Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पिकं जळाली आणि पाण्यासाठी पायपीट, पाण्याचं राजकारण गावाला मारक

Ground Report : पिकं जळाली आणि पाण्यासाठी पायपीट, पाण्याचं राजकारण गावाला मारक

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवते आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना केवळ राजकारणामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप झाला आहे. आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Ground Report :  पिकं जळाली आणि पाण्यासाठी पायपीट, पाण्याचं राजकारण गावाला मारक
X

सोलापूर : शहरांमधील पाणीटंचाईच्या समस्येकडे अनेकवेळा लगेच लक्ष देऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात. पण ग्रामीण भागातील पाणीटंचाईकडे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असते. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील घोटी गाव पाणीटंचाईला सामोरे जात आहे. या गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. ज्या दहिगाव पाणी उपसा सिंचन योजनेच्या भरवशावर शेतकऱ्यांनी शेतात पिके लावली होती. ती सिंचन योजना गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतातील पिके जळून गेली असल्याचा आरोप शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी प्रशासनावर केला आहे. या दहिगाव पाणी उपसा सिंचन योजनेत राजकरण केले जात असल्याचा आरोप होतो आहे, त्यामुळेच पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घोटी गावातील विहीर,बोर यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याच्या बोरला कमी पाणी येत असल्याने तासनतास पाण्याची वाट बघत नागरिकांना बसावे लागत आहे. याच गावात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करूनही त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणत पाणी मिळाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी प्रशासन आणि विद्यमान आमदार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दहिगाव पाणी उपसा योजनेत राजकारण केले जात असल्याचा आरोप होत आहे. पाण्यासाठी गावाची वणवण,भटकंती सुरू आहे. याला शासन, प्रशासनाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

धरण उशाला कोरड करमाळा तालुक्याच्या घशाला

उजनी धरण माढा तालुक्यात असून धरणाच्या पाण्याने धरणाच्या जवळ असणाऱ्या करमाळा तालुक्यातील काही गावांचा भाग व्यापलेला आहे. उजनी धरण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजली जाते, पण याच जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याविना तहानलेली आहेत. उजनी धरण करमाळा तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या तालुक्यातील बराच भाग ओलिताखाली येणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही. उलट अनेक गावांत पाण्याची वानवा असल्याचे दिसते. करमाळा तालुक्यातील घोटी गाव उजनी धरणापासून काही अंतरावर आहे. पण तेथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी येथील पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. येत्या 15 दिवसात पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर रूप धारण करेल,असे येथील नागरिकांना वाटत आहे.
प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. तो कधी येईल याची देखील येथील गावकऱ्यांना शाश्वती नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकर पाऊले उचलून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा,असे येथील नागरिकांना वाटत आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पाण्याअभावी पिके जळून गेली

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी सांगितले, की करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील असताना गेल्या दोन ते अडीच वर्षात दहिगाव पाणी उपसा योजना सुरळीत चालली. त्यांच्या काळात कॅनॉलला पाणी वेळेवर येत होते. त्यानंतर या भागाचे विद्यमान आमदार म्हणून संजय शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पाणीच बंद झाले आहे. गेल्या दोन वर्षात दहिगाव उपसा सिंचन योजनेतून वेळेवर पाणी सोडले जात होते. त्यामुळे या पाण्याच्या जीवावर येथील शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली होती, पण पाणी काही आलेच नाही. त्यामुळे पिके जागेवरच जळून गेली. या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या जीवावर शेतकऱ्यांनी खरबूज, कांदा, कलिंगड, कडवळ याची लागवड केली. पण ही पिके सध्या पाण्याअभावी करपून गेली आहेत. या पाण्याचे जाणीवपूर्वक राजकारण केले जात असून जाणूनबुजून आमचे गाव पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. गेल्या 9 तारखेला आंदोलन केल्यानंतर एक दिवस पाणी सोडले,पण आमच्या घोटी गावापर्यंत पाणी पोहचेपर्यंत बंद ही झाले. पाणी एवढ्या लवकर का बंद केले याचा जाब प्रशासनाला विचारल्यास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. आम्ही पाण्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करत असून आमची कोणीच दखल घेईना गेले आहे. दहिगाव पाणी उपसा योजनेतून 2 टीएमसी पाणी देण्याचा नियम असताना पूर्ण पाणी आम्हाला कधीच मिळाले नाही. पाऊसात ओहरफ्लोचे पाणी दिले जाते. पण उन्हाळ्यात पाण्याचा वाणवा असताना दिले जात नाही. या योजनेतून डायरेक्ट टेलला पाणी देण्याचा अधिकार असताना ते दिले जात नाही. आमच्याकडून पाण्यासाठी पैसे ही भरून घेतले आहेत, त्याच्या पावत्याही आमच्याकडे आहेत. पाण्याअभावी येथील बोर आणि विहरी कोरड्या पडल्या आहेत. थोड्याशा पाण्यावर सध्या बोर सुरू आहेत. त्या कधी बंद पडतील हे सांगता येत नाही. पाण्यासाठी लोकांना दोन-दोन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन पाण्याचा प्रश्न मिटवावा.

पिण्याच्या पाण्यासाठी २ किलोमीटर पायपीट

शेतकरी ज्ञानदेव दाभाडे यांनी सांगितले,की या वर्षात कॅनॉलला पाणीच आले नाही. आमची पाण्याविना बिकट अवस्था झाली आहे. "आम्ही दोघे नवरा बायको शेतात राहत असून पिण्याचे पाणी कळशीने दोन किलोमीटर अंतरावरून आणावे लागत आहे. कॅनॉलला पाणी आले नसल्याने शेतात काहीच लावले नाही. बोअरचे पण पाणी कमी झाले आहे. थोडेसे आले तर लगेच बंद होते."

पाण्यासाठी सात ते आठ तास प्रतिक्षा

घोटी गावात पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करताना दिसतोय. पाण्यासाठी नागरिकांना 7 ते 8 तास नळावर बसावे लागत असल्याचे येथील युवक सुभाष थोरात याने सांगितले. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी गावातून गेले असते तर गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. गेल्या 6 महिन्यापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावची लोकसंख्या दोन हजार आठशे एवढी आहे. यासाठी प्रशासनाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. तो मिळेल का नाही हे सांगता येत नाही. आमच्या गावासाठी दहिगाव पाणी उपसा सिंचन योजना असताना त्यातून पाणी सोडले जात नाही. प्रशासनाकडून आमच्या गावावर अन्याय सुरू आहे.

जळालेल्या पिकांच्या पंचनाम्यांची मागणी

घोटी गावच्या शेतकऱ्याने बोलताना सांगितले की, "दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी गावात जवळ-जवळ दोन वर्षे आलेच नाही. त्यामुळे पाण्याची परस्थिती एकदम बेकार झाली आहे. पिके जळून गेली असून प्रशासनाने त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. गावच्या पाण्याच्या प्रश्नात राजकारण केले जात असल्याने पाण्याचा प्रश्न सुटेनासा झाला आहे" असे घोटी गावच्या शेतकऱ्याचे मत आहे.

Updated : 22 May 2022 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top