मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - शरद पवार
X
भाजप सरकारचे शेतीविषयक धोरण अतिशय चुकीचे असून त्यामुळेच या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रात मागील दोन वर्षात 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज एरंडोल येथे शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून पवार पुढे म्हणाले की युपीए व काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात देशाचा विकास झाला. मात्र, या सरकारने मागील सरकारची प्रतिष्ठा धुळीस पाडली असून अनेक बाबींमध्ये आपली पीछेहाट झाली आहे. अनेक आश्वासन त्यांनी दिले. मात्र, एकही पूर्ण केले नाही. कर्जमाफीचे काय झाले? हे आपणा सर्वांना माहिती आहे.
शेतकरी आत्महत्या ही लहान बाब नसून अतिशय गंभीर घटना आहे. मात्र, याकडे गांभीर्याने भाजप सरकार बघत नसल्याने दिवसेंदिवस शेतकर्यां्च्या आत्महत्या वाढत आहेत.
मनमोहन सिंग सरकारच्या काळात 350 कोटींचे राफेल विमान आता 1600 कोटीला घेतले जात आहे. यावरून मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार किती पटीने वाढला आहे. असं म्हणत पवारांनी डायरेक्ट मोदींवर निशाणा साधला आहे.
कारगिल, संसद,गोधरा येथे हल्ले झाले, त्या वेळी भाजपाचे राज्य होते. अलीकडे उरी व काश्मीर येथेही भाजपाचे सरकार असताना हा हल्ला झाला, असे हल्ले होत असताना, 56 इंच छाती कुठे गेली? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे पवारांच्या सभेला जनतेने देखील चांगला प्रतिसाद दिला.