Top
Home > Max Political > दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार...

दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार...

दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार...
X

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे करण्यात येत आहेत. कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं व वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तात्काळ निराकरण करावं यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी असं जरी शासनाकडून सांगितलं गेलं आहे.

DABHOL

असं असलं तरी राज्यातील अनेक गावात ऑनलाइन रेशनकार्डबाबत अनागोंदी कारभार सुरूच आहे. बारकोड नसलेल्या आणि ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शिक्षापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्याची रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ गावात ही बाब समोर आली आहे. वंचित कुटुंबाना तहसीलदार कार्यालयांचे उबंरठे झिजवण्याची वेळ सध्या आली आहे. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाहीय.

एकीकडे शासन आणि प्रशासन, समाजसेवी संस्था लोकांच्या घरी जाऊन अन्न धान्य वाटप करत आहेत. मात्र दुसरीकडे गावातील ऑनलाईन नोंदणी न केल्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. रेशन दुकानावर १ एप्रिलपासून ३ महिन्याचे धान्य मिळेल असं सांगण्यात आलं होत. मात्र प्रत्यक्ष रेशन दुकानावर एका महिन्याचं धान्य दिलं जात आहे. बायोमेट्रिक पडताळणी न करता रेशनवर धान्य मिळणार असल्याच्या सूचना दिल्या असून देखील धान्य दुकानदार ऑनलाईन नोंदणी सक्तीची असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

DABHOL

ऑनलाईन नोंदणी न झालेल्या नागरिकांना धान्य मिळणार नसल्याचं दुकानदार सांगत आहेत. धान्य दुकान क्र १, २, ३ या दुकानात कार्डावर ऑनलाईन १२ अंकी नंबर असून देखील नागरिकांना कित्येक महिने धान्य देण्यात आलेले नाही.

https://youtu.be/ZB49_LecTho

या संदर्भात अधिक माहितीसाठी 'मॅक्स महाराष्ट्र'चे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी दाभोळ येथील नागरिकांशी सवांद साधला असता त्यांनी असं सांगितलं की,

"या दुकानात आम्ही धान्य घेण्यास गेलो असता दुकान चालकांनी यादीत नंबर नसल्याचं सांगितलं. नेहमी ज्यांना धान्य मिळते त्यांनाच या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला धान्य मिळू शकणार नाही असे सांगून आम्हाला परत पाठवलं."

या नागरिकांनी आपला रेशन कार्डवरील नंबर (Aadhaar enabled Public Distribution System - AePDS) या शासनाच्या संकेत स्थळावर टाकलं असता यामधील काही नागरिकांचे ऑनलाईन धान्य याआधी उचललं गेल्याचा दक्कादायक प्रकार समोर आला.

"नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना धान्य मिळालंच नाहीय. मग आमच्या हक्काचे धान्य गेलं कुठे असा सवाल या नागरिकांनी केलं आहे. आमचे रेशनकार्ड ऑनलाईन नंबर असताना देखील आमचे आंगठे मशीनवर दिलेले असताना देखील या हक्काच्या ध्यान्यापासून आम्ही वंचित आहोत"

असं दाभोळ येथील नागरिकांनी म्हटलं आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी दाभोळ धान्य दुकानदार गोविंद शिगवण यांना भ्रमणवध्वनी केलं असता त्यांनी सांगितलं की,

"ज्यांची ऑनलाईन नोंदणी आहे त्यांनाच सध्या धान्य दिलं जातंय. ज्यांचं उत्पन्न ४० हजाराच्या आत आहे आणि जे नियमीत धान्य घेतात अशांना धान्य दिलं गेलंय"

या संदर्भात अधिक माहितीसाठी दाभोळच्या सरपंच सोनाली जाधव यांच्याशी संपर्क केला असता

"त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती नसल्याचं सांगितलं. संबंधित रेशन दुकान ग्रामपंचायतीकडे नसून बचत गटाकडे आहे. ज्यांची ऑनलाईन नोंदणी आहे त्यांनाच धान्य देण्यासाठी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे. सर्वांना धान्य मिळालं पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे मात्र, तसं होत नसल्याचं"

जाधव यांनी सांगितलं.

या संदर्भात अधिक माहितीसाठी दापोली तालुका पुरवठा अधिकारी माधुरी शिगवण यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन काही वेळा व्यस्त आला. मात्र, नंतर तो बंद दाखवत असल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.

या संदर्भात अधिक माहितीसाठी दापोली खेड मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांना भ्रमणवध्वनी केलं असता

"त्यांनी याप्रकरणाबाबत काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत असं दापोली-खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी सांगितलं. यासंदर्भात तहसीलदारांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत आणि यात काही गैरव्यवहार झाला असेल तर रेशन दुकानाचा परवाना रद्द करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे"

असं आ. कदम यांनी म्हटलंय.

"दाभोळमधील नागरिकांनी धान्य वाटपासंबंधी तक्रार केलेली आहे. पुढील कारवाईसाठी पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांकडे ही तक्रार पाठवली आहे. या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे ती चौकशी करून लवकरच समोर येईल"

असं दापोलीचे तहसीलदार समीर घाडे यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील आरोग्य विभागासोबतच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी कामाचा वेग वाढवून अन्नधान्याचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेत. मात्र, काही ठिकाणी स्थानिक दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत.

कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

Updated : 20 April 2020 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top