कारण अनेक बँकांमधून या व्यवसायासाठी त्यांनी कर्ज घेतले आहे. बँकेचे हप्ते, त्याचे व्याज ते सध्या ते फेडू शकत नाहीत. त्यामुळे सावकारांकडून जादा दराने काही जणांनी कर्ज उचलले आणि त्याची परतफेड कशी करायची? या दडपणाखाली हे लोक आहेत.



कोरोना काळामध्ये संपूर्ण काम ठप्प झाल्यामुळे हातात पैसा शिल्लक नाही. दवाखान्याची गरज भासली तर खर्च कसा भागवायचा हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या ठिकाणच्या तरुणांनी गेल्या तीन वर्षात झालेले नुकसान पहिले आहे. त्यामुळेच या व्यवसायामधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये ते आहेत. गेल्या वर्षी जे नुकसान झाले त्याची अल्प स्वरूपात मदत मिळाली, परंतु तितकीशी पुरेशी ठरली नसल्याचं या ठिकाणचे नागरिक बोलून दाखवत आहेत. कुंभार समाजाचे अनिल निगवेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीसुद्धा हीच विनंती केली की, सरकारने आमच्या व्यवसायासाठी भरघोस स्वरूपात अनुदान द्यावं, आमचे बँकेचे हप्ते माफ करावेत. तीन वर्षात आर्थिक परिस्थितीमुळे घराचा आणि व्यवसायाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. मुलांचे शिक्षण, लग्न कसे पार पाडायचे? जवळपास प्रत्येक घरातील प्रत्येकाला हेच प्रश्न छळत आहेत.

कोल्हापूरचा महापूर ओसरत चालला आहे पण या पूरग्रस्तांसाच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर कधी ओसरणार, हाच प्रश्न आहे.

अशीच अवस्था सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील अनेकांची झाली आहे. या शहरांमधील छोटे छोटे उद्योजक, व्यावसायिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. पण ही मदत या उद्योजकांना पुरेशी नाही. कुंभार व्यावसायिकांसह, सलून व्यावसायिक, उत्सवांमध्ये लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूंची विक्री करणारे उद्योजक या सगळ्यांचा विचार केला, तर या महापुराने पुन्हा एक सामाजिक समस्या निर्माण केली आहे.

सांगली जिल्ह्यातील भिलवडीची लोकसंख्या अंदाजे 50 हजाराच्या आसपास आहे. या गावाला 12 वाड्या जोडलेल्या आहेत. या भिलवडी गावातील मुख्य बाजारपेठ ही या पुराच्या पाण्याखाली कायम जात असते. या बाजार पेठेत वार्षिक उलाढाल ही अंदाजे 40 कोटीच्या आसपास आहे. ही उलाढाल गेली दोन वर्षे लॉकडाऊन आणि एक वर्षा आड पूर यामुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

सरकारकडून मिळणाऱ्या भरपाईमधून दुकानाच्या साफसफाईचा खर्च पण भगत नसल्याची खंत ढवळे यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना मांडली.यावेळी बोलताना ढवळे म्हणाले तातडीची मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. यातून दुकानाचा साफसफाईचा खर्च पण भगत नाही आणि जी मदत जाहीर केली आहे ती अजूनही मिळालेली नाही. नुकसान साधारणपणे दीड लाखाच्या आसपास झाले आहे आणि मदत मात्र कमी प्रमाणात असे, हार्डवेअर दुकानदान मोहम्मद चौगुले यांनी सांगितले.

दुकानात दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल, विक्रीचे मोबाईल, सारं काही खराब झाल्याचे व्यावसायिक दिलावर तांबोळी यांनी सांगितले. एकूण रोजच्या व्यवसायातून संसाराचा गाडा ओढणाऱ्या लोकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. सांगलीच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापुराने बाधित होणाऱ्या वस्त्यांचे तात्पुरते पुनर्वसन नको तर कायमस्वरूपी पुनर्वसन केले पाहिजे, अशी भूमिका मांजडसी. याचबरोबर शेती आणि व्यापारी पेठांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि महापुराच्या समस्येतून कायमची सुटका व्हायची असेल तर धरणातून विसर्ग होणारे पाणी दुष्काळी भागाला वळविले पाहिजे आणि स्थिरीकरण योजना पुढे नेली तरच आपण पुराच्या समस्येतून बाहेर पडू असा असे त्यांचे म्हणणे आहे.

Updated : 4 Aug 2021 3:24 PM GMT
Next Story
Share it
Top